नाशिक - एकीकडे शहरात गुन्हेगारी वाढली असताना दुसरीकडे मात्र वाहतूक शाखेसारख्या महत्त्वाच्या विभागात नियुक्ती मिळविण्यासाठी पाेलिसांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगल्याचे चित्र दिसून येत अाहे. त्यातून शुक्रवारी ८० पाेलिस कर्मचाऱ्यांची वाहतूक शाखेत बदली करण्याच्या यादीवरून नवीन जुना असा वाद पाेलिस मुख्यालयांतर्गतच पेटल्याचे वृत्त अाहे.
पाेलिस अायुक्त जगन्नाथन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे अस्वस्थतेचे वातावरण तयार झाले हाेते. मात्र, काही दिवसातच त्यांनी विस्कळीत झालेली घडी बसविण्यासाठी प्रयत्न सुरू केले अाहेत. सिंहस्थ कुंभमेळा ताेंडावर असल्यामुळे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचे अाव्हान अाहे. त्यादृष्टीने पाेलिस ठाण्यातील प्रस्थापितांची खांदेपालट करण्याची प्रक्रिया सुरू झाली अाहे. त्याचाच एक भाग म्हणून मे महिन्यात हाेणाऱ्या पाेलिसांच्या बदल्यांकडे सर्वांचेच लक्ष लागले अाहे.
पहिल्या टप्प्यात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ८० कर्मचाऱ्यांच्या वाहतूक शाखेत बदल्या झाल्या अाहेत. या बदल्यांमुळे अपुऱ्या मनुष्यबळाची अाेरड असलेल्या वाहतूक विभागाला चांगलाच फायदा हाेणार अाहे. मात्र, अार्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या वाहतूक विभागात बदली करून घेण्यासाठी माेठे लाॅबिंग झाल्याची चर्चा जाेर धरू लागली अाहे. त्यात नियमांचे उल्लंघन झाल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.
खासकरून सहायक पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या करताना यापूर्वी ज्यांनी वाहतूक विभागात सेवा केली, त्यांना पुन्हा संधी दिली गेल्याचे सांगितले जाते.
प्रस्थापितांची मक्तेदारी माेडल्याचा दावा : नियमानुसार एका विभागात काम केल्यानंतर दुसऱ्यांदा नियुक्ती देता येत नाही. दुसरीकडे सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अनुभवी पाेलीस अधिकाऱ्यांची वाहतूक शाखेला गरज असल्यामुळे नियमाला काही प्रमाणात शिथिलता देऊन बदल्या झाल्याचे अधिकारी खासगीत सांगत अाहेत. याबराेबरच अांतरजिल्हा बदलीतून पाेलीस मुख्यालयात अालेल्या नवीन कर्मचाऱ्यांना वाहतूक शाखेचा पदभार देण्याची मेहरबानी हा अाक्षेपाचा मुद्दा ठरली अाहे. त्यामुळे मुख्यालयात काम करणाऱ्या काही ज्येष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये असंताेष असून, नियमानुसार मुख्यालयात नवीन कर्मचाऱ्यांना पाच वर्षे काम करण्याची अट का शिथिल केली, असाही सवाल केला जात अाहे.
नवीन कर्मचाऱ्यांना शहराची पूर्ण माहिती नसल्यामुळे सिंहस्थाच्या नियाेजनात अडचणी येतील, अशी भीती व्यक्त केली जात अाहे. दुसरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र प्रस्थापितांची मक्तेदारी माेडण्यासाठी नवीन कर्मचाऱ्यांच्या हाती सुकाणू दिल्याचा दावा केला अाहे. पाेलिस दलातील अंतर्गत वादाची किनार लाभल्यामुळे बदल्या चांगल्याच चर्चेत अाल्या अाहेत. पाेलिस अायुक्तालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत चांगलीच चर्चा रंग धरू लागली अाहे.
नवीन कर्मचारीही सक्षम...
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेत काही महत्त्वपूर्ण बदल केले अाहेत. त्यात प्रस्थापितांची मक्तेदारी माेडीत काढण्याचा प्रयत्न केला अाहे. कर्मचारी नवीन असेल तरी कामकाज करण्यासाठी सक्षम अाहे. काेणतीही अडचण येणार नाही. निसार तांबाेळी, उपायुक्त,प्रशासन
१२० कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकडे लक्ष...
शनिवारी रात्री उशिरा पाेलिस अायुक्तालयातील १२० कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात हाेती. या बदल्यांमध्ये अायुक्तालयातील काेणा-काेणाला महत्त्वाची नियुक्ती मिळते वर्षानुवर्ष एकाच विभागात ठाण मांडलेल्या प्रस्थापितांची कशी गच्छंती हाेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले हाेते.