आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार देवयानी फरांदे यांच्या आदेशानंतर ६३० रेशनकार्ड तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सेतूधान्य वितरण विभागातील असमन्वयामुळे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित असलेल्या अकराशे रेशनकार्डच्या वितरणाचा मार्ग नवनिर्वाचित आमदार देवयानी फरांदे यांनी संबंधित विभागाला धारेवर धरल्यानंतर अखेर मोकळा झाला. दरम्यान, उर्वरित ४७० कार्डदेखील त्वरित एक-दोन दिवसांत वितरणासाठी तयार होणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डी. बी. जवंजाळ यांनी सांगितले.

रेशनकार्ड वितरणाची जबाबदारी तहसीलदार आणि शहर धान्य वितरण विभागाची आहे. मात्र, अर्ज स्वीकृती त्याची संपूर्ण प्रक्रिया करून हे प्रकरण स्वाक्षरी रेशनकार्डसाठी तयार करण्याची जबाबदारी सेतूची आहे. परंतु, शहर धान्य वितरण विभागाकडे दरम्यानच्या काळात कर्मचाऱ्यांची वानवा निवडणुकीचा कालावधी यामुळे १,१०० रेशनकार्ड प्रलंबित होते. त्यामुळे धान्य वितरण विभागाने सेतू संचालकांनाच तुम्ही कोरे रेशनकार्ड घेऊन जाऊन ते संबंधित नागरिकांच्या नावाने तयार करा. केवळ स्वाक्षरीसाठी तुम्ही ते धान्य वितरण अधिकाऱ्यांकडे पाठवावे, अशी अटकळ घातली होती. त्यावरून दोन्ही यंत्रणांमध्ये बेबनाव सुरू होता. त्याची झळ सर्वसामान्यांना बसली.
१५ दिवसांत देण्यात येणारे रेशनकार्ड सहा महिने उलटूनही मिळत नसल्याने नागरिकांची ओरड सुरू झाली. त्यावर मध्य नाशिकच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनीच बैठक घेतली. त्यात त्यांनी रेशनकार्ड त्वरित वितरणाचे आदेश देतानाच, दिरंगाई झाल्यास कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर लगेचच ६३० रेशनकार्ड तयार करण्यात आले.

सेतूमार्फत एसएमएस
वारंवारजिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरे झिजवून थकून गेलेल्या अर्जदारांनी आता पुन्हा फेऱ्या मारणे बंद केले आहे. त्यामुळे ज्यांचे रेशनकार्ड तयार होईल, त्यांना सेतूमार्फत एसएमएस पाठविला जाणार आहे. तसे आदेशही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी एसएमएस मिळताच कार्ड घेण्यासाठी धान्य वितरण कार्यालयात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.