आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्यानिमित्त त्र्यंबकचे प्रश्न सुटण्याची अपेक्षा; भक्तनिवासाचे हाेणार उद‌्घाटन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन आणि नवीन भक्तनिवासाचे उद‌्घाटन मंगळवारी होणार आहे. त्यानंतर सायंकाळी क्रेडाईतर्फे आयोजित ‘शेल्टर-२०१७’ प्रदर्शनाच्या समारोप सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. त्र्यंबकेश्वर येथील या कार्यक्रमांच्या निमित्ताने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या एकहाती सत्तेने आता प्रलंबित प्रश्नांच्या निकालासह पालिकेला विकासकामांसाठी वाढीव निधी मुख्यमंत्री अाश्वासित करता की नाही याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत. 


बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात अालेला ‘कुंभमेळा’ ज्या शहरात भरतो त्या अांतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतलेल्या त्र्यंबकेश्वरात स्वच्छतेपासूनच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न निधीअभावी गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ‘क’ वर्ग नगरपरिषद असल्याने मिळणारा निधी कमीच आहे. शिवाय उत्पन्न कमीच आहे. मात्र, जागतिक दर्जाचे धार्मिक ठिकाण असल्याने येथे भाविकांचा राबता मोठा आहे. त्यामुळे उपलब्ध सोयी-सुविधांवर ताण पडतो. कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला असला तरीही बहुतांशी कामे साधू-महंतांच्या आखाड्यांतच झाली आहे. त्याचा येणाऱ्या भाविकांना फारसा उपयोग होत नाही. परंतु आता केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपलाच त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत मतदारांनी भरभरून मतांचे दान दिल्याने आता तरी वाढीव निधी मिळत प्रश्न सुटण्याची अपेक्षा त्र्यंबकच्या नागरिकांकडून केली जात आहे. प्रलंबित खत प्रकल्प वनविभागाच्या विविध अडचणी सुटण्याची अपेक्षाही व्यक्त होत आहे. 


समृद्धीबाधितांकडून काळे झेंडे दाखवित निषेधाची तयारी 
समृद्धी महामार्गाविरोधात एकवटलेले शेतकरीच आता दलाल बनल्याचे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरी निवृत्तिनाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यापूर्वीच काळ्या झेंड्यांनी स्वागत होण्याची शक्यता वाढली आहे. दलाल म्हणून हिनवण्याऐवजी प्रश्न सोडवावेत. दलाली करणाऱ्यांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. 


त्र्यंबकेश्वरचे प्रमुख प्रश्न 
-  कचरा विल्हेवाट लावण्यासाठी जागा मिळावी. 
- ‘क’ वर्ग नगरपरिषदेमुळे निधी कमी. प्रत्यक्षात येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्याने सर्वच सुखसोयींचा वाढतो ताण. त्यामुळे निधी मिळावा. 
- त्र्यंबकेश्वर हे श्रीक्षेत्र असल्याने येथे दररोज लाखोने भक्त येतात. निवृत्तिनाथ आणि महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागतात. मंदिर परिसराच्या २०० मीटरमध्ये बांधकामास परवानगी नसल्याने स्वच्छतागृहांचाही अभाव आहे. उज्जैनसह कुंभमेळा भरणाऱ्या इतर ठिकाणी त्या-त्या राज्याने निर्णय घेतला आहे. येथेही मुख्यमंत्र्यांनी बांधकामास परवानगी द्यावी. 
- ब्रह्मगिरीवर पूर्णपणे वृक्षारोपण व्हावे. ही जागा वनविभागाची असल्याने तेथे भाविकांना सुविधा उपलब्ध करता येत नाही. त्यासाठी परवानगी देत सुविधा द्याव्यात.

 
दुपारी २.३५ वाजता त्र्यंबकेश्वरमध्ये 
मंगळवारीदुपारी १.५० वाजता ओझर येथे मुख्यमंत्र्यांचे आगमन होईल. तेथून ते श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वरकडे प्रयाण करतील. २.३५ वाजता श्री निवृत्तिनाथ महाराज मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन नवीन भक्तनिवासाचे उद‌्घाटन करतील. दुपारी ३.५० ला त्र्यंबकेश्वर येथून मोटारीने गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे क्रेडाईच्या वतीने आयोजित शेल्टर २०१७ या प्रदर्शनाच्या समारोपास ४.१५ वाजता उपस्थित राहतील. त्यानंतर ५.१५ वाजता डोंगरे वसतिगृह मैदान येथून मोटारीने ओझर विमानतळावरून ५.५० ला विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील. 

बातम्या आणखी आहेत...