आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांवरील दडपशाहीविराेधात जिल्ह्यातील ८० टक्के शाळा बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आैरंगाबाद येथे विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी खासगी संस्थांनी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनास गुरुवारी (दि. ६) चांगला प्रतिसाद लाभला. जिल्हाभरातील ६०० हून अधिक शाळा बंद ठेवून पाच हजार शिक्षकांनी सरकारच्या कारवाईचा निषेध नोंदवला. दरम्यान, विनाअनुदानित शाळांना त्वरित अनुदान द्यावे, शिक्षकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन शिक्षकांची सुटका करावी, अशी मागणी करत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नवनाथ आैताडे यांना निवेदन देण्यात आले.
राज्यातील सर्व विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे, या मागणीसाठी विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनी आैरंगाबाद येथे मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मोर्चा काढला होता. त्या मोर्चावर पोलिसांनी अमानुषरीत्या केलेल्या लाठीहल्ल्यात अनेक शिक्षक गंभीर जखमी झाले. शिक्षकांनी शांततेत लोकशाही मार्गाने काढलेला मोर्चा दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारच्या हुकूमशाही कारभाराविरोधात विनाअनुदानित शाळांसह अनुदानित शाळांनीही बंदमध्ये सहभाग घेतला. जिल्हाभरातील ८० टक्के, म्हणजे ६०० हून अधिक शाळा बंद ठेवून निषेध नोंदवल्याची माहिती खासगी शिक्षण संस्था महामंडळाचे विभागीय अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी दिली. शहरातील इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांचा अपवाद वगळता बहुतांश शाळांनी बंदमध्ये सहभाग घेतला.

अनेक शाळांनी सूचनाफलकावर सरकारच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत शाळा बंद असल्याची माहिती नोंदवली होती. अनेक विद्यार्थ्यांना शाळेत आल्यावर बंदबाबत माहिती समजल्याने ते परत निघून गेले. एकंदरीत हे अांदाेलन यशस्वी झाल्याचे चित्र हाेते.
शिक्षकांच्या अांदोलनाची कोणतीही दखल घेता सरकारने केलेल्या दडपशाहीविरोधात विनाअनुदानित शिक्षकांनी एकत्र येत कृती समिती स्थापन करून शिक्षणाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. जिल्हा परिषदेजवळ शिक्षकांनी एकत्र येत निषेध नोंदवला. यावेळी आमदार डॉ. अपूर्व हिरे, अामदार डाॅ. सुधीर तांबे, कोंडाजी आव्हाड, खासगी प्राथमिक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र निकम, रमेश अहिरे, नंदलाल धांडे, सुनील बिरारी, नितीन पाटील, साहेबराव कुटे, श्याम पाटील आदींसह ४०० ते ५०० शिक्षक उपस्थित होते.

शिक्षक काढणार उद्या मूक मोर्चा
दडपशाहीच्या मार्गाने अांदाेलन उधळून लावण्यासाठी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शनिवारी (दि. ८) मूक मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात जिल्हाभरातील शिक्षक सहभागी होणार असून, सरकारचा निषेध नोंदवणार आहेत. विनाअनुदानित शाळांना अनुदान दिल्यास बेमुदत शाळा बंद ठेवण्याचा इशाराही यावेळी खासगी संस्थाचालकांकडून देण्यात आला. दुपारी वाजता डोंगरे वसतिगृह मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार आहे.
बातम्या आणखी आहेत...