आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील 4 हजार 208 मतदान केंद्र डिजिटल, भटकंतीपासून होणार मतदारांची सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मतदार याद्यांसह संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच डिजिटलाइज करण्याचे काम आयोगाकडून सुरू असून, त्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्वच 4 हजार 208 मतदान केंद्र आता एका क्लिकवर शोधता येतील.त्यामुळे जगभरात कोठेही असणाऱ्या मतदाराला मतदान केंद्र कक्षासह सर्व तपशील घरबसल्या पाहता येतील. मतदाराला आता बूथवर आपल्या नावाची, मतदान केंद्राची शोधाशोध करण्याची तसेच राजकीय कार्यकर्त्यांच्या मदतीची आवश्यकता राहिली नाही. मतदार यादीमध्ये नाव शोधण्यापासून मतदार कक्षापर्यंत पोहोचण्यासाठी मतदाराला अनेकांची मदत घ्यावी लागते. त्यामध्ये वेळही खर्च होतो. बऱ्याचदा नाव सापडतही नाही. त्यामुळे उगाच त्रास सहन करण्याऐवजी अनेक मतदार मतदानच करत नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या इतिहासात स्थानिक स्वराज्य संस्था असो अथवा लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत १०० टक्के मतदान झालेच नाही. परंतु, आता मतदारांना केवळ आपले नाव अथवा मतदान केंद्रच नव्हे, तर त्या केंद्रामधील मतदार कक्ष, त्या ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह तत्सम सुविधा उपलब्ध आहेत की नाही, याचीही छायाचित्रांसह माहिती मिळेल. विधानसभा केंद्रांमधील यादी विभाग, मतदान केंद्र, मतदान कक्ष तसेच केंद्रापर्यंत जाणारे मार्ग अशी सर्वच माहिती आयोगाच्या सूचनेनुसार छायाचित्रांसह अपलोड करण्यात आली आहे.
डिजिटलायजेशनचे काम पूर्ण
मतदानकेंद्रांच्या डिजिटलायजेशनचे काम पूर्ण झाले आहे. जूनमध्येच जिल्ह्यातील चार हजार २०८ केंद्रांचे मॅप व्ह्यू, सॅटेलाइट व्ह्यू, यादी विभाग, मतदान केंद्रांची छायाचित्रे निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहेत. आयोगाच्या आदेशानंतर ते मतदारांना दिसू शकतील. - दीपमाला चौरे, प्रभारी निवडणूक उपजिल्हाधिकारी
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर माहिती
निवडणूक आयोगाच्या ईसीआय डॉट एनआयसी डॉट इन या संंकेतस्थळावर मॅप सेक्शनमध्ये जाऊन राज्य निवडायचे त्यात जिल्हा निवडल्यानंतर तालुकानिहाय मतदान केंद्राची माहिती उपलब्ध होईल.
बातम्या आणखी आहेत...