आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियामुळे त्रस्त महिलांसाठी महिला आयोग स्थापन करणार सायबर डेस्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्य महिला आयोगाकडे येणाऱ्या महिलांच्या तक्रारींमध्ये सोशल मीडियामुळे बदनामी होत असल्याच्या आणि अडचणीत सापडलेल्या महिलांचे प्रमाण अधिक आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष सायबर सेल सुरू करणार असल्याची आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.

 

सध्या सायबर क्राइमचे आणि त्यात पीडित महिलांचे प्रमाण वाढत आहे. आयोगापर्यंत पोहोचणाऱ्याही अनेक महिला भीतीपोटी अधिकृतपणे तक्रारी दाखल करण्यास तयार नसतात. प्रत्यक्ष घडणाऱ्या पोलिसांपर्यंत पोहोचणाऱ्या तक्रारींचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याचे अनुभव रहाटकर यांनी सांगितले.

 

सोशल मीडियावरून फोटो किंवा आक्षेपार्ह मजकुराच्या माध्यमातून महिलांची बदनामी करण्याच्या तसेच त्यांना ब्लॅकमेल करण्याच्या घटना गतीने वाढत आहेत. सामाजिक प्रतिष्ठेमुळे तक्रारदार महिला तपास यंत्रणांपर्यंत पोहोचत नसल्याचे अनेक अनुभव आहेत. त्यामुळे लवकरच सायबर डेस्क स्थापन केला जाईल. हेल्पलाइनद्वारे येणाऱ्या संबंधित तक्रारी या डेस्कद्वारे सोडवल्या जातील. सध्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर हटवण्यात विलंब होतो. त्यासाठी आयोगाच्या तज्ज्ञांची समिती उपाययोजना व कार्यपद्धती सुचवणार असून विविध यंत्रणांच्या कामकाजात त्यानुरूप आवश्यक बदलाची शिफारस सरकारकडे केली जाईल. ही समिती पुढील तीन महिन्यांत अहवाल देईल, असे रहाटकर म्हणाल्या.

 

बदनामीच्या तक्रारींमध्ये वाढ
महिला आयोगाकडे सध्या सोशल मीडियातून महिलांच्या बदनामीच्या तक्रारी वाढल्या आहेत. सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीपोटी अनेक पीडित महिला तक्रारी दाखल करत नाहीत. त्यामुळे आयोगाच्या कार्यालयातच सायबर डेस्क स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. लवकरच हा डेस्क कार्यरत होईल.
- विजया रहाटकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग


सायबर डेस्कचे कार्य
- हेल्पलाइनद्वारे राज्यातील महिला त्यांच्या तक्रारी आयोगाकडे नोंदवू शकतील
- तक्रार येताच सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर त्वरित काढेल.
- पीडितेस मार्गदर्शन, सल्ला, समुपदेशनही
- संपूर्ण कारवाईदरम्यान पीडित महिलेची गोपनीयता पाळून आधार दिला जाईल.
- तक्रारीस कारणीभूत सोशल मीडियावर कडक कारवाई करणार.

 

बातम्या आणखी आहेत...