आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज फुकट जाणारा दाेनशे दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पालिका रडारवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पाणीपट्टीमध्ये मोठी वाढ करण्याच्या तयारीमध्ये असलेल्या महापालिकेने आता ४३० दशलक्ष लिटर याप्रमाणे होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील रोज दाेनशे दशलक्ष लिटर पाणी गळतीचा हिशेब घेण्यासाठी अनधिकृत नळजोडणी आणि मीटर नसलेले कनेक्शन रडारवर घेतले आहेत. महापालिका प्रशासनाने घरपट्टीमध्ये निवासी क्षेत्रात तब्बल ३० टक्के वाढ केल्यामुळे तयार झालेला जनक्षोभ अद्याप थांबला नसताना आता पाण्याबाबत काटेकोर वसुलीतून नाशिककरांना एका चौकटीत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. अर्थात असे प्रयत्न सकारात्मक असून प्रामाणिक करदात्यांना यातून फायदाच होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्या नळजोडणीधारकांचे मीटर नादुरुस्त आहेत किंवा मीटर्स नाहीत अशा नळजोडणीधारकांनी स्वत:हून तातडीने महानगरपालिकेत नियमाप्रमाणे नोंद करून मीटर दुरुस्त करावे अथवा बदलून घेण्याची कार्यवाही करून त्याची नोंद पालिकेत करावी अन्यथा त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


विशेष म्हणजे अनधिकृत नळजोडणी नियमित करण्याचे योजनेकडे पाठ करणाऱ्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. या योजनेस सुरुवातीला २१ नाेव्हेंबर २०१७ पर्यंत ३० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही नागरिकांना शेवटची संधी देण्याचा दृष्टीने २० डिसेंबर २०१७ पर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. 


अनधिकृत नळजोडणीधारकांवर गुन्हा दाखल करणार 
अनधिकृत नळजाेडणीधारकांनी तातडीने स्वत:हून महापालिकेशी संपर्क साधून दंड व पाणी वापराचे शुल्क भरून नळजोडणी अधिकृत करून घ्यावी. नळजाेडणी अधिकृत न केल्यास अनधिकृत नळजाेडणीधारकांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल. महानगरपालिकेमार्फत शोधमोहीम सुरू असून, त्यात आढळलेल्या अनधिकृत नळजाेडण्या बंद करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच आजपर्यंत लबाडीने, अनधिकृतपणे व बेकायदेशीरपणे वापरलेल्या पाण्याचे शुल्क वसूल करून त्यांच्यावर भा. दं. वि. कलम ३७९, ४२७, ४३०, ३३६ अन्वये गुन्हे संबंधित पोलिस ठाण्यात दाखल करण्यात येतील. दरम्यान, अनधिकृत नळजोडणी तसेच पाणीचोरीबाबत माहिती पाणीपुरवठा विभागाला कळवावी, असे नागरिकांना अावाहन करण्यात अाले अाहे. 

 

विभागात पोहाेचते फक्त ३५१ दशलक्ष लिटर पाणी 

दोन्ही धरणांमधून शहरातील सहा विभागांत नागरिकांपर्यंत प्रतिदिन सुमारे ३५१.८२ दशलक्ष लिटर पाणी वितरित करण्यात येते. यानुसार प्रतिदिन विभागनिहाय पाणी वितरण पुढीलप्रमाणे: 
नाशिक पूर्व : ५१.४७ 
नाशिक पश्चिम : ४४.१२ 
पंचवटी : ७४.८२ 
नाशिकरोड : ६६.६३ 
नवीन नाशिक : ७४.८० 
सातपूर : ३९.९८ 


रोज २०० दशलक्ष लिटर पाणी फुकट... 
जरी ४५३ दशलक्ष लिटर पाणी रोज उचलले जात असले तरी प्रत्यक्षात प्रतिदिन २०० दशलक्ष लिटर पाणी हिशेबात आहे. म्हणजे इतक्याच पाण्याची पाणीपट्टी वसूल होते. शहरात एक लाख ८९ हजार ५३ नळजोडण्या असून, २०० दशलक्ष लिटर पाणी फुकट जाते. तसेच पाणीपुरवठा व्यवस्था चालविण्यासाठी होणारा खर्च व पाणीपुरवठ्यातून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने यात मोठी महसुली तफावत आहे व त्यामुळे पाणीपुरवठा योजना तोट्यात आहे. पाणी लेखापरीक्षण करून घेतले असता त्यात शहरातील बहुसंख्य नळजोडण्यांना असलेले पाणी मीटर नादुरुस्त आहेत. तसेच काही नळजोडणीधारकांनी मीटर काढून टाकलेले असल्याचे आढळले आहे. तसेच अनधिकृत नळजोडण्या मोठ्या प्रमाणावर असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हिशेबबाह्य पाणी ४३ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत अाहे.

बातम्या आणखी आहेत...