आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; कुंभमेळ्याला वैश्विक मान्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातल्या सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या भारतातील सिंहस्थ कुंभमेळ्याला युनेस्कोच्या मान्यतेमुळे खऱ्या अर्थाने वैश्विक परिमाण प्राप्त झाले आहे. संयुक्त राष्ट्र संघटना अर्थात युनोचे एक अंग असलेली युनेस्को प्रामुख्याने संपूर्ण जगभरातल्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांसाठी कार्यरत असते. अशा संघटनेकडून आता कुंभमेळा हा भक्त आणि भाविकांचा जगातला सर्वात मोठा धार्मिक उत्सव असल्याचे शिक्कामोर्तब झाल्याने समस्त भारतीयांसाठी ते अभिमानास्पद ठरावे. कुंभमेळ्यासाठी प्रचंड संख्येने लोक एकत्र जमत असतानाही बहुतकरून हा उत्सव शांततेत पार पडत असल्याचे युनेस्कोने आवर्जून नमूद केले आहे, हे विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे.  


धार्मिकदृष्ट्या कुंभमेळ्याला असलेले महत्त्व कोणत्याही भारतीयाला वेगळे सांगायला नको. दर तीन वर्षांतून एकदा याप्रमाणे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसह अलाहाबाद (प्रयाग), हरिद्वार आणि उज्जैन या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. या प्रत्येक ठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्याला देशभरातून कोट्यवधी भाविक हजेरी लावतात. शतकानुशतके हिंदू धर्मामध्ये ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. आज प्रत्येकाच्या हाताशी दळणवळणाच्या मुबलक सुविधा आणि आधुनिक संपर्क साधने असल्याने एखाद्या प्रसंगी एकत्र जमण्यासाठी त्याचा प्रभावी वापर करून घेणे शक्य आहे. मात्र, ज्या वेळी अशी कुठलीही साधने उपलब्ध नव्हती आणि प्रत्यक्ष दूत अथवा निरोप्यामार्फत संदेश पोहचवावे लागत होते तेव्हापासूनच हा उत्सव भव्य दिव्य स्वरूपात पार पडत आला आहे, हे विशेष. देव-दानवांमधील अमृत मंथनानंतर गरूड अमृतकुंभ वाहून नेत असताना वरील ठिकाणी नद्यांच्या प्रवाहात त्यातील चार थेंब सांडल्याने विशिष्ट कालावधीत या ठिकाणी स्नानाचा लाभ घेतल्यास माणसाची पापे धुवून निघतात या श्रद्धेतून अक्षरश: कोट्यवधीच्या संख्येने भाविक कुंभमेळ्याला हजेरी लावतात. अमृतकुंभाच्या अाख्यायिकेबरोबरच धार्मिक संघटन दाखवून देण्याचाही एक प्रमुख उद्देश कुंभमेळ्यामागे आहे. कालौघात होत असलेली परधर्माची आक्रमणे पाहता अशा प्रकारे हिंदूंच्या संघटनशक्तीचे प्रदर्शन करण्याचा विचारही कुंभमेळ्याची परंपरा सुरू करण्यामागे असावा. त्यामुळेच शाही स्नान आणि त्याप्रसंगी निघणाऱ्या साधूंच्या विविध आखाड्यांच्या सशस्र मिरवणुका ही कुंभमेळ्याची प्रमुख वैशिष्ट्ये गणली जातात. कुंभमेळ्याचे आयोजन हे मुख्यत: आखाडा परिषदेमार्फत केले जाते. अगदी नागा साधूंपासून शैव आणि वैष्णव पंथियांच्या १२ आखाड्यांचे प्रतिनिधित्व ही परिषद करते.

 

 सुरूवातीपासून ही प्रथा धर्माशी निगडित असल्याने त्याबरहुकूमच कुंभमेळ्याचे आयोजन होत आले आहे. म्हणून आजच्या नागर जीवनापेक्षा कुंभमेळ्यातील शाही मिरवणुका आणि शाही स्नानादी बाबी काहिशा हटके ठरतात आणि हीच बाब कुंभमेळ्यांचा ‘युएसपी’ बनून गेली आहे. त्यामुळेच तरुणाईला देखील कुंभमेळ्याबद्दल तेवढेच आकर्षण वाटते. किंबहुना, नवी पिढी आधुनिक संपर्क साधनांच्या माध्यमातून कुंभमेळ्याचे अवकाश विस्तारू पाहात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्यात स्थानिक टेक्नोसॅव्ही तरुणांनी एकत्र येऊन ‘कुंभथॉन’च्या माध्यमातून आयोजनाला हातभार लावला होता. त्या पुढचे पाऊल म्हणून कुंभमेळ्याला वैश्विक मान्यता मिळावी या हेतूने त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त ललिता शिंदे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या वतीने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला एक प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार केंद्रीय समिती स्थापन झाली आणि त्या माध्यमातून कुंभमेळ्याच्या संदर्भासाठी आवश्यक असणारे प्राचीन ग्रंथ, साहित्य, छायाचित्रे, चित्रफिती याचे सादरीकरण युनेस्कोकडे केले गेले. त्याच आधारे युनेस्कोने भारतीय कुंभमेळ्याचा समावेश आता आपल्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत केला आहे. त्याचे श्रेय नाशिककरांच्या कार्यप्रवणतेला प्रामुख्याने द्यायला हवे. युनेस्कोच्या यादीत कुंभमेळ्याचा समावेश झाल्याने  येत्या काळात विदेशी पर्यटक, अभ्यासकांचा ओघही कुंभमेळ्याकडे वाढण्याची चिन्हे आहेत. ही बाब आपल्यासाठी निश्चितच आनंददायी असली तरी त्यातून आता कुंभमेळ्याच्या अधिक नेटक्या नियोजनाची आणि मुख्य म्हणजे या ठिकाणच्या नद्यांची स्वच्छता आणि पावित्र्य जपण्याची आपली जबाबदारीही आणखी वाढणार आहे. त्यादृष्टीने शासन स्तरावरून कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी ठोस आराखडा, गर्दी व्यवस्थापनासाठीच्या सोई-सुविधा, निधीची उपलब्धता आणि काटेकोर नियोजनाला गती मिळायला हवी. तसे झाले तर कुंभमेळ्याचे वैश्विक अधिष्ठान अधिक मजबूत होईल. 


- अभिजित कुलकर्णी, डेप्युटी एडिटर, नाशिक

बातम्या आणखी आहेत...