आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात नवनिर्माणासाठी 453 कोटीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे कारण देत नवनिर्माण करण्यात अडचणी येत असल्याची कबुली दिली होती. त्याचाच प्रत्यय पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवलेल्या सन 2014-15 या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकावरून आला आहे. 1875 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकातून नवनिर्माणासाठी 453 कोटीच उरणार आहे. 335 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचाही विचार आहे.
पालिका आयुक्त संजय खंदारे यांनी स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे यांच्याकडे आगामी आर्थिक वर्षातील मूळ व सुधारित अंदाजपत्रक सादर केले. एक कोटी 17 लाख रुपयांची प्रारंभीची शिल्लक व चालू वर्षात 1874 कोटी असा ताळमेळ जुळवून दोन कोटी 73 लाख रुपये शिलकी राहतील असे नियोजन अंदाजपत्रकात करण्यात आले.
जुन्या कामांसाठी 70 टक्के खर्च : या अंदाजपत्रकात मागील वर्षातील कामांच्या खर्चाचा विचार करून दायित्वापोटी 702 कोटी रुपयांची मागणी केली. त्यात जुन्या कामांसाठी 485 कोटी खर्च होणार आहे. कार्यारंभ बाकी अशा कामांसाठी 30 कोटी, निविदा मंजुरीच्या टप्प्यातील कामांवर 98 कोटी 98 लाख, तर निविदा प्रसिद्ध होणे बाकी अशा कामासाठी 86 कोटी 58 लाखांची तरतूद आहे.
अंदाजपत्रकात 335 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा विचार आहे. सन 2011-12 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत सन 2012-13 मध्ये जकात उत्पन्नात 35 टक्के वाढ झाली. सन 2013-14 मध्ये यात 20 टक्के वाढ गृहीत धरून 835 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होते. प्रत्यक्षात 22 मे 2013 रोजी एलबीटी लागू झाल्यामुळे डिसेंबरअखेर 493 कोटी मिळाले असून, मार्च 2014 अखेरीस 620 कोटीपर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत 70 कोटींची तूट येणार आहे. त्याची भरपाई अनुदानातून करण्यासाठी पालिका शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
वाहन खरेदीसाठी असा युक्तिवाद :
आयुक्तांकडे सध्या असलेले वाहन नादुरुस्त होत असून, संबंधित उत्पादन बंद झाल्यामुळे सुटे भाग मिळण्यात अडचणी येत आहेत. त्याचा परिणाम कामकाजावर होत असल्यामुळे नवीन वाहन खरेदी कशी गरजेची, हे पटवून देण्यात आले आहे. महापौर व आयुक्त या दोघांची वाहने 4 एप्रिल 2005 रोजी खरेदी करण्यात आली. त्यात महापौरांच्या वाहनाने दोन लाख 26 हजार किलोमीटर प्रवास केला, तर आयुक्तांच्या वाहनाने एक लाख 84 हजार किलोमीटर असा प्रवास केला आहे.