आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३०० मीटरच्या पाइपलाइनसाठी ३२ लाख रुपयांचा खर्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक रोड - पिण्याच्या पाण्याच्या ३०० मीटरच्या पाइपलाइनसाठी ३२ लाख रुपये खर्चाच्या गोष्टीवर कोणाचा विश्वास बसणार नाही. कामात भ्रष्टाचाराचा समज अनेकांचा होऊ शकतो. विशेष म्हणजे रहिवाशांना यासाठी तब्बल एक तप प्रतीक्षा करावी लागली.
तांत्रिक अडचणी दूर झाल्याने नवीन वर्षात रहिवाशांना महापालिकेचा पाणी पुरवठा होणार आहे. ही कहाणी ग्रामीण भागातील नसून, पालिकेच्या प्रभाग ३४ मधील गोरेवाडीतील शास्त्रीनगर भागातील आहे. तीन हजार वसाहतीला मध्यरात्री पाणीपुरवठा होतो. कमी दाबामुळे उपयोग होत नसल्याने गेल्या बारा वर्षापासून तीन टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. टॅंकर परिसरात दाखल होताच प्रत्येकाची पाणी भरण्यासाठीच्या धावपळीमुळे वादविवाद नित्याचेच झाले होते.
गोरेवाडीच्या शास्त्रीनगर परिसराला पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन टाकण्यासाठी मध्य रेल्वेच्या ट्रॅक क्रॉसिंगचा अडसर होता. महापालिकेची भूमिका सकारात्मक होती, मात्र ट्रॅकच्या खालून पाइप लाइन टाकण्यास रेल्वेचा अडसर असल्याने प्रश्न भिजत पडला होता.अप-डाउन लाइनच्या खालून गेलेल्या पाण्याच्या पाइपलाइन मध्ये १२ इंच पाइप टाकण्यास परवानगी मिळत नसल्याने नगरसेवक हरिश भडांगे, शोभा आवारे यांचे सर्वस्तरावरील प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर रेल्वे बोर्डाचे माजी सदस्य,तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांच्या पत्रानंतर रेल्वे प्रशासनाने पहाणीची तयारी दर्शवली.
मात्र महापालिका रेल्वे अधिकाऱ्यांची वेळ जुळत नसल्याने भुजबळांच्या प्रयत्नांनतरही पहाणीसाठी तब्बल दोन वर्षाचा कालावधी गेला. भुसावळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाइपलाइन टाकण्याच्या मारुती मंदिरा जवळील जागेची पहाणी केली.तेथे पाइपलाइन टाकण्यासाठी दहा वर्षासाठी रेल्वेने सुपरवायझिंग मेन्टेन्ससाठी ११ लाख ६३ हजार ९७६ रुपये फी आकारुन परवानगी दिली. याशिवाय प्रोसेसिंग फी पोटी हजार ९०० रुपयांचा पालिकेला भरणा करावा लागला.

नवीन वर्षात पाणी
^तांत्रिक अडचणीनंतर ट्रॅक खाली पाइप टाकले आहे. पवारवाडी जलकुंभातून शास्त्रीनगरच्या रहिवाशांना दि.१४ जानेवारीपासून पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. टॅंकरच्या दोन्ही बाजूने क्रॅसिंगपर्यंत पाइपलाइन जोडण्याचे काम बाकी आहे.एकमेव प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक पदाच्या कारकिर्दीतील दोन वर्ष खर्च झाले, मात्र यश आल्याने आनंद आहे. - हरिश भडांगे, नगरसेवक