आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इएसअायच्या विराेधात मनसेचे 'गळ्यात मडके व हातात झाडू'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर- कामगारांना हात न लावताच त्यांच्याकडून माहिती घेऊन अाैषधाेपचाराचे कागदी घाेडे नाचविणाऱ्या राज्य कामगार विमा योजना अर्थात इएसआय हॉस्पिटलमधील डाॅक्टरांच्या विराेधात मनसेच्या वतीने 'गळ्यात मडके व हातात झाडू' घेऊन अांदाेलन करण्यात अाले. मात्र, अांदाेलकांना वैद्यकीय अधीक्षकांनी अपमानित केल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी अधीक्षकांएेवजी प्रवेशद्वारालाच निवेदन चिकटवून प्रशासनाचा निषेध केला. 


कामगारांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून इएसआय हॉस्पिटल चालविले जाते. जवळपास दोन लाख कामगारांच्या वेतनातून वर्षाकाठी ६६ कोटी रुपयांची रक्कम इएसअायसीकडे जमा हाेते. त्यातुलनेत कामगारांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. २८) मनसेच्या वतीने हे अांदाेलन छेडण्यात अाले हाेते. नाशिक जिल्ह्यातील एक लाख ७९ हजार १७४ कामगारांच्या वेतनातून ६६ काेटी १६ लाख रुपयांची रक्कम दरवर्षी कपात होऊन इएसआयकडे जमा होते. मात्र, राज्य व केंद्राच्या अनास्थेमुळे आजही कामगार वाऱ्यावर असून, रुग्णालयात येणाऱ्या कामगारांना डॉक्टरांकडून अस्पृश्यतेची वागणूक दिली जात असल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात येत अाहे. 


याविरोधात शनिवारी मनसे व मनसे अंगीकृत अपघातग्रस्त कामगार संघटनेच्याु वतीने रुग्णालय प्रशासनाविरोधात गळ्यात मडके व हातात झाडू घेत आंदोलन छेडले होते. सायंकाळी चार वाजता आंदोलनकर्ते विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सरोज जवादे यांच्या कार्यालयात गेले असता आंदोलनकर्ते व जवादे यांच्यात जाेरदार शाब्दिक चकमक उडाली. अपमानास्पद वागणूक मिळाल्याने आंदोलनकर्ते निवेदन रुग्णालय प्रवेशद्वारावर चिकटवून माघारी फिरले. यावेळी मनसेचे चिटणीस अंकुश पवार, उपचिटणीस कैलास मोरे, शहर सरचिटणीस विजय अहिरे, विभागीय उपाध्यक्ष अंबादास अहिरे, अतुल पाटील आदींसह मनसे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. 


९० टक्के रुग्णांना केली जाते मदत 
रुग्णालयात येणाऱ्या ९० टक्के रुग्णांना मदत होते. उर्वरीत १० टक्के रुग्णांचा विषय लोकल ऑफिस व कंपनीच्या अडचणीमुळे अडकतो. ज्या कामगारांंचा कामाचा कार्यकाळ दोन वर्षांपेक्षा अधिक आहे, अशाच कामगारांना रुग्णालयाचा फायदा घेता येऊ शकतो. रुग्णालयात आयसीयू मॅनेजमेंट नाही त्यामुळे अशा रुग्णांना टायअप रुग्णालयात पाठविले जाते. औषध खरेदी-विक्रीचा निर्णय हाफकिन या संस्थेकडे सोपविण्यात आला आहे. 
- डाॅ. सरोज जवादे, वैद्यकीय अधीक्षक 


बहुतांश डाॅक्टरांचे खासगी हाॅस्पिटल 
बहुतांश डॉक्टरांची स्वत:ची हॉस्पिटल आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधीक्षकांसह येथील डॉक्टर रुग्णांना अतिशय उद्धट वागणूक देतात. स्वत:च्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना जशी वागणूक दिली जाते, तशीच वागणूक कामगारांना द्यावी ही अामची मागणी अाहे. 
- कैलास मोरे, अध्यक्ष, अपघातग्रस्त कामगार संघटना 


माझ्या दीड वर्षाच्या मुलीला गमावले 
माझ्या दीड वर्षाच्या मुलीला कॅन्सर होता. मी वर्षभरापासून रुग्णालयात खेट्या मारत होतो. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मला मुलीला गमवावे लागले. 
- अमोल राऊत, कामगार, इंडियन टूल 


उपचार घेतले, मात्र अद्याप भरपाई नाही 
कंपनीत भट्टीवर काम करत असताना चेहरा जळाला होता. इएसआयमध्ये उपचार न झाल्याने खासगी दवाखान्यात उपचार घेतले. मात्र, अद्याप बिल पास झाले नाही. 
- प्रवीण जाधव, कामगार, इंडियन टूल्स 

बातम्या आणखी आहेत...