आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेत उघडणार सात हजार पदांचा खजिना, लवकरच भरतीचा बिगुल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिकेमध्ये सात हजार रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून, पालिकेतील १८२३ रिक्त पद भरतीचे अधिकार अायुक्तांना देण्यात अाले अाहेत. तसेच महापालिकेची 'ब' वर्गामध्ये पदोन्नती झाल्यानंतर दाेन वर्षांपासून राज्याच्या नगरविकास खात्याकडे पडून असलेला १४ हजार ७४६ पदांचा नवीन आकृतिबंध मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या सात दिवसांत मंजूर केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती नगरविकास राज्यमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसे झाले तर, महापालिकेतच लवकरच नाेकरभरतीचा बिगुल वाजणार असून, स्थानिक बेरोजगारांना यानिमित्ताने 'अच्छे दिन' येण्याची आशा व्यक्त होत आहे. 


गेल्या पाच ते सहा वर्षांपासून महापालिकेमध्ये रिक्त पदांचा मुद्दा गंभीर स्वरूप धारण करत आहे. एकीकडे शहराचा झपाट्याने विस्तार होत असून नागरीकरणही वाढत आहे. आजघडीला शहराची लोकसंख्या जवळपास सोळा लाखांच्या पुढे गेली आहे. मात्र, वाढत्या शहराला आवश्यक मूलभूत सुविधा पुरवण्यातही महापालिका अपयशी ठरत असल्याची बाब अनेकवेळा उघड झाली. मनसेच्या काळातही रिक्त पदांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. याच कालावधीमध्ये महापालिका 'ब' वर्गाचा दर्जाही मिळाला. मात्र, राज्यात सत्ता नसल्याचे कारण देत मनसेकडून नाेकरभरतीचा मुद्दा मार्गी लागू शकला नाही. त्याचे परिणाम काही प्रमाणात मनसेला पायउतार हाेण्याच्या रूपातून भाेगावे लागले. 


नाेकरभरतीवर निर्बंधाचे कारण देत ठेकेदारीकरणाद्वारे महत्त्वाच्या सेवा चालवण्याकडे सत्ताधारी व प्रशासनाचाही भर राहिला. त्यामुळे महापालिकेच्या रूपाने दुय्यम दर्जाच्या सेवा मिळू लागल्यामुळे नाशिककरांमधून राेष व्यक्त हाेत हाेता. दरम्यान, भाजपची सत्ता अाल्यानंतर वर्ष उलटूनही नाेकरभरतीचा मुद्दा मार्गी लागलेला नाही. भाजपची गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सत्ता असल्यामुळे मनसेप्रमाणे काेणतीही सबब नव्हती. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्यामुळे तसेच भरतीचा मुद्दा त्यांच्याकडीलच नगरविकास खात्याच्या अखत्यारीत असल्यामुळे भाजपलाही निर्णयाचे वेध लागले हाेते. दरम्यान, नाशिक महापालिकेच्या कामकाजाचा अाढावा घेण्यासाठी अालेल्या नगरविकास राज्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या याेजना व अंमलबजावणीतील अडचणी जाणून घेतल्या. त्यात अायुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रामुख्याने नाेकरभरतीची अावश्यकता व शासनाकडे प्रलंबित अास्थापना अाराखड्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर पत्रकारांशी बाेलताना पाटील यांनी येत्या सात दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अास्थापना अाराखडा मंजूर केला जाईल, असे अाश्वास्त केले. नाशिकमधील विविध अडचणी साेडवण्यासाठीच अालाे असून, प्रशासकीय मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे अहवाल देणार असल्याचे सांगितले. 


..तर ७ हजार ६५६ नवीन पदांसाठी भरती
'क' वर्गाचा अास्थापना अाराखड्यानुसार ७ हजार ९० पदे मंजूर असून 'ब' वर्गाचा नवा आकृतिबंध मंजूर झाल्यास ७ हजार ६५६ नवीन पदे भरली जातील. त्यामुळेच आस्थापना परिशिष्टावरील एकूण पदसंख्या ७०९० वरून तब्बल १४ हजार ७४६ इतकी हाेईल. नव्याने तयार केलेल्या आकृतिबंधात 'अ' गटात २७५, ब - १०९, क - २४२७, तर ड गटात ४ हजार ८४५ नवी पदे प्रस्तावित आहेत. माध्यमिक शिक्षण विभागासाठी सद्यस्थितीत १४८ पदे मंजूर असून त्यात ५० नवीन पदाची वाढ हाेईल. 


महिला बालकल्याण विभागाकरिता प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी यांची २, खतप्रकल्प विभागासाठी स्टेशन ऑपरेटर १, विशेष भूमी संपादन अधिकारी विशेष घटक ९, नागरी भागात अनधिकृत बांधकाम निर्मूलनासाठी पोलिसांची ७८ पदे, वाहतूक नियोजन कक्षासाठी ९१, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी १, खत प्रकल्पासाठी विविध १३, वाहनचालक ९८, बूस्टर पंपिंग स्टेशनवर कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी ४७, तर आरसीएच प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनपा सेवेत सामावून घेण्यासाठी ३५ पदे नव्याने भरली जातील. 


पाेलिस ठाण्यासह चार नवीन विभाग 
नवीन अाकृतिबंधानुसार, अतिक्रमण निर्मूलनासाठी नागरी पोलिस ठाण्यासह राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी फेरीवाला कक्ष, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, महापालिकेत वाहतूक नियोजन कक्ष केला जाईल. त्यासाठी अावश्यक पदे अाकृतिबंधात नमूद करण्यात अाली अाहे. 


१८२३ पदे भरण्याचे अधिकार अायुक्तांना 
पालिकेचा अास्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे कारण 'क' वर्गवारीनुसार मंजूर असलेल्या ७ हजार ९० पदांच्या अाकृतिबंधातील जवळपास १८२३ पदे सेवानिवृत्त, कर्मचाऱ्यांचे मृत्यू वा अन्य कारणामुळे रिक्त अाहेत. ही पदेही अास्थापना खर्च अधिक असल्याचे कारण देत मंजूर हाेत नव्हती. दरम्यान, पाटील यांनी ही पदे भरण्याचे अधिकार अाता अायुक्त मुंढे यांना दिले अाहेत. त्यांनी लवकरच ही पदे कशी भरली जातील याचे नियाेजन करू, असेही स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...