आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएच.डी. प्रवेश परीक्षेत 51 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दोन वर्षांपासून पीएच.डी.ची आस लावून बसलेल्या विद्यार्थ्यांना अखेर रविवारी पीएच.डी.ची प्रवेश परीक्षा झाल्याने दिलासा मिळाला आहे. काही अपवाद वगळता जवळपास सर्वच भावी संशोधकांनी परीक्षा दिल्याने नाशिकमधील चारही परीक्षा केंद्रे रविवारीही गर्दीने फुलून गेले होते. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा घेतल्याने रविवारीच परीक्षेचा निकालही जाहीर झाला असून, दोन हजार 791 म्हणजे 51 टक्के विद्यार्थी त्यात उत्तीर्ण झाले आहेत. पेपर देऊन घरी परतेपर्यंत परीक्षार्थींच्या हाती निकालही पडल्याने त्यांच्यात ‘कही खुशी, कही गम’चे वातावरण होते.

पुणे विद्यापीठाच्या वतीने पाच हजारपेक्षा अधिक जागांसाठी रविवारी 11 ते 1 या वेळेत पी.एचडी.साठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. शंभर प्रश्नांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. ऑनलाइन परीक्षा असल्याने जेथे संगणक उपलब्ध आहेत, अशाच महाविद्यालयांत तिचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमध्ये चार अभियांत्रिकी महाविद्यालयांत ही परीक्षा झाली. मातोश्री अभियांत्रिकीत मराठी आणि इंग्रजी प्रश्नांवरून निर्माण झालेला गोंधळ वगळता परीक्षा सुरळीत पार पडली.

राज्यभरातून 58 केंद्रांवर तीन हजार 90 पुरुष आणि दोन हजार 390 महिला असे पाच हजार 480 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. परीक्षेचा निकालही रविवारीच जाहीर केला असून, त्यात एक हजार 648 पुरुष आणि एक हजार 143 महिला असे दोन हजार 791 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्याचे बीसीयुडीचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी सांगितले. तसेच, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दुसर्‍या पेपरसाठी पात्र ठरले असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशकात 487 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा : नाशिकमध्ये चार केंद्रांवर झालेल्या परीक्षेस केवळ पंधराच विद्यार्थ्यांनी दांडी मारली. एकूण 502 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाशिकमधून अर्ज केले होते. त्यातील 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात मातोर्शी अभियांत्रिकी महाविद्यालयात 80 पैकी 77 जणांनी परीक्षा दिली. मविप्र अभियांत्रिकीत 225 पैकी 221, के. के. वाघ अभियांत्रिकीत 75 पैकी 11 जणांनी, तर गोखले अभियांत्रिकी महाविद्यालयात 122 पैकी 118 जणांनी परीक्षा दिली.

विशेष म्हणजे, अगदी निवृत्तीवर आलेल्या उमेदवारांनीही परीक्षा देण्यास अत्यंत उत्साह दाखविल्याने परीक्षा केंद्रांवर एक आगळेच वातावरण निर्माण झाले होते.