आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढीच जनतेची काळजी आहे तर सरकारी दवाखाने आदर्श करा; अहिरांना ‘आयएमए’चे प्रतिअाव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नाशिक/ नागपूर- बेजबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांना समज देणे समजू शकतो, परंतु त्यासाठी संपूर्ण वैद्यकीय व्यावसायिकांना नक्षली होण्याचा सल्ला देणे आणि गोळ्या घालण्याची धमकी देणे हे डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणारे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह विधान असल्याचे मत आयएमएचे राज्याचे अध्यक्ष डॉ. व्ही. एस. देशपांडे यांनी व्यक्त केले. अहिरांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते ‘दिव्य मराठी’शी बोलत होते. जनतेच्या आरोग्याची शासनाला एवढी काळजी आहे, तर लोकांना खासगी दवाखान्यांमध्ये जाण्याची वेळ येऊ नये, असे आदर्श सरकारी रुग्णालये निर्माण करावीत आणि राजकीय नेत्यांनीही त्यातच जावे, असे आव्हान डॉ. देशपांडे यांनी दिले.  


चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातील अत्याधुनिक मेडिकल दुकानाच्या उद््घाटनप्रसंगी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे अहिर यांचा पारा चढला होता. त्या वेळी ‘डॉक्टरांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी नक्षली बनावे, त्यांना गोळ्या घालू’ असे विधान अहिर यांनी केले. त्यांच्या या विधानाचा वैद्यकीय व्यावसायिकांमधून निषेध व्यक्त होत आहे. ‘राजकीय नेत्यांनी असे विधान केल्याने डॉक्टरांमध्ये घबराट निर्माण होते,’ अशी प्रतिक्रिया डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केली. एखाद्या बेजबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्याला समज देणे समजू शकतो. मात्र, त्यासाठी सर्व डॉक्टरांना आरोपीच्या कठड्यात उभे करणे निषेधार्ह असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, यावर अहिर काय  बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

आपण सर्वच डॉक्टरांबद्दल बोललो नाही  : अहिर

डाॅक्टरांना गोळ्या घालण्याची भाषा करणारे वक्तव्य अंगलट येण्याची चिन्हे दिसताच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आपल्या वक्तव्यापासून घूमजाव केले आहे. ‘चंद्रपूरमध्ये अापण बाेललेल्या  वक्तव्याचा िवपर्यास करण्यात आला.  आपले वक्तव्य केवळ कार्यक्रमात गैरहजर राहिलेले जिल्हा शल्यचिकित्सक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याबद्दल होते. सरसकट सर्वच डाॅक्टरांबद्दल आपण असे काही बोललो नाही.’ 
- हंसराज अहिर, केंद्रीय गृहराज्यमंत्री

बातम्या आणखी आहेत...