आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्याने दिली हुलकावणी, बिबट्या पडला विहिरीत; मध्यरात्री वनविभागाची बचाव मोहीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोनांबे- कुत्र्याचा पाठलाग करताना हुलकावणी दिल्याने बिबट्या विहिरीत पडल्याची घटना सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथील पांचवे वस्तीवर घडली. वनविभागाने मध्यरात्री तीन वाजता बचाव मोहीम राबवून बिबट्याला बाहेर काढले. बाहेर येताच बिबट्या धूम पळाला. दरम्यान, परिसरात दोन बिबट्यांचा मुक्त संचार असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 


कुत्रा मोठ्याने भुंकण्याबरोबरच जोराने पळत असल्याचे सुरेश निवृत्ती पांचवे यांनी पाहिले. घरापासून विहिरीच्या दिशेने कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता पाण्यात काहीतरी पडल्याने धप्प असा आवाज झाला. पांचवे हे धाडसाने विहिरीकडे जाऊ लागताच जोराने भुंकून दूर पळालेला कुत्राही त्यांच्याजवळ आला. विहिरीत बॅटरीच्या उजेडात पाहताच बिबट्या कठड्याला धरून असल्याचे निदर्शनास आले. विहिरीत २५ फूट पाणी होते. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. सुरेश पांचवे यांनी सरपंच संजय डावरे, सदस्य प्रकाश डावरे, ज्ञानदेव भांगरे, किरण पांचवे, पोिलसपाटील पांडुरंग डावरे यांना बोलावून घेतले. वनकर्मचारी लोंढे यांना याबाबत माहिती कळविण्यात आली. बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती गाव-परिसरात पसरल्याने त्यास पाहण्यासाठी गर्दी झाली. उपस्थितांच्या मोबाइल बॅटरीच्या उजेडाने बिबट्या डरकाळ्या फोडत होता. किरण पांचवे, दशरथ पांचवे, आकाश पांचवे, अरुण पांचवे, प्रमोद पांचवे यांनी दोराच्या सहाय्याने विहिरीत लाकडी बाज सोडली. तथापि, गर्दीमुळे तो बाजेवर येत नव्हता. रात्री ११ वाजेपर्यंत बिबट्याला पाहण्यासाठी विहिरीभोवती गर्दी होती. 


मध्यरात्रीची बचाव मोहीम 
दिवसा बचाव मोहीम राबवण्यास गर्दीमुळे अडथळा येऊ शकतो. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री तीनच्या सुमारास बाजेच्या सहाय्याने बिबट्याला विहिरीबाहेर काढले. विहिरीचे कठडे जवळ येताच बिबट्याने बाजेवरूनच विहिरीबाहेर जोराची उडी मारून धूम ठोकली. सहायक वनसंरक्षक पी. आर मुदगून, सिन्नरचे वनपरिक्षेत्रपाल मनोहर बोडके, वनपरिमंडळ अधिकारी ए. के. लोंढे, प्रीतम सरोदे, वनरक्षक रोहित शिंदे, डी. के. पाटील, प्रकाश साळुंके, के. आर. इरकर, पोपट बिन्नर, वनकर्मचारी तुकाराम डावरे यांनी रेस्क्यू मोहिमेत सहभाग घेतला. 


दोन बिबट्यांचा वावर 
वनविभागाने घटनेचा पंचनामा केला. परिसरात दोन बिबट्यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांची भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यामुळे रात्री पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...