आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'संदर्भ'मधील बायपास शस्त्रक्रियेला लागणारी यंत्रणा ठप्प, रुग्णांचे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील हृदयरोग विभागाशी संबंधित असलेली यंत्रणेत बिघाड येत असल्याने त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. गेल्या दहा दिवसांपासून रुग्णालयातील बायपास शस्त्रक्रियेला लागणारी यंत्रणा अचानक बंद पडल्याने रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर रुग्णांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. संदर्भ रुग्णालयात दररोज तीन ते चार बायपास शस्त्रक्रिया होतात. त्या आता पूर्णपणे ठप्प झाल्याने उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातून येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहे. 


राज्य शासनाकडून २००८ मध्ये नाशकात उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा पुरविण्याच्या हेतूने विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुरू केले आहे. या रुग्णालयात केवळ उत्तर महाराष्ट्रातीलच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातूनही नागरिक उपचारासाठी येतात. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा सर्वाधिक लाभ या रुग्णालयाने रुग्णांना प्राप्त करून दिला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रुग्णालयातील अनेक यंत्रणा वारंवार बंद पडत असल्याचे चित्र आहे. या रुग्णालयात मूत्रपिंड, कॅन्सर, हृदयाशी संबंधित विकारांवरच उपचार केला जातो. यात सर्वाधिक हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया या रुग्णालयात केल्या जातात. खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येणारी बायपास शस्त्रक्रियाही संदर्भ रुग्णालयात दररोज केली जाते. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागामधील तीन अतिमहत्त्वाच्या यंत्रणा अचानक बंद पडली आहे. त्यामुळे या रुग्णालयातील बायपास शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद पडल्या अाहेत. या रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या रुग्णांना दररोज शस्त्रक्रियेची 'तारीख पे तारीख' दिली जात आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रासह इतर भागातून अालेल्या रुग्णांचे हाल हाेत अाहेत. या रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत अाहे. 


मुंबईला जाण्याचाही सल्ला 
संदर्भ रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून दाखल असलेले काही रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मुंबईत जाण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच काही रुग्णांना नातेवाइकांनी खासगी रुग्णालयात दाखल करून घेतल्याचीही माहिती समोर आली. 


यंत्रणा तातडीने दुरुस्त, लवकरच होणार शस्त्रक्रिया... 
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील हृदयरोग विभागाच्या शस्त्रक्रीया विभागातील काही यंत्रणा बंद पडली होती. ती यंत्रणा तातडीने दुरुस्त करण्यात आली आहे. लवकरात लवकर बायपास शस्त्रक्रिया सुरू होणार आहे. रुग्णांकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जाईल या रुग्णालयात अालेल्या एकाही रुग्णाचे हाल होऊ देणार नाही. 
- डॉ. राजेश कोशिरे, वैद्यकीय अधीक्षक, संदर्भ रुग्णालय


बायपाससाठी लागणारा भूलतज्ज्ञ उपलब्ध नाही 
संदर्भ रुग्णालयात होणाऱ्या बायपास शस्त्रक्रियांसाठी यंत्रणा तर बंद पडलीच आहे, त्याचबरोबर शस्त्रक्रियेदरम्यान लागणारा भूलतज्ज्ञही उपलब्ध नसल्याने शस्त्रक्रियेत अडचणी येत आहेत. यामुळे गेल्या दहा दिवसांपासून रुग्णालयात बायपास शस्त्रक्रियेसाठी रुग्ण दाखल करणे बंद करण्यात अाले अाहे. त्याचबरोबर ज्या रुग्णांना दाखल करून घेतले आहे अशा रुग्णांना मंुबई किंवा खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिला जात आहे. 


रुग्णालयात १६ नवीन एसी 
गेल्या वर्षांपासून विभागातील वातानुकूलित व्यवस्था वारंवार बंद होत असल्याने रुग्णांचे हाल होत होते. यामुळे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाचा पदभार डॉ. कोशिरे यांनी स्वीकारताच रुग्णालयाच्या हृदयरोग विभागात १६ नवीन एसीची व्यवस्था केली. त्याचबरोबर रुग्णालयात असलेल्या लिफ्ट वारंवार बंद पडत होत्या. यामुळे रुग्णांना जिन्याने वरच्या मजल्यावर जावे लागत होते. यामुळे रुग्णालयातील मुख्य लिफ्टची दुरुस्ती करत तीही रुग्णांसाठी सुरू करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...