आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणीप्रकरणी वृत्तवाहिनीच्या कथित पत्रकारांना पोलिस कोठडी, तिघे जेरबंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
नाशिक - जिल्हा रुग्णालयाच्या कार्यालयीन अधीक्षकांकडे ३० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या स्थानिक वृत्तवाहिनीच्या तीन कॅमेरामनला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सोमवारी (दि. १६) रात्री संशयितांना त्र्यंबकरोडवर ३० हजारांची खंडणी घेताना मुंबईनाका पोलिसांना अटक केली होती. मंगळवारी (दि. १७) संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक हरिश्चंद्र पगार यांच्याविराेधात स्थानिक वृत्तवाहिनीचा कॅमेरामन स्टिफन अॅन्थोनी अाढाव याने माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. प्रकरण मिटवण्यासाठी पगार यांच्याकडे पाच लाखांची मागणी करण्यात अाली. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले. पगार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने सोमवारी रात्री १० वाजता सापळा रचला. पगार यांच्याकडून ३० हजारांची खंडणी घेताना स्टिफन आढाव (रा. सातपूर), मायकल जॉन खरात (रा. इंगळेनगर, जेलरोड) आणि सचिन रघुनाथ तुपे यांना पथकाने अटक केली. वरिष्ठ निरीक्षक सुनील नंदवाळकर, एन. जे. खंडारे, एस. एम. घोटेकर यांच्या पथकानी ही कारवाई केली. संशयितांना न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 
 
तक्रार द्या, कारवाई केली जाईल 
संशयित सराईत गुन्हेगार आहेत. शासकीय कार्यालयात एक हजाराच्या वर माहितीच्या अधिकाऱ्यात अर्ज दिले आहेत. अशाप्रकारे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल केले असल्यास पोलिसांत तक्रार करा. नाव गोपनीय ठेवले जाईल.
-  सुनील नंदवाळकर, वरिष्ठ निरीक्षक, मुंबईनाका पोलिस ठाणे. 
 
चायनीज खाद्यविक्रेत्याला धमकी 
संशयितांनीजेलरोड येथील चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्याला ‘आम्ही पत्रकार आहोत, पोलिस आमच्या खिशात आहेत. घरगुती गॅस वापरता, किती वाजेपर्यंत परवानगी आहे’, असे विचारत पैसे देता त्याच्याकडे खंडणी मागितल्याची तक्रार उपनगर पोलिसांत केली अाहे.
 
हजाराच्यावर माहितीच्या अधिकारात अर्ज 
अटक केलेल्या संशयितांनी सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या विरोधात माहितीच्या अधिकारात एक हजाराच्यावर अर्ज दिले आहेत. जिल्हा रुग्णालयातही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे यापूर्वी आर्थिक मागणी केली होती. स्थानिक वृत्तवाहिनीचा पत्रकार असल्याचे सांगत थेट कार्यालयात चित्रीकरण करत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. अटकेतील मायकल खरातच्या विरोधात उपनगर पोलिस ठाण्यात दोन खुनांचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...