आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ शालेय पट्ट्याच्या अाधारे फुटली खुनाला वाचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अनैतिक संबंधातून केलेल्या खुनाच्या गुन्ह्याला तब्बल दोन महिन्यांनंतर वाचा फुटली. दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मखमलाबाद येथील युवतीचा गावातील एका विवाहित मंडप व्यावसायिकाने खून केल्याचे पाेलिसांनी तिच्या कमरेला असलेल्या शालेय पट्ट्यावरून उघडकीस आणले. गेल्या वर्षी २७ नोव्हेंबरला पेठ तालुक्यामध्ये आंबेगण शिवारातील एका तलावात प्लास्टिकच्या गोणीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला होता. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवतीच्या कमरेला असलेल्या पट्ट्यावरील 'मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, बहुजन हिताय बहुजन सुखाय' एवढ्या त्राेटक माहितीच्या अाधारे पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी करत तपास सुरू केला होता. मग विशेष पथकाने जिल्ह्यातील मविप्रच्या सर्व शाळांमध्ये नेहमी गैरहजर अथवा बेपत्ता असलेल्या मुलींचा तपास सुरू केला. मात्र, काहीच ठोस माहिती हाती लागली नाही. अखेर मखमलाबाद येथील साेनल झा नावाची युवती दोन महिन्यांपासूून गावात दिसत नसल्याची माहिती मिळाली. पथकाने गावातील गंगानाथ झा यांच्याकडे चौकशी केली. मात्र, ती गुजरातमध्ये सासरी गेल्याची माहिती त्यांनी दिली. अखेरचा प्रयत्नही अयशस्वी होत असल्याने पथक हताश झाले. मात्र, घराबाहेर पडताना मविप्र शाळेचा गणवेश बाहेर वाळत असताना दिसल्यावर त्याबाबत विचारणा केली. झा यांच्या लहान मुलीने काही दिवसांपूर्वी गणवेशाचा बेल्ट हरवल्याची माहिती दिल्यानंतर पथकाला महत्त्वाचा धागा सापडला. गावातील एका मंडप व्यावसायिकाशी सोनलचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पथकाला मिळाली. 


मृत युवतीचा फोटो आणि त्यावरील कपडे कुटुंबीयांना दाखवल्यानंतर ती सोनलच असल्याची ओळख कुटंुबीयांना पटली. त्यांनी हंबरडाच फोडला. गावातील मंडप व्यावसायिक बाजीराव गोटीराम सांगळे याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते व त्यानेच तिचा खून केल्याचा आरोप त्यांनी केला. पथकाने संशयित सांगळेला गावात अटक केली. या खुनात सहभागी असल्याचा संशय असलेला त्याचा मित्र मात्र फरार झाला. विशेष पथकाचे उपनिरीक्षक नितीन पाटील, दत्ता हांडगे, चेतन मोरे, राजेश काकड, प्रशांत काकड यांच्या पथकाने ही कारवाई केली. 


लाेखंडी खुंट्याने डोक्यात वार...
सोनालीचे गुजरातमध्ये लग्न झाले होते. मात्र, ती मखमलाबादमध्येच राहात होती. बाजीरावशी तिच्या प्रेमसंबंधाची कल्पना बाजीरावची पत्नी व झा कुटुंबीयांनाही होती. त्यातून दोन्ही कुटुंबांचे वादही झाले होते. दोन महिन्यांपूर्वी सांगळेची पत्नी त्याला सोडून गेली होती. सोनाली लग्नासाठी तगादा लावत असल्याने घटनेच्या दिवशी तिला लग्न करण्याचे अामिष दाखवत बाजीरावने झेन कारमधून पेठरोडवरील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे दोघांमध्ये वाद झाले. बाजीरावने सोनालीला घरी सोडण्याचा बहाणा करत आंबेगण शिवारात नेले. गाडीतून लोखंडी खुंटा काढून तिच्या डोक्यावर प्रहार केला. ती मेल्याची खात्री झाल्यानंतर त्याच खुंट्याने तिच्या चेहऱ्यावर वार करत विद्रुप केला व मृतदेह हात-पाय बांधून प्लास्टिकच्या गोणीत कोंबला. गोणीला मोठा दगड बांधून ताे तलावात फेकून दिला. 


मविप्रच्या सर्व शाळांमध्ये बेपत्ता मुलींचा तपास 
मृतदेह सापडल्याच्या तिसऱ्या दिवसापासून पथकाने जिल्ह्यातील मविप्रच्या सर्व शाळांमध्ये बेपत्ता मुलींची चौकशी केली. पथकाने चिकाटीने तपास करत हा क्लिष्ट आणि अल्प धागेदोरे असलेला गुन्हा उघडकीस आणला.  

बातम्या आणखी आहेत...