Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | success story of youth from village of farmers

शेतकऱ्यांच्या गावातील युवकांची यशाेगाथा; अायएएस, अायपीएस, शास्त्रज्ञांसह २५ पीएसअाय

राजेंद्र देशपांडे | Update - Jun 25, 2018, 09:10 AM IST

निसर्गाच्या कुशीत वसलेले कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील सरुड हे ७ हजार वस्तीचे लहानसे गाव. काेल्हापूरपासून ४

 • success story of youth from village of farmers

  सिन्नर- निसर्गाच्या कुशीत वसलेले कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील सरुड हे ७ हजार वस्तीचे लहानसे गाव. काेल्हापूरपासून ४० किमी अंतरावरच्या गावात सगळेच शेतकरी. धरणाचे पाणी असल्याने क्षेत्र कमी असले तरी वर्षातून तीन पिके घेऊन कष्टकरी शेतकरी बऱ्यापैकी समृद्ध. त्यामुळेच सगळे म्हणायचे, काेणी शेतकऱ्याचा पाेर शिकून मामलेदार झाला काय? अभ्यास राहू द्या अन् शेतीत मदत करा. मात्र, लोकांचे हे वाक्य खोटे ठरवले याच गावामधील युवकांनी. येथील युवामंडळी शासनात सध्या नागरी सेवा, परराष्ट्र सेवा, पोलिस सेवेसह अध्यापन, संशोधन तसेच अन्य सेवेतही देदीप्यमान कामगिरी बजावत आहेत. येथून आयएएस, आयपीएस, आयएफएस, प्राध्यापक, शास्त्रज्ञ तसेच २५ पोलिस उपनिरीक्षक घडले आहेत. गावातील लोकांचे हे वाक्य खोटे ठरवण्याचा चंग २२ वर्षांपूर्वी प्रद्युम्न राजाराम पाटील या शेतकरी पुत्राने बांधला. कष्ट घेऊन एमपीएससी उत्तीर्ण करत तहसीलदारपद मिळवले. नंतर ते पोलिस उपअधिक्षक बनले. तिथून सुरू झालेला हा प्रवास अविरत सुरू आहे. स्वत: प्रद्युम्न पाटील यांनीच गावातील अन्य युवकांना या प्रवाहात आणण्यासाठी ही चळवळ सुरू केली.


  प्रत्येकाचे होते कौतुक, गुणवंतांची निघते मिरवणूक
  गावातील हे सर्व परिवर्तन गेल्या २२ वर्षांत घडले. उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नाेकरी समजणारा भूमिपुत्र अापल्या पुढच्या पिढीस उच्चाधिकारी करण्यासाठी त्याला अाग्रह धरू लागला. पी. अार. पाटील यांनी मात्र गावकऱ्यांना सांगून परंपरा घालून दिली ती उच्चाधिकारी झालेल्या तरुणांचे काेडकाैतुक करण्याची. एखाद्या गुणवंताचा निकाल हाती पडताच गावकरी जमतात. या तरुणांची वाजंत्री लावून फटाक्यांच्या अातषबाजीत मिरवणूक काढली जाते. पेढे वाटले जातात. "अशा कौतुकातून नव्या पिढीत जागृती हाेते. मुले शालेय जीवनापासूनच उच्चाधिकारी हाेण्याच्या ध्यासाने अभ्यासाला लागतात,' असे पी. अार. पाटील यांनी सांगितले.


  सरुडमधून अधिकारी बनलेले युवक-युवती
  सुगंधकुमार चाैगुले यूपीएससी हाेऊन फाॅरेन सर्व्हिसमध्ये गेले. अजितकुमार कुंभार अाधी अायपीएस व नंतर अायएएस झाले. अनेक जण प्राध्यापक झाले. काही शास्त्रज्ञ हाेऊन केंद्र सरकारच्या सेवेत अाहेत. गावातील तीन जण एक्साइज इन्स्पेक्टर अाहेत. तीन अारटीअाे इन्स्पेक्टर तर तब्बल २५ तरुण अाज पाेलिस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण हाेऊन विविध ठिकाणी कार्यरत अाहेत. त्यात काही युवतीही अाहेत.


  गावातील तरुण पिढीसाठी प्रेरणास्राेत
  बलदंड प्रकृतीच्या प्रद्युम्न म्हणजेच पी. अार. पाटील यांचे पाेलिस खात्यात जाण्याचे स्वप्न असल्याने पुन्हा परीक्षा देऊन त्यांनी पाेलिस उपअधीक्षकपदाच्या परीक्षेत यश मिळवले. सध्या ते नागपूरला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधीक्षक म्हणून कार्यरत अाहेत. मात्र, नाेकरीच्या व्यापातही त्यांनी अापले सामान्य शेतकरी कुटुंब, गावकरी अाणि गावातील तरुण पिढीशी सतत संपर्कात राहून सर्वांना शिकण्याची, स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी हाेण्याची स्वप्ने दाखवली. गावात गेल्यावर गावकरी व तरुणांसंगे पारावर बसून हाॅटेलात चहा पिताना त्यांनी चर्चेतून प्रेरणा दिली. मार्गदर्शनही केले. अायपीएस पाेलिस अधिकारी विश्वासराव नांगरे पाटील यांच्याशीही पाटील यांचा चांगला स्नेह. नांगरे गावी अाले की त्यांनाही सरुड येथे बाेलावून तरुणांना उच्चाधिकारी हाेण्याची प्रेरणा देत मार्गदर्शन करण्याची संधी त्यांनी अनेकदा साधली. परिणामी गावातील तरुण पिढी अाणि त्यांचे पालक असलेले शेतकरीही प्रभावित झाले.

Trending