आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललिता म्हणून जन्माला आले, आता ललितकुमार म्हणून जगून दाखवेन: ललिता साळवे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक -  लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी परवानगी मागणारा अर्ज केल्याबद्दल पोलिस प्रशासनातील बीड जिल्ह्यातील ललिता साळवेंचे नाव चर्चेत आले. महिला राखीव गटातून निवड झाल्याच्या तांत्रिक मुद्द्यांमुळे त्यांचा अर्ज पोलिस प्रशासनाने सुरुवातीला नाकारला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेनंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात त्यांच्या शरीरात अविकसित पुरुषाचेच अवयव असल्याचे सिद्ध झाले आहे. उच्च न्यायालयाने मॅटमध्ये देण्याचा सल्ला त्यांना दिला आहे. यात काय  ललिताच्या मनात... याबाबत दीप्ती राऊत यांनी जाणून घेतलेल्या ललिताच्या भावना.

 

प्रश्न – खूप त्रास झाला असेल...  
ललिता – खूपच. प्रचंड मानसिक त्रास. २०१४ ला मुंबईत सरकारी रुग्णालयात मी तपासणी करून घेतली. तेव्हा तर सिद्धच झालं होतं की माझ्या शरीरात पुरुषाची गुणसूत्रे आहेत. पण परिस्थितीमुळे आपण काहीच करू शकत नाही ही हतबलता जीवघेणी होती. इंटरनेटवरून मी लिंगबदल प्रक्रियेची माहिती काढली. पण ती प्रक्रिया प्रदीर्घ असल्याचे समजले. त्यासाठी पैसेही खूप लागतात असं कळालं. त्यानंतर जास्तच घुसमट वाढली. आपल्याकडे पैसे असते तर नोकरी सोडून आपण आपली खरी ओळख मिळवली असती असं वाटायचं..  

 

प्रश्न – रजेच्या अर्जानंतर तुझ्या या वेगळेपणाबद्दल सगळीकडे चर्चा झाली. त्याचा त्रास झाला का?  
ललिता –  दोन्ही अनुभव आले. माजलगाव पोलिस स्टेशनमधील माझ्या सर्व पोलिस सहकाऱ्यांकडून खूप आधार मिळाला. ते सारे आस्थेने चौकशी करतात. पण मीडियात माझे नाव आणि फोटो आल्यावर जगणं मुश्किल झालं. त्यात माझं कुणावर तरी प्रेम असल्याने मला हे ऑपरेशन करायचं आहे, असल्या भलत्या सलत्या वावड्यांच्या बातम्या झाल्या. त्याचा खूपच त्रास झाला. माझ्या कुटुंबाला आणि नातलगालाही गेल्या महिनाभर खूप मनस्तापाला सामोरं जावं लागलं. फोटो छापला गेल्यावर मला बाहेर फिरणं मुश्किल झालं. सगळे तोंडाकडे पाहतात.  मागून-पुढून नावं ठेवतात. शेवटी मी चेहऱ्याला स्कार्फ बांधून फिरू लागले. सध्या मी सगळ्यांशी संपर्क तोडला आहे. कुठे जात – येत नाही. मित्रमैत्रिणींना भेटत नाही, फोन करत नाही. मी स्वत:ला कोंडून घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानते, त्यांनी माझ्याबाबतीत सकारात्मक भूमिका घेतली. पण माझी आता एकच विनंती आहे, लवकरात लवकर माझ्या रजेला मंजुरी मिळावी आणि मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळावी. मला आता सहन होत नाहीए... माझी आतल्या आत खूप घुसमट होते आहे..  

 

प्रश्न – या ऑपरेशनंतर पुढले काय नियोजन आहे?  
ललिता –  मला पुन्हा माजलगावमध्येच पोस्टिंग हवे आहे. डिपार्टमेंटमधील सगळ्यांनी मला साथ दिली आहे. मला लिंगबदल ऑपरेशननंतर लपून छपून जगायचं नाही आहे. ज्या ठिकाणी ललिता म्हणून मी वाढले तिथेच मी ललितकुमार म्हणून खंबीरपणे काम करून दाखवणार आहे, ही माझी जिद्द आहे. माझ्या शरीरातील बदल नैसर्गिक होता. पण ही वेगळी ओळख घेऊन जगणं हा माझा मानवी अधिकार आहे. मलाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. 

