आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Sent To Police Custody In Nasik Girl Harrasment

निराश्रित बालिका शोषण प्रकरणी चौघांना पोलिस कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पेठरोडवरील तवली फाटा येथील जय आनंद अनाथ आश्रमातील 34 मुलींचे आर्शमातील कर्मचार्‍यांकडूनच लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस येताच पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी काही तासांतच चौघा संशयितांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

जय कालिकामाता एज्युकेशन सोसायटी संचलित जय आनंद निराश्रित बालगृहातील 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींचे तेथील पाच कर्मचार्‍यांकडून लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांना प्राप्त झाली होती. रविवारी समितीच्या पथकाने बालगृहातील मुलींना विश्वासात घेऊन विचारणा केली असता, सदरचा प्रकार उघडकीस आला. यासंदर्भात, जिल्हा महिला बालविकास अधिकारी दिलीप हिवराळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित भाऊसाहेब तुळशीराम थोरात, संतोष बन्सी थोरात, जगन्नाथ लक्ष्मण भालेराव, हरेश सुरेश पाटील यांच्याविरुद्ध लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण अधिनियम व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव भोसले, निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या पथकाने चौघांना अटक केली. न्यायालयापुढे उभे केले असता, संशयितांना 30 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


मनसेकडून घेराव

या बालिकांच्या शोषणाविरुद्ध मनसेच्या महिला आघाडीने आक्रमक पवित्रा स्वीकारत समाजकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांना घेराव घालत जाब विचारला. तसेच, त्यात कुणाचाही सहभाग किंवा पाठिंबा असल्यास त्यांची हयगय करू नये; अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारादेखील मनसेच्या नगरसेविका सुजाता डेरे यांनी दिला. जय आनंद अनाथ बालगृहात हा प्रकार सुरू असताना तो प्रकार बालकल्याण समितीच्या किंवा समाजकल्याण विभागाच्या लक्षातच कसा आला नाही, असा सवालदेखील महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला. या वेळी सुजाता डेरे यांच्यासह मंगला रुडकर, तेजल वाघ, ललिता गोवर्धने, माया काळे, शोभा तेवर आदींसह अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.