आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

43 लाख रोपे वाटिकेतच पडून; सामाजिक वनीकरण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

''शहराचा विस्तार वाढतोय, इतक्या ठिकाणी अतिक्रमणे फोफावलीत की झाडे लावायलाच जागा सापडत नाही,’ हे वक्तव्य एखाद्या सामान्य माणसाचे नाही, तर दस्तुरखुद्द सामाजिक वनीकरण विभागातील एका अधिकार्‍याने उधळलेली ही मुक्ताफळे आहेत. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी, वनक्षेत्र वाढावे यासाठी सामाजिक वनीकरण विभागांतर्गत ‘झाडे लावा-झाडे जगवा’चा मंत्र दिला जात असला, तरी या विभागाच्या रोपवाटिकेत आजमितीस तब्बल 43 लाख रोपे पडून आहेत. विशेष म्हणजे, मागील तीन वर्षांपासून वृक्ष लागवडच करण्यात आलेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डी.बी. स्टारचा यावर प्रकाशझोत..''

दोनच दिवसांपूर्वी सर्वत्र जागतिक वनदिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून सामाजिक वनीकरण विभागाने पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या हरित सेना इको क्लब व शाळांच्या सहकार्याने वृक्ष लागवडी विषयक जनजागृतीसाठी चित्ररथासह रॅलीचे आयोजन केले होते. त्याचबरोबर घोषवाक्ये व वृक्षांचे महत्त्व पटविणारी पत्रके वाटण्याचा देखावा केला. हा गाजावाजा करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात या विभागाने नेमक्या कोणत्या ठिकाणी वृक्षांची लागवड केली याची माहिती डीबीस्टार ने घेतली असता मागील तीन वर्षात विभागातील रोपे वाटिकेतच पडून असल्याची गंभीर माहिती उघड झाली.

जागाच नसल्याने वृक्ष लागवड नाही
वृक्ष लागवडीची जिल्ह्यात काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाला भेट दिली, असता धक्कादायक बाब समोर आली. जिल्ह्यात सर्वत्र अतिक्रमणांचा एवढा सुळसुळाट झाला आहे की वृक्ष लागवडीसाठी सध्या जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे नाइलाजाने इच्छा असतानाही वृक्ष लागवड करता येत नसल्याची खंत लागवड अधिकारी एस. डी. गुंजाळ यांनी डीबीस्टारशी बोलताना व्यक्त केली.

रोपवाटिकेमध्ये 43 लाख रोपे पडून
नाशिक सामाजिक वनीकरण विभागाच्या स्वत:च्या मालकीच्या नाशिक गंगाकाठ, मुकणे नर्सरी इगतपुरी, ओझरखेड रोपवाटिका दिंडोरी, मुसळगाव रोपवाटिका सिन्नर अशा चार रोपवाटिका आहेत. या रोपवाटिकांमध्ये सुमारे 100 प्रजाती संरक्षित करण्यात येतात. त्यात फळझाडे, औषधी झाडे, जीवनदायी, वनशेतीसाठी उपयुक्त, प्रदूषण दर्शविणारी, विषारी वायूंपासून निवारण करणारी वृक्षे, वनशेतीसाठी उपयुक्त, सरपणासाठी अशा विविध उपयोगी वृक्षांच्या प्रजातींचा समावेश आहे. विभागाच्या या रोपवाटिकांमध्ये तयार करण्यात आलेली सुमारे 43 लाख रोपे पडून आहेत अशी माहितीही संबंधित अधिकार्‍याने दिली.

या योजनांतर्गत तयार होतात रोपे
> वनमहोत्सव
> औषधी वनस्पती
> बांबू मिशन
> आवळा अभियान
> कॅम्प योजना
> किसान रोपवाटिका

येथे लावता येतील वृक्ष
> शहरातील विविध सोसायट्या.
> महाविद्यालये आणि शाळा.
> औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोकळे भूखंड.
> रस्त्यावरील दुभाजक.

रोपवाटिकेत कोणत्या प्रजाती तयार होतात?
> इमारतींसाठी : साग, शिवण, भेंडी, बांबू, अकेशिया मॅन्जियम, निलगिरी, सुरू, हलदू, शिशू, शिरस.
> इंधनासाठी : बाभूळ, सुबाभूळ, कॅशिया, करंज, खैर, लिंबारा.
> चार्‍यासाठी : शेवरी, सुबाभूळ, एरंड, अजंन, पवन्या, डोंगरी, मारवेल, गिनी गवत, यशवंत गवत.
> औषधी वृक्ष : आवळा, हिरडा, बेहडा, नीम, करंज, बेल, डिकेमाली, कवठ, बिब्बा, अर्जुन.
> औषधी वनस्पती : अडूळसा, कोरफड, शतावरी, तुळस, अश्वगंधा, सफेद मुसळी, गवती चहा.
> सावलीसाठी : वड, शिरस, गुलमोहर, रेनट्री.
> फळझाडे : सीताफळ, आवळा, चिंच, आंबा, बोर, जांभूळ, फणस, लिंबू, कोकम, शेवगा, विलायती चिंच, मोहा.

