आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयावरून नायगावला पत्नीचा खून; धारदार विळ्याने वार करून स्वत:च पोलिसांत हजर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर धारदार विळ्याने वार करत ठार मारण्याची घटना तालुक्यातील नायगाव येथे घडली. या घटनेत गंगूबाई भगवान बोडके (४१) ही महिला मयत झाली. आरोपी पती भगवान गोटीराम बोडके (४३) हा स्वत:हून नाशिकरोड पोलिसात हजर होत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्यावर मुसळगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


भगवान बोडके हा मुळचा शिंपी टाकळी (ता. निफाड) येथील असून पत्नी गंगुबाई हिचे माहेर नायगाव येथील आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचा विवाह झालेला आहे. दुसरी मुलगी मुंबईला चुलत्यांकडे राहते. तेरा वर्षाचा मुलगा आदित्यसह तिघेजण तीन महिन्यापासून नायगाव येथील वैभव घोलप यांच्या खोलीत वास्तव्यास होते. चालक असलेल्या भगवान यास गांजा आणि दारूचे व्यसन होते. तो पत्नी गंगुबाईच्या चारित्र्यावर संशय घेत असे. 


रविवारी रात्री अडीचच्या सुमारास भगवानने पत्नी गंगुबाईच्या गळ्यावर, पोटावर विळ्याने वार केले. जादा रक्तस्त्रावामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर भगवानने नाशिकरोड पोलिस ठाणे गाठत माहिती दिली. दरम्यान, शेजाऱ्यांनी मुसळगाव पोलिसांना कळविल्याने ते घटनास्थळी दाखल झाले. 


उपविभागीय पोलिस अधिकारी माधव पडील, निरीक्षक हरिभाऊ कोल्हे, सहाय्यक निरीक्षक मोतीराम वसावे, उपनिरीक्षक लावणे यांनी पंचनामा केला. मयत गंगुबाईचा भाऊ जनार्दन पानसरे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी भगवान बोडके याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. हवालदार राम भवर, लक्ष्मण बदादे, प्रवीण मासोळे याबाबत सखाेल तपास करीत आहे. 


भगवान नव्हे 'दानव' 
भगवान याने रागाच्या भरात पत्नी गंगुबाईवर वार केले. मयत गंगुबाईला बाहेर आणून बांबूवर टाकले. तिचे प्रेत पेटवून देण्याचा त्याचा इरादा होता. मात्र, वेळेवर काडीपेटी मिळाली नाही. यादरम्यान मुलगा आदित्य जागा झाला. बापाच्या क्रुरतेची जाणीव होण्यापूर्वीच भगवानने त्यास सायकलवर बसवून नाशिकरोड पोलिस ठाणे गाठले. रविवारी सकाळी नाशिकरोड पोलिसांनी मुसळगाव पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.

बातम्या आणखी आहेत...