आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 50 Acrea Forest Finished ; Save Trees Policy Vain

50 एकरावरील वनसंपदा नष्ट; शासनाच्या ‘वृक्ष वाचवा’ धोरणाची खिल्ली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मेरीच्या हायड्रो परिसरातील वृक्षांची मोठय़ा प्रमाणात तोड सुरू आहे. यामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला असून, शासनाच्या ‘जंगल वाचवा’ आणि ‘वृक्षारोपण करा’ या धोरणाची खिल्ली उडविली जात आहे. मेरीच्या अधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आणि पोलिसांशी पत्रव्यवहार केला. मात्र, कोणतीही कारवाई होत नसल्याने भविष्यात येथे एकही वृक्ष शिल्लक राहणार नाही.

दिंडोरी मार्गावरील मेरी (महाराष्ट्र अभियंता संशोधन केंद्र) कार्यालयाची एकूण 250 एकर जागा आहे. त्यापैकी 50 एकर जागेवर नवीन धरणाची प्रतिकृती तयार करण्याचे कार्यालय आणि उरलेल्या परिसरात जंगल आहे (होते, आता ते नाही). सध्या येथील वृक्षांची रोजच कत्तल होत असल्याने ते उजाड होत आहे. मेरीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह जिल्हाधिकारी, महापालिका आणि पोलिस अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे झाडे विरळ होत आहेत. त्यामुळे वृक्षलागवडीचे शासनाचे धोरण केवळ दिखावा असल्याचे दिसते. शासकीय अधिकार्‍यांचे केवळ वृक्ष‘लागवड’ करण्यावर लक्ष आहे. मात्र, आहेत त्या वृक्षांवर लक्ष ठेवण्यास त्यांना वेळ नाही, असे दिसते.

कर्मचार्‍यांवर हल्ला..

झाडे तोडायला विरोध करणार्‍या कर्मचार्‍यांवर हल्ला केला जातो. त्यामुळे कर्मचारीही जीव वाचवून पळून जातात. या ठिकाणी आंबा, लिंब, चिंच, इलायती चिंच, बाभूळ, नीलगिरी, बांबू, सुबाभूळ तसेच औषधी वनस्पती तोडल्या जातात.

वृक्षतोडीची प्रमुख कारणे

गॅस सिलिंडर व रॉकेल दरात वाढ, वीजदर, कोळसा व सरपणाच्या दरात वाढ यामुळे स्वयंपाकासाठी आणि स्नानासाठी पाणी गरम करण्यास ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांकडूनही महागाईवर उपाय म्हणून वृक्षतोड होत आहेत.

अशी होते वृक्षतोड..

वृक्षांच्या खोडाची चारही बाजूची साल काढली जाते. यामुळे पानांना मिळणारे अन्नद्रव्य बंद होते आणि वृक्ष हळूहळू वाळतो. वृक्ष पूर्ण सुकल्यानंतर सुरुवातीला फांद्या व शेवटी खोडासह वृक्ष तोडले जातात. याबाबत येथील चौकीदारांनी सांगितले की, वृक्षतोड करणार्‍यांना विरोध केल्यास कुर्‍हाड व कोयत्याने ते आमच्यावर हल्ला करतात. ‘गॅसचे दर वाढवल्याने शासनाची झाडे तोडतो,’ असे ते म्हणतात. कार्यालयीन कर्मचारी अपुरे असल्याने तिकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही.
अधिकार्‍यांना सांगतो

वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे मला माहीत नाही. मात्र, त्वरित अधिकार्‍यांना सांगून वृक्षांची काळजी घ्यायला मी सांगतो. विजय पांढरे, मुख्य अभियंता, मेटा

जिल्हाधिकार्‍यांशी पत्रव्यवहार

जिल्हाधिकार्‍यांशी वारंवार पत्रव्यवहार केला, मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही. परिसराच्या आजूबाजूला अतिक्रमण वाढले आहे. वरिष्ठांशी पत्रव्यवहार करणार आहे. वृक्षतोड करणारे हल्ले करतात. त्यामुळे नाइलाज असतो. प्रकाश भामरे, प्रभारी महासंचालक, मेरी
विचारणा केली जाईल

वृक्षतोडीबाबत रुजू झाल्यापासून मेरीच्या अधिकार्‍यांनी पत्रव्यवहार केलेला नाही. वृक्षतोडी विरोधात महापालिका कारवाई करीत असते. तसेच, मेरीच्या अधिकार्‍यांना याबाबत विचारणा केली जाईल. विलास पाटील, जिल्हाधिकारी

साल काढल्याने वृक्ष वाळतो

साल काढल्याने वृक्ष वाळतो. कारण सालीच्या खाली कॅम्बियमचा थर असतो. त्याच्यातून वृक्षाचे पालनपोषण होते. तेच काढले जात असल्याने वृक्ष मरतो. श्याम रनाळकर, वरिष्ठ अधिकारी, सामाजिक वनीकरण