आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरविकास राज्यमंत्र्यांसमाेर भाजप पदाधिकाऱ्यांचा समस्यांचा पाऊसच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेऊन वर्ष उलटूनही भाजपला ठाेस कामगिरी न करता अाल्यामुळे किंबहुना शासनाकडूनच नगरविकासशी संबंधित काही निर्णयांमुळे शहरातील बांधकाम क्षेत्राची झालेली काेंडी याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासमाेर समस्यावजा मागण्यांचा पाऊसच पाडला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यावर ताेडगा काढू, असे अाश्वासन देत पाटील यांनी अाश्वस्त केले. 


महापालिका अायुक्तांच्या दालनात पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत महापाैर रंजना भानसी, अामदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, उपमहापाैर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेते दिनकर पाटील, राष्ट्रवादी गटनेते गजानन शेलार, काँग्रेस गटनेते शाहू खैरे, भाजप गटनेते संभाजी माेरूस्कर अादी उपस्थित हाेते. या बैठकीत महापाैरांसह सभागृहनेत्यांनी प्रामुख्याने ६ व ७.५ मीटर रस्त्यालगतच्या इमारतींना टीडीआर, प्रीमिअम लागू करा. मनपाचा आकृतिबंध मंजूर करून नोकरभरतीस मान्यता द्या, वैतरणा जलविद्युत प्रकल्पाचे पाणी मुकणे धरणात सोडा. गंगापूर धरणावर सोलर यंत्रणेसाठी अनुदान द्या, खुल्या जागेतील धार्मिकस्थळांना मान्यता द्या, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी अनुदान द्या, उड्डाणपूल, रिंगरोडसाठी निधी द्या, खेडे विकासासाठी शासनाने अनुदान द्यावे. एलईडी प्रकल्प मार्गी लावावा, अशा मागण्या केल्या. 

 
पाटलांची चुकामूक; महापाैरांसह पदाधिकाऱ्यांची दमछाक 
राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या नियोजित दौऱ्यानुसार सकाळी ९.४५ वाजता पोलिस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेविषयी आढावा बैठकीनंतर अामदार सीमा हिरे यांच्या नाशिक पश्चिम मतदारसंघातील पोलिस वसाहत इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाला उपस्थिती अपेक्षित हाेती. मात्र, पोलिस आयुक्तालयातील बैठकीनंतर थेट महापालिकेत हजर हाेत त्यांनी आयुक्त कक्षालगत असलेल्या सभागृहात बैठकीच्या खुर्चीत बसकन घेतली. ही बाब कळताच तिकडे पाटील यांची प्रतीक्षा करणाऱ्या सीमा हिरे यांनी भ्रमणध्वनीवरून नियाेजित कार्यक्रमाची अाठवण करून दिली. परिणामी, पाटील यांना बाहेर पडून पाथर्डीकडे जाण्याची वेळ अाली. खरी गंमत महापाैरांसह अन्य पदाधिकाऱ्यांची झाली. पाटील हे महापालिकेत अाल्याचे समजताच त्यांनी तडक धाव घेतली, मात्र अर्ध्या रस्त्यावर अाल्यावर पाटील हे हिरे यांच्या कार्यक्रमासाठी गेल्याचे कळले. त्यामुळे माघारी फिरण्यापेक्षा महापालिकेत जाऊन पाटील यांची बैठकीसाठी प्रतीक्षा करणेच महापाैरांनी पसंत केले. 

बातम्या आणखी आहेत...