आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाहतूक करणाऱ्या अॅपेला कंटेनरची धडक; सात जण ठार; तीन अपघातांत पंधरा बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा (जि. नाशिक)- क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपेरिक्षाला पुलावरील अवघड वळणावर भरधाव कंटेनरने समाेरून जाेराची धडक दिली. गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास सटाणा - मालेगाव रस्त्यावर शेमळी गावाजवळ झालेल्या या अपघातात अॅपेरिक्षाचालकासह सात प्रवासी जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, अॅपेरिक्षा चक्काचूर झाली. प्रवाशांचे मृतदेह इतरत्र फेकले जाऊन रक्ताचा सडाच पडला होता. अपघातानंतर कंटेनरचालक वाहनासह फरार झाला. मृतांत परराज्यातील काही व्यापाऱ्यांचा समावेश हाेता.  


सटाणा येथील देवमामलेदार यात्रेनिमित्त आलेले व्यापारी माल घेण्यासाठी मुंबई येथे गेले होते. गुरुवारी पहाटे ते माल घेऊन बसने मालेगाव येथे आले. मालेगावहून संजय दामुआप्पा पंधाडे (४०, अयोध्यानगर, मालेगाव) यांची अॅपेरिक्षा (एमएच ४१ व्ही १५५९) भाड्याने घेतली हाेती. तेथून यात्रेच्या ठिकाणी जात असताना शेमळीजवळील सुकड पुलाजवळील अवघड वळणावर अॅपेरिक्षाला भरधाव कंटेनरने धडक दिली. या अपघातात रिक्षातील सात जण ठार झाले. यावलहून सटाण्याकडे परतणाऱ्या रुग्णवाहिकेचे चालक कल्पेश निकम यांना हा अपघात दिसला. त्यांनी पाेलिसांना फाेनवरून माहिती दिली. मृतांमध्ये अॅपेचालक संजय दामुआप्पा पंधाडे (४०, , मालेगाव), अलीम शेख तायर (३४, चोपडा, जळगाव), अशोक शंकर देवरे (५५, अमळनेर), राजेशकुमार शंकरदास गुप्ता (२८), कैलास प्रसाद अर्जुन (२८),  मोहंमद जल्लू मोहंमद लखन (४०, सर्व रा. करमपुरा, ता. तलसाडी, जि. साहेबगंज, झारखंड), रहेमतुल्लाभाई गोहर आशमी पानवाला (६०, इनामपूर, ता. कोठान, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.  


पैसे गाेळा करून पाठवले मृतदेह गावी  
मृतांतील सहा व्यावसायिकांपैकी तिघे झारखंडचे, तर एक उत्तर प्रदेशातील रहिवासी हाेता. या घटनेची माहिती कळताच देवमामलेदार यात्रेतील दुकाने बंद ठेवण्यात अाली.  नागरिकांसह देवमामलेदार ट्रस्ट, नगराध्यक्ष अार्थिक मदत करून ७८ हजार रुपये जमवले. या पैशातून परराज्यातील व्यापाऱ्यांचे मृतदेह त्यांच्या गावी पाठवण्यात अाले. मृत रहेमतुल्लाभाई गोहर आशमी पानवाला हे यात्रेत गेल्या २५ वर्षांपासून बनारस व कलकत्ता पान विक्रीचा व्यवसाय करीत होते. लाल कपड्यांमधील बनारस पानवाला बाबा या नावाने ते परिचित होते.


शहादा; शहाद्यात ट्रकची रिक्षाला धडक; पाच जण ठार  
नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद-आमोदा रस्त्यावर मिनी ट्रक व अॅपेरिक्षाची धडक झाली. यात ५ ठार, १३ प्रवासी जखमी झाले. हे सर्व भोंगरा येथे इंदेल हा धार्मिक कार्यक्रम आटाेपून पुन्हा तलावडीकडे (ता. शहादा) जात होते. मृतांपैकी ४ तलावडीचे आहेत. अॅपेरिक्षात १८ प्रवासी बसलेले हाेते. म्हसावद फाट्यापासून ५०० मीटर अंतरावर मक्याच्या पोत्यांनी भरलेल्या मिनी ट्रकने अॅपेला जाेराची धडक दिली. अरुंद रस्त्यावर ट्रकचालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  मृतांत रिक्षाचालक संजय रायमल पावरा (३२), गोरख इंदा पावरा (४०), गुलाब फकिरा पावरा (५५), शिकाऱ्या पाच्या पावरा (७०), रोहिदास कमा पावरा (६५) यांचा समावेश अाहे. 


नागपूर; गाेंदियात दुचाकी व्हॅनवर धडकली; तीन ठार  
पंपावरून पेट्रोल भरून रस्त्यावर येत असलेल्या व्हॅनला भरधाव दुचाकीची धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील महिलेसह तीन जण ठार झाले. ही घटना गुरुवारी सकाळी गाेंदिया शहरामध्ये घडली. रमेश लाखन रिनाईत (४८), त्याची आई कमलाबाई (६५) असे दोघे जण या अपघातात जागीच ठार झाले, तर मागे बसलेला चुलत भाऊ राजेश मन्साराम रिनाईत (३८) हा गंभीररित्या जखमी झाला. दरम्यान, नागपूरच्या एका रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचीही प्राणज्याेत मालवली. अपघातग्रस्त व्हॅन व दुचाकीची रस्त्यावर अन्य एका दुचाकीला धडक बसून तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांवर गोंदियात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिली.   

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, या अपघातांची भीषणता दर्शवणारे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...