आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: पालखीत जरा जपून चला...!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साईबाबांची पालखी घेऊन शिर्डी दरबारी निघालेल्या भक्तांना एका भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे चार जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी एका मुंबईकर साईभक्ताचा जागीच अंत झाला. ही घटना वरकरणी नेहमीच्याच रस्ते अपघाताची दिसत असली तरी ही बाब भविष्याच्या दृष्टीने पालखी, दिंडी वा पदयात्रा अन् त्यात मनोभावे सहभागी होणाऱ्या हजारो भाविकांच्या सुरक्षेचा विचार करता गंभीर इशारा देणारी आहे. साधारणपणे मान्सूनचा जोर ओसरला अन् हवेत गारवा निर्माण होताच शिर्डीकडे जाणाऱ्या पालख्यांचा ओघ सुरू होतो. मुंबईसह उपनगरांतून असंख्य पालख्या व त्यात सहभागी होणाऱ्या हजारो भाविकांची अक्षरश: रीघ साईंच्या दर्शनासाठी चालताना दिसते. गेल्या काही वर्षामध्ये मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर साईबाबांच्या नामाचा गजर करीत पायी पायी चालणाऱ्या साईभक्तांच्या श्रद्धेला अन् भक्तीला तोड नाही. पूर्वी फक्त साईराम साईरामाचा गजर करीत शेकडो किलोमीटर अंतर पायी चालणाऱ्या भक्तांच्या जोडीला आता कलियुगातील कर्णकर्कश डीजे, सजवलेल्या चारचाकी वाहनांमध्ये साईबाबांच्या आकर्षक मूर्ती, ढोलपथके, कोणत्या ना कोणत्या मंडळाचे फलक, टी शर्ट, पाण्यापासून जेवणापर्यंत अन् वाटेने चालताना त्रास जाणवलाच तर वैद्यकीय मदतीपासून आरामापर्यंतची व्यवस्था पालखीच्या दरम्यान होऊ लागली आहे. तथापि, हे सगळेच श्रद्धेपोटी होत असल्यामुळे पालखीतील सदस्यांची संख्या घटण्याऐवजी वाढतच चालली आहे. एवढेच काय तर मुंबईव्यतिरिक्त ठाणे व नाशिक जिल्ह्यातूनही अशा पालख्यांचा ओघ वाढला आहे. त्यात भर पडली गुजरातची. या राज्यातील सुरत, अहमदाबाद, बडोदा, बलसाड, नवसारी आदी भागातून हजारोंची भक्तसंख्या असलेल्या पालख्या सापुतारा व जव्हार मार्गे शिर्डीच्या दिशेने वाटचाल करताना ठायी ठायी दिसतात. साई पालख्या ज्या प्रमुख मार्गांवरून जातात त्यावर आता सेवकांनी निवारा शेड उभारण्याचेही दातृत्व दाखवले आहे. पावसापाण्यात उत्तम आश्रय अशा शेडमध्ये मिळू लागला आहे. गमतीने असे म्हणतात, पूर्वी चारधाम यात्रेवर निघालेला माणूस घरी चार-सहा महिन्यांनंतरही परत येतो की नाही याची शाश्वती नसायची. कारण त्या काळात दळणवळणाची साधनं नव्हती. त्यातही जी काही असू शकतील ती जवळपास नगण्यच. यात्रेवर निघालेला माणूस हा कुटुंबाचा कायमस्वरूपी निरोप घेऊनच निघायचा. शिर्डीची पदयात्रा जेमतेम आठवडा, पंधरवड्याची. त्यातही सोयीसुविधांची कमतरता अभावानेच असू शकेल. अलीकडच्या या पदयात्रांनी यात्रेचे परिमाणच बदलून टाकले आहे. तथापि, पदयात्रा काढणाऱ्या भक्त मंडळांनी वा त्यांना सेवा पुरवणाऱ्या विविध पक्ष-संघटनांच्या कारभाऱ्यांनी पालखी सोहळ्यांमध्ये सहभागी भाविकांच्या सुरक्षेची दक्षता घेणे क्रमप्राप्त आहे. कमीअधिक फरकाने शिर्डीसारखाच अनुभव सप्तशृंगी गडावरील देवीच्या यात्रेदरम्यान येत असतो. चैत्र पौर्णिमेच्या काळात या देवीची यात्रा भरते. त्यासाठी महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवरील खान्देशच्या मुक्ताईनगरपासून लाखो भाविक पायी चालत गडाकडे येत असतात. त्यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय असते.

 

मुंबई-आग्रा महामार्गासह बागलाणकडून येणाऱ्या लहान-मोठ्या रस्त्यांवरून ही भाविक मंडळी चालत असतात. त्यांच्याही सुरक्षेबाबत प्रशासनाने वेळीच उपाययोजना करायला हव्यात. अशा प्रकारच्या पदयात्रा, पालखी सोहळे आयोजित करणाऱ्यांचे सुरक्षेच्या दृष्टीने प्रबोधन होणे काळाची गरज झाली आहे. नाशिकला कुंभमेळ्याच्या आयोजनाला वैश्विक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याच्या नीटनेटक्या आयोजनाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली, याचे मुख्य कारण म्हणजे लक्षावधी साधू-भाविक एकाच ठिकाणी एकत्र होऊनही हा मेळा कोणत्याही दुर्घटनेविना अर्थात चेंगराचेंगरीविना निर्विघ्न पार पडला.

 

तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी पंढरपूरकडे दरवर्षी जाते पण लाखो भाविकांचे रस्त्याने चालणे हेच मुळात शिस्तबद्ध असते. दिंडीसोबत तैनात केलेले सुरक्षा रक्षक वा सेवेकरी रस्त्यातील वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेत असतात. त्यामुळे दिंडीकाळात रस्त्यावर अपघात घडल्याचे अपवादानेच ऐकिवात येते. पण अलीकडच्या काळात ज्या रीतीने साईभक्तांच्या पदयात्रांमध्ये दुर्घटना घडत आहेत ते लक्षात घेता ज्या मार्गावरून सर्वाधिक पालख्या मार्गक्रमण करीत असतील. अशा वेळी त्या मार्गावरील वाहतूक किमान काही काळापुरती अन्य मार्गाने वळवली पाहिजे वा पोलिसांची गस्त वाढवायला हवी. भाविकांच्या स्वयंशिस्तीमुळेदेखील अपघातांना आळा बसू शकेल, पण त्यासाठी साईबाबांकरवी भक्तांना दृष्टांत मिळावा लागेल असे दिसते ! 


- जयप्रकाश पवार,  निवासी संपादक, नाशिक

बातम्या आणखी आहेत...