आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईच्या धसक्याने लाॅन्सकडून विवाहांची अागाऊ नाेंदणी बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विनापरवाना सुरू असलेल्या लाॅन्सला नियमीत करण्यासाठी महापालिकेत प्रस्ताव सादर न करणाऱ्यांवर दाेन दिवसात कारवाई सुरु हाेणार असल्याने संबंधित लाॅन्सचालकांनी विवाह साेहळ्यांची नाेंदणी बंद केली अाहे. अनेकांनी अागाऊ नाेंदण्याही रद्द केल्या असून त्यातील काहींनी घेतलेल्या अनामत रकमेच्या दुप्पट रक्कम संबंधितांना दिली अाहे. दुसरीकडे लाॅन्सला पर्याय असलेल्या सर्वच मंगल कार्यालयांची नाेंदणीही पूर्ण झाली अाहे. अशा परिस्थितीत येत्या जून-जुलैमध्ये ठरलेल्या विवाहांसाठी वधू-वराच्या कुटुंबीयांना शाेधाशाेध करावी लागत अाहे. 


महहत्त्वाचे म्हणजे दिवाळीनंतरच्याही नाेंदणी करण्यास लाॅन्सचालक तयार नाहीत. गंभीर बाब म्हणजे शहरातील जवळपास २५ लाॅन्सचालकांनी हा व्यवसायच बंद करण्याचा निर्णय महापालिकेच्या पवित्र्यानंतर घेतला अाहे. 


पार्किंगची व्यवस्था न करता तसेच पालिकेची काेणतीही परवानगी न घेता शहरात १६३ लाॅन्स सुरू असल्याची बाब 'दिव्य मराठी'ने पुढे अाणली हाेती. त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने संबंधित लाॅन्सचालकांना नाेटिसा देऊन बांधकाम नियमित करण्याची संधी दिली. सध्या लाॅन्सला पुरेशी पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने वऱ्हाडी-पाहुणे मंडळींची वाहने रस्त्यावरच उभी राहतात. लग्नतिथीच्या दिवशी मंगल कार्यालयांच्या रस्त्यांवर दुचाकींसह बस, जीप, कारचालकांना तासन‌्तास कोंडीत अडकून पडावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका ३१ मेनंतर अनधिकृत बांधकाम पाडण्याची धडक माेहीम हाती घेतली अाहे. नियमानुसार लाॅन्सच्या एकूण जागेच्या तुलनेत ४० टक्के जागा ही पार्किंगसाठी ठेवणे गरजेचे अाहे. प्रत्यक्षात, अतिशय तुटपुंजी जागा संबंधित लाॅन्सचालकांनी ठेवली अाहे व उर्वरित जागेत किचन, अाेटे वा तत्सम बांधकाम केले अाहे. अनेकांनी एकाजवळ एक असे दाेन लाॅन्स तर काहींनी एक लाॅन्स अाणि एक बँक्वेट हाॅल सुरू केला अाहे. त्यांची पार्किंग मात्र सामायिक ठेवली अाहे. अाता नवीन विकास नियमावलीतील तरतुदींचे पालन करावे लागणार असल्याने ज्यांचे शेजारी-शेजारी दाेन लाॅन्स सुरू अाहेत त्यांना एक बंद करून उर्वरित जागेत पार्किंगची व्यवस्था करावी लागणार अाहे. शिवाय बांधकाम नियमित करण्यासाठी २५ लाखांपासून ४० लाखांपर्यंतचा खर्च येणे अपेक्ष्रित अाहे. त्यामुळे काही लाॅन्सचालकांनी हा व्यवसायच बंद करण्याचा निर्णय घेतला अाहे. 


