आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्ह्यातील दाेन घटनांत सहा जण बुडाले; दारणा नदीत चौघे तर कश्यपीत दोघे बुडाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांत सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. पहिल्या घटनेत दारणा नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या पळसे येथील चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी तिघांचे मृतदेह मिळाले असून एकाचा मृतदेह शोधण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तर दुसऱ्या घटनेत त्र्यंबकेश्वर येथील सेंट्रिंगचे काम आटोपल्यानंतर मित्रांसोबत कश्यपी धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या डीजीपीनगर (अंबड) येथील सूर्यकांत दिलीप खैरनार (वय २४) व भागवत ज्ञानेश्वर जाधव (वय २२) यांचा बुडून मृत्यू झाला.  
 
जयरामभाई हायस्कूलमध्ये आठवीत शिकणारे सोनू भालेराव, कल्पेश माळी, रोहित निकम तसेच के. जे. मेहता हायस्कूलमध्ये बारावीत शिकणारा गणेश डहाळे शुक्रवारी पळसे येथील स्मशानभूमीजवळील दारणा पात्रात दुपारी आंघोळीसाठी गेले होते. नदीपात्रात उतरल्यानंतर चौघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने व पाेहता येत नसल्यामुळे ते चाैघेही बुडाले. शनिवारी सोनू भालेराव, कल्पेश माळी आणि गणेश डहाळे यांचा मृतदेह अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिसांनी शोधला. मात्र, रोहित निकम हा पाण्यात वाहून गेला की खाली गाळात अडकला याबाबत शोध सुरु आहे.  
 
वाचविणाराही बुडाला
दुसऱ्या घटनेत, सूर्यकांत खैरनार व भागवत जाधव हे दोघे अजय गुजर, कुणाला पवार, विशाल वाघ, प्रवीण ठाकूर व रोहन कुमावत  यांच्यासोबत शनिवारी दुपारी कश्यपी धरणावर फिरण्यासाठी गेले होते. या वेळी पाण्यात उतरण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. सर्वात आधी सूर्यकांत पाण्यात  उतरला. मात्र पाण्याच्या खाेलीचा  अंदाज न आल्याने तो बुडू लागला. हे पाहून   त्याला वाचविण्यासाठी भागवत पुढे गेला. परंतु, तोही बुडाला. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी आरडाओरड केली. काहींनी जवळच असलेल्या खाडाची वाडी या गावात जाऊन घटनेची माहिती दिली. सूर्यकांतचा भाऊ घटनास्थळीच थांबला. काही मित्रांनी थेट नाशिक गाठले. दरम्यान, पाेलिस व अग्निशामक दलाची वाट न पाहता ग्रामस्थांनी शोधकार्य सुरु केले. त्यानंतर दोन्ही मृतदेह सायंकाळी उशिरा बाहेर काढण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...