आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जांघेतून घुसलेली 4 फुटी सळई खांद्यातून अारपार, तरीही सलीमला मिळाले जीवदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- इमारतीचे बांधकाम सुरू असताना ‘ताे’ पहिल्या मजल्यावरुन ९ फूट खाली स्लॅबवर पडताे अाणि ४ फुटांची सळई त्याची जांघ अाणि गुप्तांगातून शिरुन अारपार जात सरळ उजव्या खांद्यातून बाहेर पडते.  अत्यंत जीवघेण्या अशा या अपघातातून त्याला प्रसंगावधान राखून दाेन रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचार करून मुंबईच्या जेजे हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते. नियाेजनबद्ध रितीने शस्त्रक्रिया करून डाॅक्टर त्याचे प्राण वाचवितात. ही घटना घडली अाहे नाशिक जिल्ह्यातील लासलगावच्या ३३ वर्षीय सलीम शेख याच्या जीवनात.


सलीमच्या दृष्टीने ८ मार्च हा दिवस एखाद्या भयावह दु:स्वप्नापेक्षा कमी नव्हता. लासलगावमध्ये सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावर काम करीत असताना त्याचा पाय घसरला आणि तो नऊ फूट खाली कोसळला. तेथे स्लॅबसाठी टाकलेल्या लोखंडी सळया उघड्या हाेत्या. तो कोसळला त्यातील एका सळईवरच. ती त्याची जांघ आणि गुप्तांगातून शिरून अातडी, यकृत आणि फुफ्फुस यांना छेदत थेट उजव्या खांद्यातून पाठीच्या बाजूने बाहेर निघाली. सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत शरीरात शिरलेली ही सळई बाहेर काढण्याचा प्रयत्न न करता अवघ्या काही मिनिटांत ती स्लॅबपासून सरळ कापून काढत त्याला निफाडच्या आरोग्य केंद्रात नेले.  त्याला धनुर्वात आणि इतर वेदनाशामक इंजेक्शने देऊन प्रथमोपचार घेतल्यानंतर तातडीने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.  तेथे रक्तप्रवाह थांबविण्यासाठी आवश्यक उपचार केल्यानंतर ही सळई काढण्यासाठी त्याला मुंबईच्या जेजे हाॅस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला देण्यात आला.  ९ मार्च राेजी पहाटे दोनच्या सुमारास त्याला जेजे मध्ये दाखल करण्यात अाले. जखमांचे गांभीर्य अाणि स्वरूप लक्षात घेऊन तेथील डाॅक्टरांनीही थेट सळई न काढता तातडीने सीटी स्कॅन तपासणी केली. शरीराच्या कोणत्या भागात जखमा झालेल्या आहेत, याची स्पष्ट कल्पना त्यातून अाली. घटना घडून सुमारे २१ तास उलटले असल्यामुळे अंतर्गत रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला होता.  त्याबरोबरच अवयवांचे कार्य बंद पडण्यास सुरुवात झाली होती. एकाच वेळी या दोन्ही अाव्हानांवर मात करण्याचे आव्हान डॉक्टरांपुढे होते.  स्थिती स्पष्ट हाेताच डॉक्टरांच्या पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. लॅप्रोस्कोपी आणि थाेरॅकाेस्काेपी या दोन्ही पद्धतींनी शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. सळई गुप्तांगातून लहान आतड्यांमध्ये शिरली होती. त्यामुळे रक्तप्रवाह खालच्या दिशेने येत होता. त्यानंतर पुढे यकृत, फुफ्फुस याला छेद देत ती उजव्या खांद्याच्या पाठीकडील बाजूने बाहेर निघाली होती.  सुमारे पाच तास ही शस्त्रक्रिया चालली. त्यानंतर दोन दिवस सलीमला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.

 

डाॅक्टरांच्या या तीन पथकांचे काैशल्य

- भूल देणारे पथक : डॉक्टरांच्या दृष्टीने शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रुग्णाला भुलीच्या अंमलाखाली ठेवणे, त्याचा श्वासाेच्छ्वास सुरु ठेवणे हे आव्हान डॉक्टर उषा बडोले यांच्या यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लीलया पेलले. 
- थाेरॅकाेस्काेपी पथक : प्रमुख डॉक्टर ए. एच. भांडारवार, शेखर जाधव,  आणि डॉक्टर नाेमन शेख यांनी सलीमची छाती आणि फुप्फुसाला झालेल्या जखमा आणखी वाढणार नाहीत याची पूर्ण काळजी घेतली.  
- लॅप्रोस्कोपी पथक : डाॅक्टर एस. अार. भागवत, अमाेल वाघ अाणि डाॅ. जलबाजी यांनी आणि गुप्तांग व अातड्यांमधून हाेणारा रक्तस्त्राव थांबविला.
- राखीव पथक : डॉक्टर वेंकट गिते आणि कार्डिओव्हॅस्क्युलर पथकाचे डाॅ. के. एम. भोसले यांचे पथकही गुंतागुंत वाढल्यास सज्ज हाेते.

 

सळई तातडीने न काढण्याचा निर्णय याेग्य

सलीमचे सहकारी व स्थानिक डाॅक्टरांनी शरीरातील सळई त्वरीत उपसून काढण्याची घाई केली नाही. जेजे मध्ये अाधी डाॅक्टरांनी सर्व तपासण्या केल्या. त्यानंतर सळई कशी काढता येईल याचे नियाेजन केले. अावश्यक रक्तसाठा तयार ठेवण्यात अाला. त्यानंतर पाेटात अाणि छातीत २ दुर्बिणी (लॅॅप्राेस्काेप) साेडून अंतर्गत जखमा अाणि रक्तस्त्राव काेठे अाहे, हे शाेधणण्यात अाले. प्रथम गुप्तांग, जांघ, मूत्रपिंडातून त्यानंतर टप्प्याटप्प्याने अातडी, यकृत अाणि फुफ्फुसातून सळई बाहेर निघावी, यासाठी ती खांद्याच्या बाजूने अाेढण्यात अाली व शरीराच्या खालील बाजूने टाके टाकून अंतर्गत व बाह्य रक्तस्त्राव थांबविण्यात अाला. ही सळई तातडीने न काढण्याचा सर्वच पातळ्यांवर घेण्यात अालेला निर्णय याेग्य ठरला. अाधी तयारी झालेली असल्याने सुमारे १० तास चालणे शक्य असणारी ही शस्त्रक्रिया ५ तासांत यशस्वी झाली.
-  डाॅ. अमाेल वाघ, जेजे हाॅस्पिटल

 

यामुळे ठरला सलीम नशीबवान
मूत्राशय, डाव्या बाजूची किडनी, हृदयातील ऊर्ध्वगामी, अधाेगामी रक्तवाहिन्यांना जखमा न झाल्याने सलीमच्या जीवनाची दोरी बळकट ठरली व त्याचे प्राण वाचविण्यात यश आले. शस्त्रक्रियेस पाच दिवस झाल्यानंतर सलीमला आता जनरल वॉर्डात हलविण्यात आले असून वैद्यकीय उपचारांना ताे उत्तम प्रतिसाद देत आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, जांघेतून घुसलेली 4 फुटी सळई खांद्यातून अारपार...

बातम्या आणखी आहेत...