नाशिक - पाेलिसांना शरण अालेले रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश लोंढे यांना सरकारवाडा पाेलिसांनी गुरुवारी (दि. १६) न्यायालयात हजर केले असता, तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात अाले. यावेळी पाेलिसांनी दुहेरी खून प्रकरणातील संशयित असलेला त्यांचा मुलगा भूषण लाेंढे यास फरार हाेण्यास ते मदत करीत असल्याचा अाराेप करीत त्याच्या चाैकशीसाठीही पाेलिस काेठडीची मागणी केली.
न्यायालय अावारात पाेलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ मारहाण प्रकरणी लोंढे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी लोंढे यांनी जिल्हा न्यायालय नंतर उच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला जाताच ते पाेलिसांना शरण अाले.
न्यायालयात सरकार पक्षाकडून तपासी अधिकारी उपनिरीक्षक संदीप कांबळे सरकारी वकिलांनी प्रकाश लाेंढे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी न्यायालयापुढे स्पष्ट करीत या अटकेतील अाराेपींना पाण्याच्या बाटलीतून मद्य देण्याचा प्रकार अाणि त्यास विराेध करणाऱ्या पाेलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा प्रकार गंभीर असल्याचा युक्तिवाद केला. त्यांचा मुलगा भूषण दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील संशयित असून, ताे सहा महिन्यांपासून फरार असून, त्यास ते मदत करीत असल्याचा संशय अाहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाच्या चाैकशीसाठी लाेंढे यांना पाेलिस काेठडी गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, न्यायालय अावारात लाेंढे यांच्या समर्थकांनी माेठ्या संख्येने गर्दी केल्याने या ठिकाणी बंदाेबस्तावर तैनात असलेल्या पाेलिस यंत्रणेवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचा अाराेपही पाेलिसांनी केला.