आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावी पारा ४४.२, मनमाडला ४२.३ वर; नाशकात ३९. ६,४८ तासांत उष्णतेच्या लाटेची चिन्हे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड / मालेगाव- गेल्या आठवड्यापासून उष्णतेने अंगाची लाही लाही होत असून संपूर्ण जिल्हा उन्हाच्या तडाख्याने भाजून निघाला आहे. शनिवारी जिल्ह्यात मालेगावी ४४.२ तपमानाची नोंद झाली. येथील पारा एका दिवसात ०.६ अंशाने घसरला. शुक्रवारी मालेगावी ४४.८ अंश सेल्सिअस तपमान हाेते. या दिवसाचे हे राज्यतील दुसऱ्या क्रमांकाचे तपमान होते. मनमाडमध्ये शनिवारी ४२.३ तर नाशिकमध्ये ३९.६ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान, येत्या ४८ तासांत नाशिकसह अहमदनगर आणि जळगावच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तविली आहे. 


दिवसभर प्रचंड उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नाशिक शहरात गेल्या आठवड्यापासून मध्येच वीज खंडित होत आहे. मनमाडमध्ये तर सलग सहा दिवसांपासून तपमान ४० अंशांवर गेले असून, गेल्या १० दिवसांपासून रोज कोणत्याही वेळी पाच ते सहा तास वीज खंडित करून अघोषित भारनियमन होत आहे. दुपारी वीज खंडित होत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे उन्हाच्या तीव्रतेत काहीशी घट झाली होती. पण, घसरलेला पारा पुन्हा आता वर चढला असून, उष्णतेची लाट पसरली आहे. दुपारी बाजारपेठांत तुरळक गर्दी दिसत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने दागिने, बस्त्यासह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक २५ ते ३० किलोमीटरहून येतात, त्यावरही परिणाम झाला आहे. दुपारची वाहतूकही मंदावली आहे. थंड पदार्थांच्या स्टॉलवर रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी दिसत आहे. सायंकाळी विविध भागांतील ज्यूस पार्लर,आइस्क्रीम सेंटर्स, रसवंती केंद्रे यावर मोठी गर्दी दिसत आहे. गेल्या काही दिवसांतील मनमाडचे कमाल तपमान असे : दि. २३ (३९.४), दि. २४ (३९.६), दि. २५ (३९.७), दि. २६ (४०.२) दि. २७ (४०.९). 

बातम्या आणखी आहेत...