आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोटी माहिती; 346 कॉलेजना नोटिसा; अपुरे शिक्षक, नियमबाह्य नियुक्त्या, पगारही थकले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुठे प्राचार्यांचीच नियुक्ती नाही, तर कुठे प्राध्यापकांचे पगार थकलेले, कुठे पुरेसे संगणक नाहीत तर कुठे नियमानुसार बांधकामच नाही... अशा अत्यंत गंभीर त्रुटी राज्यातील व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये आढळून आल्या आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या महत्त्वाच्या मानकांच्या आधारे तंत्रशिक्षण संचालकांनी ही तपासणी केली होती. त्यात ३४६ व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये या त्रुटी असताना, संस्था चालकांनी व  प्राचार्यांनी खोटी प्रतिज्ञापत्रे दिल्याचे दिसून आले. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने या महाविद्यालयांना शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी नोटिसा बजावल्या.

व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा राखण्याच्या उद्देशाने या महाविद्यालयांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नेमून दिलेल्या निकषांची पूर्तता करणे अनिवार्य असते. मात्र, राज्यातील अनेक महाविद्यालये याची पूर्तता करीत नसल्याने शिक्षणाची गुणवत्ता घसरत चालल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर, तंत्रशिक्षण संचालनालयाने परिषदेने दिलेल्या मानकांच्या आधारे राज्यातील ३४६ अभियांत्रिकी महाविद्यालयांची तपासणी केली. त्यात १०९ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक  शैक्षणिक साधने नसणे, ३३ महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असणे, ६५ महाविद्यालयांचे बांधकाम अपुरे असणे आणि ११ महाविद्यालयांनी जमिनीच्या आवश्यक क्षेत्रफळाची पूर्तता न करणे अशा त्रुटी आढळून आल्या आहेत. 

विशेष म्हणजे, याेग्य अर्हतेनुसार प्राचार्य न नेमणे, आवश्यक शैक्षणिक पात्रतेत प्राध्यापकांच्या नियुक्त्या न करणे, विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत अपुरी शिक्षक संख्या आणि प्राध्यापकांचे महिनोंमहिने थकलेले वेतन अशा अत्यंत गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. मात्र, याच संस्थांनी त्यांच्याकडे या सर्व सुविधा असल्याची आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची मानके पूर्ण केल्याची प्रतिज्ञापत्रे शासनास सादर करून त्यावर आधारित विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले आहे. परंतु आता, ही माहितीच खोटी असल्याचे शासनाच्या या तपासणीतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे या महाविद्यालयांना उच्च शिक्षण संचालनालयाने ‘कारणे दाखवा’ नोटिसा पाठविल्या आहेत.   
 
‘व्यावसायिक महाविद्यालयांवर फौजदारी गुन्हे दाखल करा’
या संदर्भात पाठपुरावा करणाऱ्या मुंबईच्या सिटिझन फोरम संस्थेचे सचिव वैभव नरवणे म्हणाले,  संस्था कशी फसवणूक, शिक्षकांची पिळवणूक व विद्यार्थ्यांची लुबाडणूक करत आहेत, हे तपासणीतून सिद्ध झाले. फक्त नोटिसांनी विषय संपत नाही. खोटी प्रतिज्ञापत्रे देणारे संस्थाचालक व प्राचार्यांच्या विरोधात संचालकांनी गुन्हे नाेंदवावेत व त्यांनी घेतलेले अतिरिक्त शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी आहे.
बातम्या आणखी आहेत...