आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणहक्क प्रवेशप्रक्रियेचे ऑनलाइन अर्ज भरण्यात गोंधळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शिक्षणहक्क कायद्यानुसार दुर्बल वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे; परंतु प्रवेश अर्ज दाखल करण्याची पद्धत अॉनलाइन असून वारंवार सर्व्हर डाउन होत आहे. त्यामुळे पालकांमध्ये ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेबाबत नाराजी आहे. ऑनलाइन प्रक्रियेत अडचणी येत असल्याने नागरिकांना सायबर कॅफेत एका अर्जाचे तब्बल २०० ते ३०० रुपये शुल्क द्यावे लागत आहे. 


वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना 'शिक्षणहक्क अधिकार कायद्या'नुसार खासगी शाळांत देण्यात येणाऱ्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठीची ऑनलाइन प्रक्रियेत यंदाही अडचणी आल्या आहेत. यासाठीचे संकेतस्थळच संथ असल्याने या अधिकाराच्या हजारो जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. या तांत्रिक अडचणींच्या तक्रारी महापालिकेच्या शिक्षण विभागासह प्राथमिक शिक्षण विभागाकडे करूनही दूर हाेऊ शकलेल्या नाहीत. आरटीई प्रवेशासाठी १० फेब्रुवारीपासून प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अडचणींमुळे पालकांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. याचा फायदा शहरातील सायबर कॅफेचालकांकडून घेतला जात असून अर्ज भरण्यासाठी सायबर चालकांकडून एका अर्जाचे २०० ते ३०० रुपये शुल्क घेतले जात आहे. अनेक सायबर कॅफेचालकांनी तर अर्ज भरण्याचे केंद्रच आपल्याकडे असल्याची अफवा पसरवल्याने त्यांच्याकडे गर्दी होत अाहे. 


सायबर कॅफेचालकांची 'पेड समाजसेवा' 
शहरातील जुने नाशिक, वडाळारोड, वडाळागाव, भारतनगर, सिडकोसह पंचवटीत काही सायबर कॅफेचालक परिसरात पोस्टर्स लावून, तसेच घरोघरी पत्र वाटून 'आम्ही समाजसेवा करत असून आमच्याकडून अर्ज भरून घ्यावा', असे आवाहन करीत आहेत. या सायबरचालकांकडून एक अर्ज भरण्याचे २०० ते ३०० रुपये घेतले जात आहेत. या सायबर कॅफेंवरही शिक्षण विभागाने कारवाई करावी, अशी मागणी पालक करीत आहेत. 


ऑनलाइन अडचणी दूर करण्याची गरज... 
शिक्षणहक्क प्रवेशाची ऑनलाइन साइट वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे नाइलाजाने सायबर कॅफेचालकांकडे अर्ज भरण्यासाठी जावे लागत आहे. शिक्षण विभागाने या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे.

- सागर बेदरकर, नागरिक

बातम्या आणखी आहेत...