आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण्यांकडे राबणाऱ्या तीनशे कर्मचाऱ्यांची मुंढेंकडून 'सफाई'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मूळ नियुक्ती साेडून प्रतिनियुक्तीद्वारे साेयीने महापालिका पदाधिकारी, नगरसेवक वा अन्य महत्त्वाच्या अास्थापनांवर काम करणाऱ्या जवळपास तीनशेहून अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांना अाता राजकारण्यांच्या टेबलाची सफाई साेडून शहराच्या सफाईसाठी जुंपून घ्यावे लागणार अाहे. महापालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांनी राजकारण्यांना दणके देणे सुरूच ठेवले असून, त्याचाच एक भाग म्हणून या प्रशासकीय सफाईकडे बघितले जात अाहे. 


महापालिकेची 'ब' वर्गवारीत पदाेन्नती झाली असली तरी, अद्याप 'क' वर्गवारीनुसारच अाकृतिबंध मंजूर अाहे. 'क' वर्गानुसार महापालिका अाकृतिबंधात ७ हजार ९९० पदे मंजूर असून सेवानिवृत्ती व अन्य कारणांमुळे जवळपास पाच हजारच कर्मचारी प्रत्यक्षात कार्यरत अाहेत. यातही शहराची वाढीव लाेकसंख्या व विस्तार लक्षात घेत किमान साडेपाच हजार सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता अाहे. दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांची सद्यस्थितीत जेमतेम १९०० पदे महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर मंजूर आहेत. त्यापैकी सुमारे ४०० सफाई कर्मचारी कामाच्या सोयीनुसार अन्य विभागांत काम करीत असल्यामुळे शहर स्वच्छतेसाठी प्रत्यक्ष सुमारे १५०० कर्मचारीच उपलब्ध होत असल्याची बाब अनेक बैठकीत उघड झाली. मात्र, या कर्मचाऱ्यांना मूळ कामासाठी जुंपण्यात राजकीय अडचणी येत हाेत्या. अनेक कर्मचारी महापालिकेतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या सेवेत असल्यामुळे त्यांना हलवणे अवघड ठरले हाेते. या पार्श्वभूमीवर अायुक्त मुंढे यांनी अाराेग्य विभागातील कामकाजाच्या अाढाव्यानंतर कर्मचाऱ्याची ज्या कामासाठी नियुक्ती झाली अाहे, तेच काम करणे अपेक्षित असल्याचे सांगत मूळ पदावर प्रतिनियुक्तीतून अालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना पाठवण्याचे फर्मान काढले अाहे. अाराेग्य विभागाने अशा कर्मचाऱ्यांची यादीच तयार केली असून लवकरच त्यांनी मूळ पदावर पाठवले जाणार अाहे. 


डमी कर्मचारीही रडारवर 
अनेक सफाई कर्मचाऱ्यांनी पालिकेचा गलेलठ्ठ पगार घेत प्रतिदिन १०० वा २०० रुपये राेज देऊन डमी कर्मचारी स्वच्छतेसाठी लावलेले अाहेत. अशाही कर्मचाऱ्यांवर महापालिकेची नजर असेल, असेही मुंढे यांनी पत्रकारांशी बाेलताना स्पष्ट केले. नगरसेवक वा अधिकारी किंबहुना उच्चपदस्थांच्या घराजवळ सफाई करून चालणार नाही तर नागरिकांचा प्रतिसाद महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही सांगितले. 


एेटीत वाहन लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पायपीट 
महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील प्रमुख प्रवेशद्वारावर दुचाकी व चारचाकी बेशिस्तपणे लावल्या जात हाेत्या. त्याची दखल घेत मुंढे यांनी प्रवेशद्वारावर केवळ महापाैर व उपमहापाैरांच्याच वाहनांना प्रवेश अनुज्ञेय केला अाहे. स्वत:चे वाहनदेखील महापालिकेच्या मागील बाजूस लावण्याचे अादेश त्यांनी दिले अाहेत. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावरच वाहन लावून एेटीत उतरणाऱ्यांना अाता पायपीट करीत वाहनतळाकडे जावे लागत अाहे.