 
प्रश्न – कोर्टात जाण्याचा निर्णय कसा घेतला?  
ललिता – २०१४ नंतर गेली पाच वर्षे मी यातून मार्ग काढण्यासाठी झगडत होते. पण काहीच माहिती मिळत नव्हती की मार्गदर्शन मिळत नव्हतं. एकदा बिधान बरुआची बातमी टीव्हीवर पाहिली. इंटरनेटवर सर्च केले. त्याच्या वकिलांचा, अॅड. एजाज नक्वींचा नंबर मिळवला आणि त्यांच्याशी संपर्क केला. तांत्रिक मुद्द्यामुळे प्रशासकीय अडचण आली तेव्हा कोर्टाचे दार ठोठावण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आता मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर डिपार्टमेंटवर माझा विश्वास निर्माण झाला आहे. पोलिस महासंचालक मला न्याय देतील, अशी आशा वाटतेय. फक्त ते लवकरात लवकर व्हावं हीच कळकळीची विनंती आहे. आतापर्यंत मी, माझ्या कुटुंबानं खूप भोगलं. अजूनही अनेकजणं असतील अशी वेगळी ओळख घेऊन जन्माला आलेले. गेले महिनाभर मला बाहेर पडणं मुश्किल झालं आहे. मला समाजाला एवढंच सांगायचंय, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. त्यांना नावं ठेवू नका, त्यांना जगू द्या

 

प्रश्न : बीडसारख्या जिल्ह्यात राहत असताना कुठून आली ही हिंमत?  
ललिता : आयुष्यानंच शिकवलं हे सारं. आयुष्यात खूप दु:ख पाहिलं मी. आईवडील मोलमजुरी करणारे. भावंडांचेही शिक्षण बेताचेच. कुटुंबात पदवी झालेली मी पहिलीच. मामाकडे राहून शिक्षण केलं. वाटत होतं, कधी एकदाची आपल्याला नोकरी लागते आणि आपण कुटुंबाला आधार देतो. कॉलेजमध्येच असताना निघतील ते नोकरीचे फॉर्म भरत होते. शिपायापासून क्लार्कपर्यंतचे. शेवटी ज्या दिवशी माझी महाराष्ट्र पोलिस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली तो दिवस माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता. त्यातूनच मी भावंडांसाठी रोजगाराचे मार्ग देऊ शकले. नोकरी गेली तर खायचं काय अशी परिस्थिती. लिंगबदलासाठी नोकरी गेली तर खायचं काय आणि ऑपरेशनचा खर्च करायचा कसा हा माझ्यापुढचा मोठा प्रश्न. त्याचा विचार करतानाच शेवटी ही वेगळी ओळख जाहीर करून रजेसाठी अर्जाचा एकमेव पर्याय माझ्यासमोर होता.

 

प्रश्न : कसा सामना केला त्या भावनांचा? मानसोपचार तज्ञांची मदत मिळाली का?  
ललिता : नाही, काहीच नाही. काहीच माहीत नव्हतं. आपण जे आहोत ते नाही आहाेत, वेगळे आहोत, बाहेरचे एक आणि आतले एक हे जीवघेणं होतं. ऑपरेशन करून यातून मार्ग काढता येतो हे एकदा कळलं. मुंबईतील एका खासगी डॉक्टरांचा संपर्क मिळाला होता. पण त्यासाठी लागणारे पैसे नव्हते म्हणून सारं आतल्या आतच सहन करावं लागत होतं.

 

प्रश्न : आपण मुलगी नसून मुलगा आहोत ही जाणीव केव्हा झाली?
ललिता : खूपच उशिरा. शाळेत, कॉलेजमध्ये मी मुलगी म्हणूनच वावरले. मुलींचे कपडे घालत होते. मुलींमध्येच वावरत होते. पण २०१४ हे वर्ष माझ्यासाठी जीवघेणं ठरलं... माझ्या घरात लग्नाचा विषय सुरू झाला होता. मी आईला सांगितले, माझ्या बाईच्या जागेवर काहीतरी वेगळ्या गाठी आल्यात. तोपर्यंत माझी छातीही बदलली होती. स्तनांचे आकार कमी झाले होते. मलाही कळत नव्हतं, आपल्या आत हे काय होतंय.. आईने मला डॉक्टरांकडे नेले. त्यांनी सर्व तपासण्या केल्या. त्यात माझ्या शरीरात पुरुषांची गुणसूत्रे असल्याचे सिद्ध झाले आणि माझ्या पायाखालची जमीन हलली. आई-वडील हादरले. त्यांनी सांगितलं, लहानपणी माझे अवयव थोडे वेगळे होते. त्या वेळी ती ट्यूमरची गाठ असेल असे वाटून डॉक्टरांनी माझे ऑपरेशनही केले होते. पण आतली गुणसूत्रे शांत बसली नव्हती. विसाव्या वर्षानंतर बंड करून उसळून आली. समाजासाठी मी बाई होते, पण आतला पुरुष आतून बंड करत होता.

बातम्या आणखी आहेत...