आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

500 कोटींच्या रस्त्यांमुळे नाशिकला मिळणार ‘बायपास’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - खराब रस्ते व खड्डय़ांवरून ‘राष्ट्रवादी’ विरुद्ध ‘मनसे’ असे वाक्युद्ध रंगले आहे. दुसरीकडे, सिंहस्थ कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वरला जोडणार्‍या सहा मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचा 315 कोटी रुपयांचा निधी मंजुरीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेतील 200 कोटी व हा नवा निधी मिळून होणार्‍या सुमारे 500 कोटींच्या रस्त्यांमुळे नाशिकमार्गे त्र्यंबकला जाण्याऐवजी मुंबईकडून तसेच जळगावकडून किंबहुना गुजरातकडून येणार्‍या भाविकांना नाशिक शहराला ‘बायपास’ करून दर्शनासाठी जाणे सहज शक्य होईल.

कुंभमेळा दोन वर्षांवर आला असतानाही प्रशासकीय पातळीवरील हालचाली गतिमान झालेल्या नाहीत. अंदाजपत्रके तयार आहेत, मात्र साहेब निधीच मिळत नाही असे ठराविक उत्तरही अधिकार्‍यांकडून मिळत होते. मध्यंतरी भुजबळांनी प्रत्येक खातेप्रमुखांवर जबाबदारी सोपवत जोपर्यंत स्वतंत्र निधी मिळणार नाही तोपर्यंत राज्याच्या बजेटमधून आपआपल्या विभागाला मिळणार्‍या निधीतून सिंहस्थासाठी जास्तीतजास्त कामे प्रस्तावित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जलसंपदा खात्याने महापालिका क्षेत्रातील गोदावरीच्या घाट विकासकामांसाठी निधीही मिळवला. दोन वर्षावर सिंहस्थ आल्यामुळे वेगाने हालचाली केल्या नाही तर वेळेत कामे होणार नाही हे ओळखून राज्याच्या अंदाजपत्रकातून बांधकाम खात्याला मिळालेल्या निधीतील 315 कोटी रुपयांचा निधी सिंहस्थातील रस्त्यांसाठी मंजुरीच्या टप्प्यात आले. विधिमंडळात निधी नियोजनावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निधी मंजुरीबाबत बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी मौन बाळगले आहे. या रस्त्यांमुळे नाशिक-त्र्यंबक मार्गावरील ताण कमी होईल व आदिवासी पाड्यावरील रस्त्यांचे जाळे अधिकच विस्तारण्यास मदत होईल. रस्त्यांची कामे वेळेत करण्यासाठी त्र्यंबकला बांधकाम खात्याच्या दुसर्‍या उपविभागाचीही निर्मिती केली आहे. यापूर्वीच्या जिल्हा वार्षिक योजनेतील 200 कोटींचा निधी प्रस्तावित रस्त्यांना मिळण्याचे जवळपास निश्चित झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारीही रस्तोरस्ती नियोजनासाठी उतरले आहेत. मुख्य अभियंत्यांपासून कार्यकारी अभियंत्यांनी मुक्कामी दौरेही सुरू केले आहेत.

पावसाळ्यानंतर लगेचच कामे : रस्ते पूर्ण करण्यासाठी सर्वसाधारणपणे दोन वर्षांची मुदत असेल. महत्त्वाच्या रस्त्यांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आता तांत्रिक मान्यता व त्यानंतर इ-टेडरिंगची प्रक्रिया पूर्ण झाली की, पावसाळा संपल्यावर लगेचच कामे सुरू होतील, असे एका अधिकार्‍याने खासगीत बोलताना सांगितले. याव्यतिरिक्त खंबाळे, तुपादेवी येथे वाहनतळही उभारले जाणार आहे.

हे आहेत महत्त्वाचे रस्ते : नाशिक - त्र्यंबक चौपदरी रस्ता : 23 कि.मी. 0तुपादेवी - तळवाडे - त्र्यंबक : 15 कि.मी. 0म्हसरूळ - मखमलाबाद ते वाघेरे, त्र्यंबक : 50 कि.मी. 0विल्होळी - जातेगाव - अंजेनरी : 20 कि.मी. 0 घोटी - आहुर्ली - पहिने - त्र्यंबक : 55 कि.मी.

रस्त्यांची लांबी अशी असेल : 0गाव रस्ते : 10 मीटर (गरजेप्रमाणे) 0राज्य महामार्ग : सात मीटर 0 इतर रस्ते : साडेपाच मीटर


असे जा थेट त्र्यंबकला..
मुंबईहून येणार्‍या भाविकांना थेट त्र्यंबकेश्वरला जायचे असेल तर घोटी मार्गे आहुर्ली, पहिनेमधून त्र्यंबकला जाता येईल. घोटी सोडून पुढे आले तर पुन्हा विल्होळीहून जातेगाव, मुळेगाव मार्गे अंजनेरीजवळून नाशिक - त्र्यंबकच्या मुख्य रस्त्याला येता येईल. विमानतळ वा आग्रा महामार्गाने येणार्‍या भाविकांना ओझर, जानोरी, शिवनई मार्गे म्हसरूळकडे येता येईल. तेथून रिंगरोडने गिरणारे मार्गे वाघेरा, त्र्यंबकला जाता येईल. याच मार्गाने म्हसरूळजवळून गुजरातवरून येणार्‍या भाविकांना त्र्यंबकेश्वरला जाता येईल. याव्यतिरिक्त ओझर, सायखेडा, वावी अशा रस्त्यांच्या माध्यमातून शिर्डीलाही भाविकांना झटपट जाता येईल.