आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

५० लाख, पण दोन वर्षांसाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आठवडाभरा पूर्वी नगरसेवकांना ५० लाख रुपये निधी देण्याचा तिढा महापौर अशोक मुर्तडक यांनी सोडवला. त्यांच्या समोरच शुक्रवारी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी हा निधी दाेन वर्षांसाठी असल्याची गुगली टाकली. अर्थात, ही बाब पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकावर अवलंबून राहील, अशीही पुस्ती त्यांनी जाेडल्याने संभ्रम वाढला आहे. आठ दिवसांत आयुक्तांचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर हाेणार असून, मागील वेळेप्रमाणेच अंदाजपत्रकाचा आकडा असेल, असे सांगितल्यामुळे नगरसेवकांना पुढील वर्षही साडेसातीचेच असेल.
फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात आयुक्तांकडून स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक सादर केले जाते. सध्या अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी नगरसेवकांच्या वाट्याला किती निधी येईल चालू वर्षासाठी ५० लाखांचा निधी मिळेल का, असा सवाल माध्यमांनी महापौर प्रमुख पदाधिका-यांसमोर आयुक्तांना केला. त्यावर आयुक्तांनी भांडवली खर्चासाठी ६० कोटी स्थायीने वाढ केल्याप्रमाणे १२ ते १५ कोटी असे ७५ कोटीच उपलब्ध होतील, असे सांगितले. त्यावर पुन्हा यंदाच्या वर्षीचे ५० लाख सोडून पुढील वर्षी किती, असे विचारल्यावर त्यांनी दाेन वर्षांसाठी याच रकमेचा विचार होईल, असे सांगितले. प्रतिनगरसेवकामागे ५० लाख असा हिशेब धरला तर १२७ नगरसेवकांसाठी ६५ कोटी हाेतात. हीच रक्कम दाेन वर्षांसाठी गृहीत धरली तर २५ लाख रुपये प्रतिवर्षी पडेल,असे दिसते. त्यानंतर पुढील वर्षी निधी मिळणार नाही का, अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू झाल्याने आयुक्तांनी पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकातील तरतुदी स्पष्ट करता येणार नाहीत, येणा-या उत्पन्नावरच सर्व अवलंबून राहील, असे सांगितले.

पुन्हासत्ताधा-यांची ‘कसोटी’ : आयुक्तांनी दोन वर्षांसाठी ५० लाख मिळतील, अशी शक्यता व्यक्त करणारी गुगली टाकल्याने उपस्थित सत्ताधारी तसेच नगरसेवकांनाही झटका बसल्याचे दिसत होते. निधीच्या मुद्द्यावर नगरसेवकांचा विराेध शमत नाही तोच वर्षीचे भवितव्य अंधारात असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले. त्यानंतर काहींनी यंदाच्या वर्षी ५० लाखांचा निधी पूर्णपणे खर्च हाेणार नाही, अशी शक्यता गृहीत धरून शिल्लक निधी पुढील वर्षी वर्ग करण्याचा आयुक्तांचा मनोदय असेल, असे सांगितले. तर, काहींनी रक्कम आताच द्यायची नसल्याने दोन वर्षांचा हिशेब करून देऊ, असा दावा केल्याचा कयास व्यक्त केला. चालू वर्षी नगरसेवकांना ५० लाखांचा निधी कबूल केल्याने तो सोडून पुढील वर्षी स्वतंत्र रकमेची तरतूद नगरसेवकांना अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर ५० लाख सोडून पुढील वर्षासाठी आयुक्त स्वत:च्या अंदाजपत्रकात किती रक्कम त्यासाठी देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यातून सत्ताधारी मनसेची मात्र स्थायी समितीपासून तर महासभेपर्यंत निधी वाढवण्यासाठी कसोटी लागेल.

अंदाजपत्रकातील आकड्यांवर मंदीचे सावट
गेल्यावर्षी आयुक्त खंदारे यांनी १८७५ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले होते. अर्थात, त्यात केंद्र राज्य शासनाच्या काही अनुदानाचा अंतर्भाव होता. ते वगळता १२०० कोटींपर्यंत अंदाजपत्रक पोहोचले होते. यंदाही संबंधित अनुदान वगळता अंदाजपत्रकाचा आकडा तितकाच असेल, असा अंदाज आयुक्त डॉ. गेडाम यांनी व्यक्त केला. अर्थात, कर वसुलीतील गळती थांबवली जाईल, असाही दावा त्यांनी केल्यामुळे किती महसूल वाढतो नगरसेवकांना किती दिलासा मिळतो, हेही बघणे महत्त्वाचे ठरेल.