आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकमध्ये अाज करवाढीविराेधात वादळी महासभा; हजारो नाशिककर होणार सहभागी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिकेच्या तिजाेरीतील खडखडाट दूर हाेण्यासाठी अायुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील इंच न् इंच जमिनीवर अव्वाच्या सव्वा करवाढ लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर साेमवारी (दि. २३) दुपारी १ वाजता महासभा हाेत अाहे. या महासभेत करवाढ रद्द करण्याची अाग्रही मागणी सत्ताधाऱ्यांसह विराेधक करणार अाहेतच; शिवाय अायुक्तांवर अविश्वास ठराव अाणण्याचेही नियाेजन केले जात अाहे. त्यामुळे ही महासभा कमालीची वादळी हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे. दुसरीकडे राजकीय पक्ष अाणि सर्वसामान्य नागरिक एकत्र येत ' मी नाशिककर' नावाने अांदाेलन उभे करणार अाहेत. वेळप्रसंगी महासभेला घेराव घालण्याचे नियाेजन केले जात अाहे. 


करवाढीमुळे नाशिककरांमध्ये संताप असून या पार्श्वभूमीवर महापाैरांनी साेमवारी महासभा बाेलविली अाहे. त्यात 'मी नाशिककर' या झेंड्याखाली सर्वपक्षीय नगरसेवक एकजूट दाखविणार अाहेत. सभागृहाबाहेर अन्याय निवारण कृती समितीसह शिवसेना, कांॅग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या पक्षांचे कार्यकर्ते अांदाेलन करणार अाहेत. महासभेत सर्वपक्षीयांना मते मांडण्याची संधी दिली जाणार अाहे. त्यात मत-मतांतरे नाेंदवून त्याचे इतिवृत्त मुख्यमंत्र्यांना पाठवले जाणार अाहे. अाचारसंहितेमुळे महापाैर निर्णय देणार नसून फक्त मुख्यमंत्र्यांना अहवाल पाठवून सभागृहाच्या तथा नाशिककरांच्या भावना कळवल्या जाणार अाहेत. 


अाज सकाळी गटनेत्यांची बैठक 
करवाढीसंदर्भात चर्चा करण्यासाठी महापाैरांनी महासभा बाेलविली असली तरीही विधानपरिषद निवडणुकीची अाचारसंहिता सुरु झाल्याने या महासभेत धाेरणात्मक निर्णय घेता येणार नाही असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले अाहे. मात्र महापाैरांनी महासभेसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली अाहे. या सभेत करवाढ रद्द करण्याचा ठराव केला गेल्यास ताे धाेरणात्मक निर्णय हाेईल. त्यामुळे सभेत चर्चा करायची अाणि निर्णय प्रलंबित ठेवायचा अशी भूमिका घ्यायची याबबाबत निर्णयासाठी साेमवारी सकाळी ११ वाजता महापाैरांनी गटनेत्यांची बैठक बाेलविली अाहे. 


सर्वपक्षीयांचा विराेध... 
साेमवारच्या महाभेत अाम्ही नाशिककरांना निश्चितपणे न्याय देणार अाहाेत. अामच्या घरपट्टी वाढीच्या ठरावात अशा प्रकारच्या वाढीचा विषयच नव्हता. त्यामुळे या वाढीला भाजपचा विराेध असेल.

-दिनकर पाटील, सभागृह नेता, भाजप 


शिवसेना नाशिककरांबराेबर अाहे. नाशिकच्या इतिहासात प्रथमच शेतीवर कर लादण्याचे पाप प्रशासन अाणि सत्ताधाऱ्यांनी केले अाहे. याचा जाब अाम्ही महासभेत विचारणार अाहाेत.
- अजय बाेरस्ते, विराेधी पक्षनेते 


शेतकरी, शाळा व मंदिरे या सगळ्यांना करवाढीतून मुक्त करण्यात येऊन सर्वांना सुसह्य ठरेल अशी करवाढ करण्यात यावी. या संदर्भात महासभेत चर्चा करुन स्थायी समितीवर प्रस्ताव ठेवावा. 
- संभाजी माेरुस्कर, गटनेता, भाजप 


