आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एमसीए'साठी 24 मार्चला सीईटी, अर्जासाठी उद्या संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य असून, राज्य शासनातर्फे येत्या २४ मार्च रोजी एमसीएसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, सोमवार (दि. ५)पर्यंत अर्ज करण्याची शेवटची संधी असेल. एमसीए शिक्षणक्रमानंतर विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अॉनलाइन अर्ज करावे. ऑनलाइन अर्ज व प्रवेश परीक्षेविषयी डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. श्रीराम झाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


इंजिनिअरिंग, फार्मसी यांसह सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य शासनातर्फे सीईटी परीक्षा घेतल्या जातात. एमसीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य असते. सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र ठरत नाही. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. ५ मार्चपर्यंत विहित मुदतीत अर्ज करून प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू अाहे. बहुपर्यायी स्वरूपात होणाऱ्या या परीक्षेसाठी २०० गुण असतील. निगेटिव्ह मार्किंग असल्याने विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक प्रश्नांची उत्तरे लिहावीत. ऑनलाइन स्वरूपात ही परीक्षा होणार असून, त्यासाठी ९० मिनिटांचा वेळ असेल. विद्यार्थ्यांना १५ ते २४ मार्च रोजी हॉल तिकीट उपलब्ध होतील. २४ मार्च रोजी परीक्षा होईल. तर ३ एप्रिल रोजी निकाल जाहीर होईल. या प्रवेश परीक्षेविषयी मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून देण्यात आले अाहे. विद्यार्थ्यांना संपर्क साधावा, असे आवाहन इन्स्टिट्यूटचे समन्वयक महेश कुलकर्णी यांनी केले. यावेळी विभागप्रमुख प्रा. अपर्णा हवालदार, प्रा. नितीन चौधरी, प्रा. संजय साळवे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. सतेज चिटकुले, प्रा. वैशाली निकम आदी उपस्थित होते. 


एमसीएच्या राज्यात सात हजार जागा 
एमसीए अभ्यासक्रमाच्या राज्यभरातील विविध महाविद्यालयांत सात हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. मागील वर्षी १२ हजार विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली होती. त्यातील तब्बल ५० टक्क्यांहून अधिक जागा म्हणजेच ३७०० जागा रिक्त राहिल्या होत्या. सीईटी झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा न दिल्यामुळे प्रवेशापासून वंचित रहावे लागले होते. त्यामुुळे यंदा विद्यार्थ्यांना सीईटी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...