आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवाच्या धसक्याने भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे राज्याकडे लक्ष;शहांच्‍या उपस्थितीत मुंबईत मेळावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राजस्थान, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांतील लोकसभा पोटनिवडणुकांत झालेल्या पराभवाच्या धसक्यानंतर भाजपने आता पुढील वाटचालीच्या दृष्टिकोनातून रणनीती आखायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपच्या वतीने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 


म्हणूनच भाजपच्या स्थापनादिवशी म्हणजे आगामी ६ एप्रिल रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या सर्व आघाड्यांचा मुंबईमध्ये एकत्रित मेळावा आयोजित केला जात आहे. त्यासाठी ३१ मार्च ते ४ एप्रिल हे संघटन पर्व म्हणून जाहीर करण्यात आले असून, ६ एप्रिलला होणाऱ्या भव्य मेळाव्यात प्रचंड शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. ईशान्य भारतात मिळालेल्या  विजयामागे पक्षाकडून अनेक वर्षांपासून सुरू असलेले पक्ष संघटनेचे कामच उपयोगी ठरल्याचे सर्वच भाजपजनांनी मान्य केले आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश या हक्काच्या समजल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपला अनपेक्षित धक्का बसला. २२ राज्यांत कमळ फुलवण्याची कामगिरी ज्या मोदी लाटेमुळे भाजपने केली, ती मोदी लाट किंवा मोदी करिष्मा या एकमेव घटकावर अवलंबून न राहता, पक्ष संघटना हीच यशाची गुरुकिल्ली असल्याची भावना भाजपत निर्माण झाली आहे.  त्यातूनच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा अनेक वर्षे शक्तिप्रदर्शनाचे व संघटन बांधणीचे महत्त्वाचे माध्यम ठरला होता. त्याच धर्तीवर भाजपच्या स्थापनादिवशी, ६ एप्रिल रोजी मुंबईत होत असलेल्या या मेळाव्याच्या माध्यमातून भाजप आपले संघटन बळकट करण्याच्या कामाला लागले आहे.   

 

विविध आघाड्या लागल्या कामाला   
भाजप महिला मोर्चा, युवा मोर्चा, उद्योजक आणि व्यावसायिक आघाड्या, अनुसूचित जाती आघाडी, जमाती आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, माजी सैनिक आघाडी या सर्व शाखा कामाला लागल्या असून, सर्वांनी आपापल्या पदाधिकारी नियुक्त्यांना आणि संघटन बांधणीला सुरुवात केली आहे. ३१ मार्च ते ४ एप्रिल या संघटन पर्वानिमित्ताने या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी त्यांच्या कार्यकर्त्यांनी संघटित करून ६ एप्रिलच्या मेळाव्यात सहभागी होण्याबाबत चालना देत आहेत. हा मेळावा म्हणजे आगामी वर्षात होऊ घातलेल्या निवडणुकीची थेट तयारी असल्याचे बोलले जाते.

 

बातम्या आणखी आहेत...