आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विद्यापीठातर्फे परदेशी शिक्षणासाठी 10 लाखांची मदत;संवाद कौशल्य प्रशिक्षणासाठी 15 लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वैद्यकीय शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अद्ययावत ज्ञान मिळावे तसेच त्यांना प्रशिक्षण घेता यावे यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विशेष योजना आखली आहे. या विशेष योजनेंतर्गत आरोग्य विद्यापीठाशी संबंधीत विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी विद्यापीठातर्फे आर्थिक मदतही केली जाणार आहे. राज्यभरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले आहे.   


विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी आर्थिक निधीची तरतूदही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या योजनेसाठी १० लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केली जाणार आहे. विद्यापीठातर्फे संशोधनासाठीही भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठात संशोधनाला चालना देण्यासाठी तसेच त्याला प्रोत्साहन देण्यासाठी संशोधन विभाग सुरू करण्यात आला अाहे. त्याच धर्तीवर आता प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र संशोधन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या संशोधन कक्षासाठी तब्बल दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे.   

 

विद्यापीठातर्फे इंटरनॅशनल एज्युकेशन हब   
आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे इंटरनॅशनल एज्युकेशन हब विकसित केला जाणार असून त्यासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या एज्युकेशन हबच्या माध्यमातून  भावी डॉक्टरांना संशोधनासह विविध सुविधाही मिळू शकणार आहे. त्याचा फायदा राज्यभरातील अनेक वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना होईल. डाॅक्टर आणि  रुग्ण यांच्यातील संबंध तसेच संवाद चांगले असावेत या उद्देशाने विद्यार्थ्यांना संवाद कौशल्याचे प्रशिक्षण देण्याकरीता १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...