आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशाची 'मुद्रा' उमटविलेल्या देवळालीच्या ठाकूर यांच्याशी पंतप्रधान माेदींचा संवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कर्ज घेणारे हे लोक गरीब आहेत. ते कर्ज घेतात, तेथेच राहतात आणि नियमित कर्जाची परतफेडही करतात. ते कुठेही पळून जात नाहीत, कर्ज बुडवत बँकांना फसवित नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा याेजनेतून कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांचे कौतुक करत त्यांना सुरू केलेल्या व्यवसायासाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी त्यांनी देवळाली कॅम्प येथील सलून व्यावसायिक हरी गणोर ठाकूर यांच्याशी चक्क मराठीतून संवाद साधला. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. २९) देशभरातील सहा जिल्ह्यांमधील मुद्रा कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यामध्ये राज्यातून नाशिक जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी २३ लाभार्थी उपस्थित होते. त्यापैकी हरी ठाकूर यांच्याशी थेट पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधताना तुम्ही कुठल्या व्यवसायासाठी आणि कधी कर्ज घेतले होते? तसेच कितीजणांना यातून रोजगार प्राप्त करून दिला? याची माहिती जाणून घेतली. त्यावर ठाकूर यांनी २०१७ साली सलून दुकानासाठी चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याद्वारे दुकानात तीन जणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे पंतप्रधान मोदी यांना सांगितले. त्यावर माेदींनी ठाकूर यांचे कौतुक करत 'हे लोक गरीब असून ते कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करतात. ते कधीही पळून जात नाही', असे स्पष्ट करत बँकांचे कर्ज बुडविणाऱ्या विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांना अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला. तर व्यावसायिक ठाकूर यांनीही थेट पंतप्रधान मोदींशी संवाद झाल्याने आनंद व्यक्त केला. नाशिकनंतर मोदींनी कर्नाटकमधील गडग जिल्ह्यातील मंजुनाथ, आसमामधील रंगीयातील हदय डेलव्हा, जम्मू-काश्मीरच्या त्रिकूटनगर जिल्ह्यातील गोविंद आणि कोलकत्यामधील श्रीमती घोष यांच्याशी संवाद साधला. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे भरत बर्वे यांच्यासह बहुतांशी सर्वच बँकांचे अधिकारी व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...