आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेदींच्या गुजरातमध्येच समांतर 'भारत सरकार' शेषन, रेशननंतर अाधार कार्डालाही विराेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक -  इंग्लंडच्या राणीसोबतचा करार, कॉमनवेल्थमधील नियमावली आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे दाखले याच्या आधारावर स्वशासनाचा कायदा मानणाऱ्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील ए/सी भारत सरकार मानणाऱ्या आदिवासींनी शेषनकार्ड, रेशनकार्ड यापाठोपाठ आता आधार कार्डांनाही नकार दिला आहे. ए/सी भारत सरकार या स्वतंत्र समूहाच्या दस्तऐवजांनुसारच कारभार करण्याची प्रतिज्ञा गुजरातमधील मोरदहाड गावात   झालेल्या विश्व शांती संमेलनात शेकडो आदिवासींनी केली. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर झालेल्या या संमेलनात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या चार राज्यांतील  आदिवासी सहभागी झाले होते.


ए/सी केसरी सिंह माताेश्री जमनाबा पिताश्री टेटियाभाई यांचे पुत्र ए/सी रवींद्र कुंवर सिंह यांच्या नेतृत्वाखाली २१ ते २३ मेदरम्यान हे संमेलन झाले. यात ए/सी भारत सरकारला मानणारे शेकडो आदिवासी सहभागी झाले होते. ‘ए/सी भारत सरकार’चे संस्थापक दिवंगत ए/सी केसरी सिंह यांचे पुत्र ए/सी रवींद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन झाले. 


त्यांच्या कुटुंबीयांनी आणि कौन्सिलिएशन समितीच्या सदस्यांनी प्रार्थनेद्वारे ए/सी केसरी सिंह यांना अभिवादन केले. त्यानंतर सायंकाळपर्यंत ए/सी भारत सरकारचे स्वतंत्र दस्तऐवज आणि स्वायत्त कारभाराबद्दल संमेलनात सहभागी आदिवासींना मार्गदर्शन करण्यात अाले. तसेच प्रत्यक्ष कामकाज करत असताना येणाऱ्या समस्यांचे निराकारण करण्यात अाले. ए/सी भारत सरकारचे अनुयायी असलेल्या आदिवासींच्या सर्व जातींचे सदस्य यात सहभागी झाले होते. समितीच्या मार्गदर्शनानंतर याच दस्तांच्या आधारे व्यवहार आणि कारभार करण्याची प्रतिज्ञा सर्व आदिवासींनी केली.

 

काॅमनवेल्थची मान्यता, निसर्ग नियमांचा अाधार
आम्ही सतीपती म्हणजे मातापित्यांना मानताे अाणि फक्त निसर्गाचे नियम पाळताे. ९ फेब्रुवारी १९६१, ३ जानेवारी १९६९ आणि ३० एप्रिल १९६८ रोजी लंडनमधील बंकिमहॅम पॅलेस, कॉमनवेल्थद्वारे आदिवासींच्या या स्वशासनास जगप्रसिद्धी देण्यात आली आहे. या संमेलनांमधून ए/सी भारत सरकारच्या दस्तावेजांचे पुरावे आम्ही आदिवासींपुढे ठेवतो आणि त्याचा खुलासा करतो. माझे आधारकार्ड नाही किंवा बँकेत खातेही नाही. आम्हीच या देशाचे मालक आहोत, तेव्हा आम्ही मतही देत नाही अाणि करही देत नाही. 

- ए/सी दिलवर सिंग, सदस्य, कौन्सिलिएशन समिती

 

अामचा सर्व कारभार ए/सी सरकारच्या दस्तांनुसार 
उपलब्ध दस्तावेजांच्या आधारे आम्ही हा कारभार करतो. मला मराठी, गुजराती आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषा येत असल्याने मी भाषांतराचे काम करतो. मीदेखील रेशन, शेषन किंवा आधारकार्ड काढलेले नाही. परंतु, ए/सी भारत सरकारच्या वतीने शासकीय कार्यालयांमध्ये काम पडत असल्याने आम्हाला ही आयकार्ड देण्यात आली आहेत. 
ए/सी विठ्ठल रेश्मा सयाजी, कार्यकर्ता, ए/सी भारत सरकार

 

काय आहे ए/सी भारत सरकार 
* 'ए/सी भारत सरकार' म्हणजे एन्टे क्राइस्ट अर्थात ख्रिस्तपूर्व सरकार. 
* समूहाचे शासक या नात्याने ते लाल दिव्याची गाडी वापरतात. 
* ए/सी केसरी सिंह यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना करण्यात आली. 
* सध्या त्यांचे पुत्र ए/सी रवींद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली कारभार चालतो. 
* या देशाचे आपण स्वतंत्र शासक असल्याचा यांचा दावा आहे. 
* दस्तांच्या आधारावर कौन्सिलिएशन समिती व्यवहार करते 
* दस्तऐवजांमध्ये स्वायत्त स्टॅम्प, चलनी नाणी आणि महसूल व मालकीबाबतची दस्त आहेत 
* यांचे अनुयायी फक्त हेच दस्त आणि नियम मानतात. 
* मातापित्यांना नमन म्हणून २ अंगठे छातीशी घेऊन 'स्वकर्ता, पितु की जय' असा नमस्कार 
* निसर्गातील पंचमहाभूतांचे प्रतीक असलेल्या पंचशूळाचे प्रतीक मानतात 
* कर्ज घेत नाही, जमीन विकत नाही, शासकीय योजना वापरत नाहीत 
* पारंपरिक रूढी, रीतिरिवाज, कर्मकांड पाळत नाहीत 
* बाहेरील समाजाचे अन्य कोणताही जातधर्म, पंथ, कायदे, नियम ते मानत नाहीत. 
* आपल्या नावाआधी 'ए/सी' व नावापुढे आई-वडिलांची नावे लावतात 
* स्वकर्ता म्हणजे स्वशासन आणि फादरहूड म्हणजे बंधुभाव मानतात. 
* संमेलनांमध्ये समाजाला नमन करून विवाह जाहीर करतात

 

 पुढील स्लाईडवर पहा आणखी फोटो....

बातम्या आणखी आहेत...