आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकातील 6 तरुण कश्यपी धरणात बुडाले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक/ हरसल - वाढदिवस साजरा करण्यासाठी कश्यपी धरणावर गेलेले म्हसरूळ येथील सहा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने बुडाले. दोघांनी आरडाओरड केल्याने स्थनिक ग्रामस्थांनी त्यांना वाचवले, तर एकाचा मृत्यू झाला असून अग्निशामक दलातर्फे उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. अंधारामुळे अडथळा निर्माण होत असल्याने शोधकार्य थांबवण्यात आले.

स्नेहनगर येथील महेश मौले, पंकज भगरे, रितेश भगरे, अतुल चव्हाण, दर्शन झिरवाळ, शिवा पवार हे सहा मित्र दुचाकीने कश्यपी धरणावर वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. केक कापून झाल्यानंतर या तरुणांनी धरणामध्ये पोहण्यासाठी उड्या मारल्या. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. दर्शन झिरवाळ व शिवा पवार यांनी आरडाओरड केल्याने जवळच शेतावर काम करणार्‍या मजूर, ग्रामस्थांनी पाण्यात उड्या मारून त्यांना वाचवले; पण तोवर महेश मौले, पंकज भगरे, गीतेश भगरे, आणि अतुल चव्हाण हे दूरवर गेले होते. त्यामुळे ते हाती लागले नाहीत. रात्री अंधार पडल्यानंतर शोधण्यात अडचण येत असल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते. या चौघांपैकी एकाचा मृतदेह गाळात रुतलेला आढळून आल्याचे जवानांनी सांगितले. उर्वरित तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
नाशिक परिसरात शोक
रितेश आणि पंकज भगरे हे दोघे सख्खे भाऊ असून रितेशच्या वाढदिवसासाठी ते मित्रांसह धरणावर गेले होते. त्यांचे वडील मनपाच्या विद्यानिकेतन शाळा क्रमांक 9 मध्ये शिक्षक आहेत, तर महेश मौले, अतुल चव्हाण हे दोघे आर्य कन्या सोसायटीमधील रहिवासी आहेत. केटीएचएम महाविद्यालयात चौघेही अकरावी तर दोघे बारावीत शिक्षण घेत होते.