शहरात जागाच जागा
सामाजिक वनीकरणाच्या धोरणानुसार आणि उद्दिष्ट्यांनुसार शहरी आणि ग्रामीण भागात वृक्ष लागवड करणे महत्त्वाचे आहे. परंतु वनीकरणांच्या अधिकार्‍यांना शहरात झाडे लावण्यासाठी जागाच मिळत नसल्याचा कांगावा केला जात आहे. वास्तविक पहाता शहरातील जवळपास 15 ते 20 हजारांवर सोसायट्यांमध्ये वृक्ष लागवड करता येऊ शकते. शहरातील रस्त्यांवरच्या दुतर्फाही झाडे लावता येऊ शकतात.

सामाजिक वनीकरण विभागाचे काम काय?
सार्वजनिक आणि खासगी पडीक जमिनीवर, ग्रामीण भागात, शहरी भागात, औद्योगिक क्षेत्रात हरित पट्टे निर्माण करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाच्या धोरणांमध्ये बदल करण्यात आला आहे. यानुसार विभागाच्या कामाचीही व्याप्ती वाढली आहे. मात्र नाशिक विभागात ज्या प्रकारे लाखोंच्या प्रमाणावर रोपे पडून आहेत ते पहाता राष्ट्रीय कृषी आयोगाच्या आदेशांनाच हरताळ फासला जात असल्याचे स्पष्ट होते.

काय आहेत आदेश
राष्ट्रीय कृषी आयोगाने सखोल अभ्यास करून 33 टक्के भौगोलिक क्षेत्र हे वृक्ष आच्छादनाखाली असावे असे निर्देश दिलेले आहेत. वनखात्याबरोबरच वनेत्तर क्षेत्रावर देखील मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण संचालनालयाची निर्मिती केली गेली. या विभागामार्फत खासगी क्षेत्रावर, रस्त्याच्या दुतर्फा, वृक्ष लागवडीचे बंधन घालण्यात आले आहे. त्याव्दारे 33 टक्के भूभागावर उद्दिष्ट देण्यात आले आहे.

वाटपाऐवजी यांची केली जाते केवळ विक्री
सदरची रोपे नाममात्र दरात विविध सरकारी खात्यांना विक्री केली जातात. कृषी खाते, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, विद्यापीठे, महापालिका, शाळा, महाविद्यालये, रेल्वे, संस्था यांना ही रोपे दिली जातात. ज्यांना ही रोपे दिली जातात ते याचे रोपण करतात का नाही याकडेही लक्ष दिले जात नसल्याने अनेक वृक्षांचे रोपणच होत नाही.

तीन वर्षांपासून लागवडच नाही
थेट प्रश्न: एस. व्ही. मत्सागर, सामाजिक वनीकरण अधिकारी

वनदिनानिमित्त वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट किती?
वृक्ष लागवडीबाबत यंदा कोणतेही उद्दिष्ट निश्चित केलेले नाही. सध्या आमच्या रोपवाटिकेमध्ये 43 लाख रोपे शिल्लक आहेत.

केवळ जनजागृती करतात की वृक्ष लागवडही करतात?
वृक्षांच्या महत्त्वाबाबत जनजागृती केली जाते. परंतु, मागील तीन वषार्ंपासून वृक्ष लागवड केलेली नाही.

वृक्ष लागवड का नाही केली?
सध्या फक्त रोपांची विक्री व प्रशिक्षण देण्याचे काम करण्यात येत आहे.

वारंवार मागणी करूनही दुर्लक्षच
मागील अनेक दिवसांपासून मी सामाजिक वनीकरण विभाग आणि वनखात्याच्या अधिकार्‍यांकडे वृक्षरोपणाविषयीची मागणी करत आहे. मात्र, सातत्याने मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. मी ग्रामसभेतही हा मुद्दा उपस्थित केला होता, परंतु याकडे दुर्लक्ष केले जाते. वनीकरणाच्या अंतर्गत येणार्‍या अनेक योजनांचा योग्य तो फायदा ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचत नसल्याने अनेकदा वनीकरण केवळ कागदावरच राहाते. याचा गांभीर्याने विचार केला जावा.
-भाऊसाहेब खांडबहाले, उपसरपंच, महिरावणी.