आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मका खरेदीत घोटाळा झाल्याचा संशय; अहवालातही गोलमोल असल्याची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आधारभूत किमतीने यंदा खरेदी करण्यात आलेल्या मक्यामध्ये घोटाळा झाल्याचा संशय वाढला आहे. शेतकऱ्यांचे क्षेत्र आणि प्रत्यक्षात त्यांच्याकडून खरेदी करण्यात आलेला मका याचा ताळमेळ बसत नाही. गतवर्षी ३७ हजार क्विंटल मका खरेदी झाल्यानंतर यंदा मात्र निम्म्या शेतकऱ्यांचा मका खरेदी करणे शिल्लक असतानाही तब्बल ९५ हजार क्विंटल मक्याची खरेदी कशी झाली, असा प्रश्न उपस्थित करत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल मागितला अाहे. तो अहवाल प्रशासनास प्राप्त झाला असून, आता त्या अहवालानुसार प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर जाऊन तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 


यंदा मक्याच्या अधिक उत्पादनामुळे भाव कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १४२५ रुपये क्विंटल या आधारभूत किमतीने मका खरेदीचा निर्णय घेतला. त्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणीही केली. ९५ हजार क्विंटल मक्याची खरेदी झाली. त्यातील शेतकऱ्यांच्या संख्येत घोळ झाल्याचे स्पष्ट झाले. प्रथम ३१ जानेवारीला १८४५ शेतकऱ्यांची संख्या दाखविली असताना १ फेब्रुवारीला मात्र ही संख्या १६०० असल्याचे मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने नमूद करत शेतकऱ्यांची दुबार नावे अाली असल्याचे कारणही त्यात देण्यात आले. त्यामुळे अधिकच संशय बळावला. एका हेक्टरमध्ये ५४.५० क्विंटल इतक्या मक्याचे उत्पन्न होऊ शकते. निफाडसाठी हा आकडा १०५ क्विंटलवर जात असल्याचा कृषी विभागाचा दावा आहे. त्याचा अहवालही कृषी विभागाने दिला आहे. 

 

असे असतानाही मक्याचे एकूणच जिल्ह्यातील क्षेत्र आणि आतापर्यंत खरेदी झालेल्या मक्यावरून यंदा इतके मक्याचे उत्पादन झालेच कसे? शिवाय अद्यापही निम्या म्हणजे एक लाख क्विंटल मक्याची खरेदी बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे खरेदी झालेला मका नेमका शेतकऱ्यांचाच अाहे की व्यावसायिक, व्यापाऱ्यांनीही आपली चांदी करून घेतली याचा तपास सुरू आहे. खरेदी विक्री संघ आणि मार्केटिंग फेडरेशनतर्फे खरेदी केलेल्या मक्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी तो सादरही केला आहे. पण त्यात नेमके काय आहे, हे पाहणेच अधिकाऱ्यांना व्यस्ततेमुळे शक्य झाले नाही, असे सांगण्यात आले अाहे. दिलेल्या अहवालात नमूद बाबींची जागेवर जाऊनही तपासणी करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...