प्रशासन करवाढ रद्द करण्यास राजी नसल्यास वेळप्रसंगी राजीनामे देवू. मात्र जनतेवरील अन्याय सहन करणार नाही. पक्षापेक्षा ज्यांनी निवडून दिले त्यांचे प्रश्न महत्वाचे अाहेत. 
- गुरुमित बग्गा, गटनेते, अपक्ष 


यापुर्वी अामचा विराेध डावलून भाजपने १८ टक्के करवाढ लादली अाहे. त्यात अाता प्रशासनही जिझिया स्वरुपातील कर लादला अाहे. अाचारसंहितेमुळे निर्णय घेता येत नसला तरी त्याला स्थगिती देता येईल.़
- शाहू खैरे, गटनेता, कांॅग्रेस 


ही जिझिया करवाढ रद्द करण्यासाठी अाम्ही प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर तुटून पडू. अाम्ही जनतेचे प्रतिनिधी अाहाेत. करवाढ जनहिताविरुध्द असल्याने तिला अामचा विराेध अाहे. 
- विलास शिंदे, गटनेता, शिवसेना 


नियमानुसार प्रक्रिया न करता करवाढ लादणे हा महासभेचा अवमान अाहे. त्यामुळे प्रथमत: महासभेवर याविषयावर चर्चा व्हावी अाणि त्यानंतर करवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात यावा. 
- गजानन शेलार, गटनेता, राष्ट्रवादी 


शेतकरी हाेरपळलेला अाहे. त्यातच त्याच्यावर नवीन कर लादून त्याला पालिका अात्महत्येस प्रवृत्त करीत अाहे. मनसेची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने असून करवाढीस विराेध केला जाईल. 
- सलीम शेख, गटनेता, मनसे 


मनपा मुख्यालयासमाेर करवाढीविराेधात आज धरणे 
महापालिका आयुक्तांनी १ एप्रिलपासून केलेल्या अवास्तव करवाढीच्या निषेधार्थ नाशिक विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि. २३) सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी हजारो नाशिककर उपस्थित राहणार असल्याने नागरिकांची गर्दी वाढून वाहनांमुळे वाहतूक हाेण्याचीही कोंडीची शक्यता आहे. 


महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पूर्वीच्या घरपट्टीमध्ये पाच ते सहा पटीने वाढ केली आहे. घर भाड्याने दिलेले असेल तर त्यात १५ पटीने वाढ होणार आहे. सोसायटीमधील अतिरिक्त जागेवरदेखील कर लावण्यात आला आहे. शाळेच्या मैदानावर कर लावण्यात आल्याने शाळाचालक स्वत:च्या खिशातून ताे न देता पालकांच्या खिशातूनच देतील, त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांच्या शेतीवरही सरसकट कर आकारला होता. मात्र, शहरात कृती समितीने घेतलेल्या संघर्षात्मक पवित्र्यामुळे हिरव्या पट्ट्यावर शेतीकर घेणार नसल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाहिर केले. तसेच, ३ पैसे प्रतिचौरस फूट असलेला कर थेट ४० पैसे करण्यात आला होता. मात्र, अन्याय निवारण समितीने शहरातील शेतकऱ्यांमध्ये जागृती करून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आयुक्तांनी ती करवाढ आता केवळ २० पैशांवर आणली आहे. 


मात्र, यामध्ये शेतकऱ्यांची १७ टक्के जमीन 'ग्रीन', तर उर्वरित सर्व जमीन 'यलो झोन'मध्ये आहे. त्यामुळे तो कर माफ झालाच पाहिजे, अशी भूमिका अन्याय निवारण समितीच्या वतीने घेण्यात आली आहे. 


तसेच सामान्य नागरिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी सोमवारी होणाऱ्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, दत्ता गायकवाड, उन्मेष गायधनी, गजानन शेलार, गुरुमीत बग्गा, नितीन ठाकरे यांच्यासह आदींनी केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...