अनेक लाॅन्सचालकांनी पालिकेच्या कारवाईला घाबरून स्वत:हून बांधकाम अाणि डाेम काढून घेण्यास सुरुवात केली अाहे. पालिकेची पुढील परवानगी मिळत नाही ताेपर्यंत संबंधितांना लाॅन्समध्ये साेहळे घेता येणार नाही. जे घेतील त्यांच्यावर काेणत्याही क्षणी कारवाईची शक्यता असल्याने विवाहसाेहळ्यांची अागाऊ नाेंदणी न करण्यावरच भर दिला जात अाहे. काहींनी तर यापूर्वी केलेल्या नाेंदण्या रद्द करून संबंधितांना अनामत रक्कम परत दिली अाहे. ज्यांनी पालिकेची परवानगी यापूर्वीच घेतली अाहे, अशा बाेटावर माेजण्याइतक्या लाॅन्समध्ये विवाहांची अागाऊ नाेंदणी यापूर्वीच फुल्ल झाली अाहे. शहरात मंगल कार्यालयांची संख्या मर्यादित असून, लाॅन्सने तारखा घेणे बंद केल्याने संबंधित कार्यालयांच्या नाेंदण्याही फुल्ल झाल्या अाहेत. परिणामत: जून अाणि जुलैमध्ये असलेल्या ११ विवाह मुहूर्तांसाठी संबंधितांना लाॅन्स मिळणे मुश्कील झाले अाहे. महापालिका प्रशासनाची परवानगी कधी मिळते याची शाश्वती नसल्याने दिवाळीनंतरच्या नाेंदणीही करण्यास लाॅन्सचालक धजावत नसल्याचे निदर्शनास येते. 


प्रस्तावानंतरही नियमबाह्य बांधकाम ताेडावेच लागेल 
सध्या सुरू असलेल्या लाॅन्स नियमितीकरणासाठी संबंधितांनी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर केला असला तरीही यापूर्वी केलेले नियमबाह्य काम त्यांना पाडावेच लागणार अाहे. नवीन विकास नियमावलीनुसार पार्किंगसाठी ४० टक्के जागा ठेवणे गरजेचे अाहे. याशिवाय अग्निशमनचा बंब येईल इतका माेठा रस्ता असायला हवा, १० टक्के जागा रिकामी असावी (ज्याचा वापर हाेणार नाही) अादी तरतुदी या नियमावलीत अाहेत. 


हे अाहेत विवाह मुहूर्त
जून महिन्यात १८, २३, २८, अाणि २९ तर जुलैमध्ये १, २, ५, ६, ७, १०, १५ अशा या तारखांना मुहूर्त अाहेत. अाॅगस्ट, सप्टेंबर, अाॅक्टाेबर या तीन महिन्यांत सुमारे ३० मुहूर्त अाहेत. नाेव्हेंबर महिन्यात विवाह मुहूर्तच नसून डिसेंबर महिन्यात १० मुहूर्त अाहेत. 

 

अनामतच्या दुप्पट रक्कम परत केली 
अाम्ही डाेम काढला असून, विवाह साेहळ्याची नाेंदणी केलेल्यांना अनामत रकमेच्या दुप्पट रक्कम अाम्ही परत केली अाहे. 
- अनील ढिकले, संचालक, राजे शिवाजी लाॅन्स 

 

नवीन नाेंदणी पूर्णत: बंद केल्या 
पूर्वी ज्या नाेंदणी केलेल्या अाहेत, तेच विवाह हाेऊ शकतील. नवीन नाेंदणी अाम्ही पूर्णत: बंद केलेल्या अाहेत. 
-सुभाष क्षीरसागर, संचालक, इंदू लाॅन्स 


नाशिकमध्ये पंधरा दिवस अाम्ही लाॅन्सचा शाेध घेतला. मात्र नाेंदणी करण्यास कुणी तयार नव्हते. अखेरीस वराकडे म्हणजे जळगावला लग्न करण्याचा अाम्ही निर्णय घेतला. 
- रमाकांत चाैधरी, वधुपिता 


७०% कार्यालय हाेणार बंद 
नवीन विकास नियमावलीनुसार मंगल कार्यालयासाठी १ एकर जागा तर लाॅन्ससाठी २ एकर जागा अावश्यक अाहे. यापेक्षा कमी जागा असलेल्यांना अापला व्यवसाय बदलावा लागणार अाहे. बहुसंख्य मंगल कार्यालय मालकांनी जागेच्या वापराचा उद्देश बदलण्यासाठी महापालिकेत अर्ज दाखल केले अाहे. मिळालेल्या माहितीनुसार अाज सुरु असलेल्या मंगल कार्यालयांपैकी तब्बल ७० टक्के कार्यालय या नियमामुळे बंद हाेणार अाहेत. 


परवानग्यांसाठी दाेन महिने तरी लागतील 
लाॅन्सला परवानगी मिळत नाही ताेपर्यंत बुकिंग घेण्यास संबंधित लाॅन्स सुरुवात करणार नाहीत. परवानगीस दाेन महिने तरी लागतील. 
- उद्धव निमसे, पदाधिकारी, मंगल कार्यालय व लाॅन्सचालक संघटना 

बातम्या आणखी आहेत...