आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्यास दुष्काळमुक्तीचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसहभाग, प्रशासन व भारतीय जैन संघटना यांच्या  संयुक्त सहकार्याने आत्महत्याप्रवण जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा ध्यास जैन संघटनेने घेतला आहे. सिंचन प्रकल्प, नद्या, नाले यातील साचलेला गाळ उपसून परिसरातील शेतजमीन गाळयुक्त करण्याची ही महत्त्वाकांक्षी मोहीम वर्षभर राबवली जाणार आहे.  


दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा प्रारूप आराखडा बुलडाणा जिल्ह्यात आकाराला येत आहे. भारतीय जैन संघटना, टाटा ट्रस्ट, समृद्ध भारत, अपनाओ भारत या समाजसेवी संघटनांसोबत प्रशासकीय यंत्रणा आणि लोकसहभाग अशा संयुक्त संकल्पनेतून प्रथम बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. या प्रारूप आराखड्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण गाळमुक्तीचे काम जोमात सुरू आहे. जिल्हा दुष्काळमुक्तीनंतर हाच आराखडा संपूर्ण राज्यात राबवला जाणार आहे. 


जिल्ह्याच्या तेरा तालुक्यांतील ४४ तलावांतील गाळ उपसला जात आहे. या तलावांतून दररोज सुमारे ४८६२ घनमीटर गाळ उपसला जात आहे. आतापर्यंत ४ लाख घनमीटर गाळ उपसा झाला आहे. गाळमुक्तीच्या मोहिमेत टाकळी (ता. बुलडाणा) या गावात सुमारे ५६ वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेला इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट नमुना वसंत बंधारा सापडला आहे. हा बंधारा १९६२ ला निर्माण केला होता. धामणा नदीच्या पात्रात ६ फूट जमिनीच्या वर व १२ फूट जमिनीत सरळ रेषेतील चिरेबंदी बंधाऱ्याचे बांधकाम आहे. सध्याच्या काळात १ कोटी रुपये खर्चूनही असा बंधारा बांधता येणार नाही. या बंधाऱ्यातून म्हसला, बोदेगाव, ढंगारपूर शिवारातील शेतजमिनीला मुबलक पाणीपुरवठा केला जात होता, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.  या उपक्रमाची सुरुवात सात मार्च रोजी बुलडाणा या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यापासून झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केली.  आगामी चार महिन्यांत ११५ मायनर तलाव, १३८ पाझर तलाव, ७ गाव तलाव, १७८१ नाला खोलीकरण करणार आहे. यातून सुमारे ३ कोटी ८१ लाख क्युबिक मीटर गाळ उपसला जाणार आहे. यासाठी १३७ जेसीबी, १४ पोकलेन मशीन वापरल्या जाणार आहेत. हा गाळ ५० हजार एकर शेतजमिनीवर पसरवून शेती सुपीक केली जाणार आहे. 


जिल्ह्यातील नळगंगा, खडकपूर्णा, पैनगंगा या मोठ्या सिंचन प्रकल्पांतील गाळ काढणार आहेत. तलाव, नाले, शेततळे गाळमुक्त करताना गावातील बेरोजगारांना या मोहिमेत रोजगार उपलब्ध केला जाणार आहे. जैन संघटनेने ३६० तंत्रज्ञ अधिकाऱ्यांच्या  नियुक्त्या केल्या आहेत. यासाठी लागणारा २६ कोटी रुपयांच्या डिझेलचा पुरवठा शासन करणार  आहे, अशी माहिती भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांनी दिली. 

 
जिल्ह्यात जैन संघटनेच्या सहकार्याने दाखल झालेली यंत्रसामग्री तेरा तालुक्यांत पोहोचली असून गाळमुक्तीचे अभियान राबवले जात आहे. गाळ उपसण्याच्या कामाला वेग आला आहे. दर दिवसाला जेसीबी, पोकलेन मशीन आणि गावकऱ्यांचे ट्रॅक्टर गाळ उपसून शेतजमिनीवर पसरवतात. दिवसेंदिवस लोकसहभाग वाढतो आहे. तलावांतील गाळ उपसल्याने तलावांतील पाणी साठा वाढून शेती समृद्ध होणार आहे. वाढीव पाणी साठ्यातून परिसरातील शेतजमिनीला पाणी मिळणार आहे. या सर्व उपक्रमातून दुष्काळमुक्तीबरोबर शेतकऱ्याचे आर्थिक सबलीकरण होईल, असा जैन संघटना व प्रशासनाला विश्वास आहे. 


मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जे तलाव व नद्या कोरड्या आहेत व शेतकऱ्यांची गाळाची मागणी आहे अशा तलावांतील गाळ प्राधान्याने उपसला जात आहे. या दृष्टीने जिल्ह्याच्या तेरा तालुक्यांतील प्रत्येकी तीन  तलाव व नाले निश्चित केले आहेत. पावसाळ्याचा अंदाज घेऊन जूनपर्यंत जास्तीत जास्त तलावांतील गाळ काढून शेतजमिनीवर पसरवला जात आहे. प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण, जैन समाजाची समाजसेवा व लोकसहभाग या संयुक्त सहकार्याने जिल्ह्यात राबवली जाणारी ही मोहीम परिसरातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक सक्षमीकरण ठरणार आहे. आजपर्यंत दुष्काळमुक्तीच्या ‘धडक गाळ, उपसा गाळ, शेतावर पसरवून शेती समृद्ध करा’ या घोषणेला शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. दर दिवशी शेकडोच्या संख्येत शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी होत आहेत.  जिल्ह्यातील या मोहिमेत  शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचूव दुष्काळमुक्तीचा ध्यास अधोरेखित झाला आहे. 


- पुरुषोत्तम गुळवे  
gulvepurushottam@gmail.com

बातम्या आणखी आहेत...