आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशाही बस-ट्रेलरचा अपघात, २० प्रवासी जखमी; महिनाभरात सटाणा परिसरात शिवशाहीला तिसरा अपघात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा / ताहराबाद- विंचूर-प्रकाशा महामार्गावरील करंजाडजवळ (ता. बागलाण) रविवारी सकाळी साडेदहा वाजता नाशिकहून भरधाव वेगाने येणाऱ्या शिवशाही आणि ताहाराबादकडून सटाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रसायनांची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरमध्ये अपघात झाला. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले अाहेत. त्यांना सटाणा व मालेगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. 


नाशिकहून ताहाराबादकडे शिवशाही बस ( एमएच ०६ बीडब्ल्यू ७६९) वेगात येत होती. याचवेळी नाशिककडे ज्वलनशील रसायनाची वाहतूक करणारा ट्रेलर (युपी ७० एफटी ०६६७) वेगाने जात होता. करंजाडजवळ सकाळी साडेदहा वाजता या वाहनांची जोरदार धडक बसली. अचानक झालेल्या अपघातात बसमधील १५ ते २० प्रवाशांना दुखापत होऊन गंभीर जखमी झाले. अपघातामुळे ट्रेलर महामार्गाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला. शिवशाही बसचा समोरील भागाचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती पसरताच अनेकांनी गर्दी केली होती. 

अपघातात जखमी प्रवाशांना तत्काळ सटाणा व मालेगावच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जायखेडा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच दाखल झाले. महामार्गावर कोंडी झाल्यामुळे वाहनाच्या रांगा लागल्या हाेत्या. ट्रेलरमधील एलपीजी गॅस लिक होऊ नये म्हणून दक्षता घेतली जात आहे. यासाठी नाशिकहून पथक आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तालुक्यातील ताहाराबाद परिसरात रस्ता कमी रुंदीचा व वळणाचा असूनही वाहनचालक वेगाने वाहन चालवित असल्याचे दिसून येते आहे. 


महिनाभरात शिवशाहीला तिसरा अपघात 
मागील महिनाभरात या महामार्गावर शिवशाही बसचा हा तिसरा अपघात ठरला अाहे. दरम्यान, सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला अाहे. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या महामार्गाचे चौपदरीकरण करून सटाणा शहर वळण रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...