आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकाेत पिण्याच्या पाण्यात जंतू व किडे; नागरिक संतप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- सिडकोतील महाकाली चौक व साईबाबानगर भागात नळातून पिण्याच्या पाण्यात जंतू व किडे येत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळा सुरू झाला नाही तरीही पाण्याची अशी समस्या निर्माण झाल्याने महिला व नागरिकांनी मनपाच्या बेजबाबदार कारभारावर संताप व्यक्त केला आहे. याबाबत तत्काळ दखल न घेतल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 


प्रभाग २९ मधील महाकाली चौक व साईबाबानगर भागात दोन दिवसांपासून पिण्याच्या पाण्यात जिवंत जंतू व किडे येत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर अशाप्रकारचा पाणीपुरवठा होत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. अगोदरच वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार पसरले असताना दूषित पाण्यामुळे नवीन आजाराला आमंत्रण मिळत आहे. याबाबत नागरिकांनी नगरसेवक मुकेश शहाणे यांना कळविले असता त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून तपासणी केली. मात्र, असा गंभीर प्रकार घडतोच कसा? याबाबत नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी सुनंदा हाडोळे, अनिता शेळके, चंदा गायकवाड, प्रवीण सांगळे, सुनंदा जाधव, शिवांगी सोनार, कुसुम मते, संगीता पाटील आदींसह नागरिकांनी याबाबत तत्काळ दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे परिसरातील नागरिकांनी सताप व्यक्त केला. 


परिसरात दाेन दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा 
सिडकोतील साईबाबानगर अाणि महाकाली चौक भागात पिण्याच्या पाण्यात किडे व जंतू अाढळले अाहेत. हे दूषित पाणी नगरसेवक मुकेश शहाणे यांना दाखविताना महिला. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून अांदाेलनाचा इशारा नागरिकांनी दिला अाहे. 


नागरिक काय म्हणतात? 
मनपा अधिकाऱ्यांनी पाणी प्यावे 

पाण्यातील जंतू व किडे पाहूनच भीती वाटली. असे पाणी प्यायले तर आजार पसरतील. याबाबत मनपाचा बेजबाबदारपणा उघड होतो. हे पाणी अधिकाऱ्यांनी प्यावे म्हणजे गांभीर्य कळेल. 
- संगीता पाटील, नागरिक 


नगरसेवक काय म्हणतात? 

तत्काळ दखल घेतली जाईल 
नागरिकांची तक्रार येताच मी घटनास्थळी पाहणी केली. मनपा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना बोलावून याबाबत चौकशी करून योग्य प्रकारचा पाणीपुरवठा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. 
- मुकेश शहाणे, नगरसेवक प्रभाग-२९ 

बातम्या आणखी आहेत...