आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीतर्फे लवकरच धावणार ३५ व्होल्व्हो, ३५ स्कॅनिया बस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळही सरसावले असून, आरामदायी सुरक्षित प्रवासासाठी विदेशी कंपनीच्या बस ताफ्यात सामील करण्याचा निर्णय महामंडळातर्फे घेण्यात आला आहे. लवकरच या विदेशी बस विविध मार्गांवर धावणार आहेत. महामंडळ ३५ व्होल्व्हो ३५ स्कॅनिया बस अशा ७० बसची खरेदी करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. एसटी महामंडळाच्या इतिहासात राज्य सरकारने प्रथमच महामंडळासाठी १४३ काेटी रुपयांची तरतूद केली आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात धावणाऱ्या या बस स्वमालकीच्या राहणार आहेत. यापूर्वी चालविण्यात आलेल्या व्होल्व्हो बस कंत्राटी पद्धतीने चालविण्यात येत हाेत्या. खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत एसटी मागे राहू नये यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे महामंडळात उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांत एसटीला खासगी प्रवासी वाहतुकीच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. राज्यात सरकारनेच प्रवासी वाहतुकीचे परवाने दिलेल्या बसगाड्यांची संख्या १५ हजारांच्या वर गेल्यामुळे एसटीच्या प्रवाशांची संख्या कमी झाली. परिणामी उत्पन्नावरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला.
ग्रामीण भागातल्या बेकायदा प्रवासी वाहतुकीमुळे प्रवाशांची संख्या अधिकच घटली आणि उत्पन्नही कमी होत गेले. अशा स्थितीतही एसटीवरचा प्रवाशांचा विश्वास कमी झालेला नाही. दररोज लाखो प्रवासी एसटीनेच प्रवास करतात. एसटीच्या कारभाराबद्दल प्रवाशांच्या तक्रारी असल्या, तरीही ग्रामीण-दुर्गम भागातही एसटी हेच प्रवासाचे प्रमुख साधन आहे. सध्या दोन व्होल्व्हो बस नाशिक डेपोकडे आहेत. नवीन येणाऱ्या ३५ व्होल्व्होंपैकी सध्या १२ गाड्या रस्त्यावर धावत आहेत. नवीन गाड्यांपैकी नाशिकच्या वाट्याला किती गाड्या येणार, याबाबतचे धोरण अद्याप निश्चित नसल्याची माहिती परिवहन महामंडळाच्या सूत्रांनी दिली.

..प्रारंभी येथे धावणार
नाशिकडे पोला मिळणाऱ्या बस प्रारंभी नाशिक-पुणे, नाशिक-मुंबई नाशिक-औरंगाबाद या मार्गांवर धावणार असून, नंतर अन्य मार्गांवर धावतील. या बस चालविण्यासाठी नाशिक डेपोच्या पाच चालकांना प्रशिक्षणासाठी बेंगळूरूला रवाना करण्यात आले आहे. एका बसमध्ये ४४ प्रवाशांची आसनक्षमता राहणार आहे. बसची अंदाजे किंमत एक कोटी ४० लाख रुपये असल्याचे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वप्रथम नाशिकच्या ताफ्यात या बस सामील होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...