आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेठरोडच्या आदिवासी वसतिगृहात मुली तीन दिवसांपासून उपाशीच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आदिवासी विकास विभागाच्या पेठरोडवरील शासकीय वसतिगृहातील मुली तीन दिवसांपासून उपाशी आहेत. त्यांना नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडूनही जेवण देण्यात आले नाही. शिवाय खासगी मेसवाल्याकडील जेवण घेण्यासही संबंधित गृहपालांनी विरोध केल्याने मुलींना उपाशीच रहावे लागत असल्याने अखेर या मुलींनी थेट प्रकल्पाधिकाऱ्यांकडेच मंगळवारी तक्रार करत वसतिगृहात जेवण बनविण्याच्या परवानगीची मागणी करत खात्यावर डीबीटीचे पैसे देण्याची मागणी केली. त्यावर प्रकल्पाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 


शासनाने चालू वर्षापासून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्वच सोयी-सुविधा वस्तूऐवजी थेट त्यांच्या खात्यातच पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काळ्याबाजारास आळा बसण्यास मदत होणार आहे. त्याद्वारे अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, फ्री-शीप आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवणापासून ते सर्वच बाबींचे पैसे त्यांच्या खात्यातच अर्थात डीबीटीद्वारे वितरण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वसतिगृहांतील जेवणाच्या ठेक्यांची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आलीच नाही. असाच प्रकार नाशिकमधील पेठरोडवरील आदिवासी विद्यार्थिनींच्या वसतिगृहात झाला. येथील ठेकेदाराची जेवणाच्या ठेक्याची मुदत १६ जूनला संपली. तरीही त्याने २३ जूनपर्यंत मुलींना जेवण दिले. त्यानंतर मात्र त्याने जेवण बंद केले. गृहपालांनी तुम्ही बाहेरून मेस लावा, जेवण करा असा सल्ला दिला. त्यावर मुलींनीच तेथे एक मेसवाला जेवणासाठी तयार केला. पण, गृहपालांनी मेसची जागा जेवणासाठी आणि जेवण बनविण्यास विरोध केला. बाहेरून जेवण आणल्यास बाहेरच जेवण करण्याची भूमिका घेत सोमवारी तर त्यांचे जेवण पावसात आणून ठेवल्याचा आरोप या मुलींनी केला. त्यामुळे आदिवासी विभागाकडून ना खात्यात डीबीटीचे पैसे देण्यात आले नाही, जेवणाची कुठलीही सुविधा देण्यात आली. शिवाय तेथे जेवणासही विरोध झाल्यामुळे या मुलींना तीन दिवसांपासून उपाशीच रहावे लागत आहे. काहींनी चोरून वडा-पाव खाल्ले. पण, त्यांना त्याचा त्रासही झाल्याने मुलींनी मंगळवारी थेट प्रकल्पाधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडत आम्हाला डीबीटीचे पैसे देण्याची आणि वसतिगृहात जेवण बनविण्यासाठी जागा देण्याची मागणी केली. त्याशिवाय कार्यालय सोडणार नसल्याचा इशारा दिल्याने अखेर प्रकल्पाधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी वसतिगृहातील सर्वच मुलीही उपस्थित होत्या. 


अनेकींकडे वडा-पावसाठीही पैसे नाहीत 
आम्ही तीन दिवसांपासून उपाशीच आहोत. जेवणाची कुठलीही सुविधा देण्यात आली नाही. शिवाय खात्यावर डीबीटीचे पैसेही मिळाले नाहीत. त्यामुळे वडा-पाव खाण्याची वेळ आली असून, काहींना त्याचा त्रास झाला. तर बहुतांशी मुलींकडे वडा-पावसाठीही पैसे नसल्याने त्यांना तोही खाणे शक्य झाले नाही. 
- निर्मला खिल्लारी, विद्यार्थिनी 


पावसात बाहेर जेवण्यास सांगितले 
मेस बंद झाल्याने मुलींनी एका मेसवाल्याला जेवण देण्यासाठी सांगून जेवणाची व्यवस्था केली. पण, गृहपालांनी त्याला विरोध केला. अालेले डबे अाणि जेवणासह साहित्य बाहेर काढले. पाऊस सुरू असतानाही बाहेरच जेवणास सांगितले. - सुशीला गोसावी, विद्यार्थिनी 

बातम्या आणखी आहेत...